‘शारदाबाई’ नावाचं रानफुलएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानंतर आणखी काही वर्षांनी तिसऱ्या मुलाचा हातातोंडाशी आला असताना ऐन पस्तीशीत खून… अशा एखाद्या आईवर डोंगर कोसळवणाऱ्या घटना.

यातूनही स्वत:ला सावरत एक बाई जिद्दीनं शिकते, लोकल बोर्डात सलग १४ वर्षे सदस्य राहते, वेगवेगळ्या कमिट्यांचं नेतृत्व करते, शेती करते, अकरा-बारा मुलांना प्रसंगी अंगावरचे दागिने विकून शिकवते… हे कुणालाही स्वप्नवत वाटावं असं जगणं आहे – ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ – या बाईचं.

या पुस्तकात एक वाक्य आहे - ‘काळोखातून चंद्रकोर प्रकट व्हावी, कलेकलेनं ती वाढत राहावी आणि एकेदिवशी तमाम सृष्टीनं पौर्णिमा अनुभवावी’. शारदाबाई गोविंदराव पवार या बाईचं आयुष्य हे नेमकं याच वाक्याचं जिवंत उदाहरण आहे.

खूप दिवसांपूर्वी ‘लोक माझे सांगाती’ हे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भारावून गेलो होतो. सतत पन्नास वर्षे राज्य आणि देशाच्या राजकारणाचा सक्रीय भाग राहणं आणि तेही अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आपल्या चाली-चितपटांकडे लावून ठेवणं, हे सहजसोपं काम नाहीय. स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय परिघात हे फारच क्वचित नेत्यांना जमलं असावं. पण हे शरद पवार इतक्या उंचीवर का पोहोचले, याचं कारण ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात नसून, ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ या सरोजिनी नितीन चव्हाण लिखित चरित्रात आहे.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

शरद पवार कळण्यासाठी आधी त्यांची आई समजून घेणं गरजेचं आहे. शारदाबाईचं चरित्र वाचल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या पुढच्या डोंगराएवढ्या कामाचं विशेष नवल वाटत नाही. कारण ज्या वटवृक्षाचा पाया इतका भरभक्कम असेल, त्यानं आभाळभर पसरणं ओघानं आलंच.

कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या शारदाबाईंचं समज येण्याआधीच पितृछत्र हरपलं. पुढं मोठ्या बहिणीचे पती काकासाहेब जाधव यांच्याकडे आई, स्वत: शारदाबाई आणि लहान भाऊ असे राहायला गेले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठ्या बहिणीकडे राहावयास जाण्याची शारदाबाईंच्या आयुष्यातील ही घटना इथं नमूद करण्याचं कारण महत्त्वाचं आहे.

काकासाहेब जाधव हे राजर्षि शाहू महाराजांच्या सहवासात वाढलेले. त्याच विचारांचे. अशा माणसाच्या छत्रछायेखाली शारदाबाई आई-भावासोबत राहण्यास आल्यानंतर पुरोगामी विचारांचा वारा लागणार नाही, असं कसं होईल? शारदाबाईंच्या जडणघडणीत आणि एकूणच वाटचालीत मोलाचा वाटा राहिला तो काकासाहेब जाधवांचा. राजर्षि शाहूंच्या विचारांच्या काकासाहेबांनी शारदाबाईंच्या शिक्षणासाठी यशस्वी प्रयत्न केले.

पुढे पुण्यात आल्यांतर रमाबाई रानडेंच्या ‘सेवासदन’मध्ये खऱ्या अर्थाने तल्लख बुद्धीच्या शारदेला ज्ञानाची कवाडं उघडी झाली. आपण समाजापोटी काहीतरी करायला हवं, याची जाणीव रमाबाईंसारख्या विशाल हृदयी व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर लक्षात आलं.

पवार कुटुंबीयांचं काटेवाडीतील घर

काकासाहेबांमुळं राजर्षि शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वसा आणि रमाबाईंमुळे समाजपयोगी कामांचा धडा – हे सर्व आत्मसात करून शारदाबाईंनी पुढे आपली वाटचाल केली.

पितृछत्र हरपलं म्हणून खचून न जाता, प्रवासात मदतीला आलेल्या प्रत्येकाच्या सहकार्यानं आणि स्वत:च्या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाई राजकारणात उतरल्या. आजच्या जिल्हा परिषदेचं तेव्हाचं रूप असलेल्या लोकल बोर्डात पुणे जिल्ह्याच्या सदस्या झाल्या. वेगवेगळ्या कमिट्यांवर गेल्या.

पोटात सहा-सात महिन्यांचं बाळ घेऊन बारामती ते दौंड आणि दौंड ते पुणे असा रेल्वेनं प्रवास करत शारदाबाई बोर्डाच्या बैठकांना हजेरी लावत. बांधकाम, शेती, शिक्षण अशा विविध समित्यांवर त्यांनी तत्कालीन परकीय सत्तेतही लोकोपयोगी कामं केली. या सगळ्या कामात गोविंदराव पवार या माणसाच्या हातभार आणि आधाराचाही अनुल्लेख करता येणार नाही.

शारदाबाई लोकल बोर्डात बिनविरोध निवडून गेल्यानंतरची बातमी

गोविंदरावांनी शारदाबाईंना दिलेल्या स्वातंत्र्यामुळं कदाचिते हे सर्व शक्य होण्यास सोपं झालं असावं. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील कुणी बाई अशी शिकते, लोकल बोर्डात जाते, सगळ्या मुलांना हवं तेवढं शिकवते, हे कल्पनावत होतं. पण गोविंदरावांच्या पाठिंब्यांनं आणि जिद्दीनं शारदाबाईनं ते केलं.

केवळ वैयक्तिक प्रगती नव्हे, तर समाजाला आपल्या कामाचा आणि आपल्या कामातून मिळणाऱ्या संदेशाचा कसा उपयोग होईल, हेही बाईंनी पाहिलं. मग ते भूतानं झपाटलेल्या घरात राहून अंधश्रद्धेला मी जुमानत नाही, हे तत्कालीन काहीशा प्रतिगामी वातावारणाला ठामपणे सांगू पाहणं असो किंवा डोक्यावरचा पदर खाली पडू न देण्याच्या त्या काळात पदर कंबरेला खोचून टांगा चालवणं असो… शारदाबाई म्हणजे विलक्षण होत्या.

आपल्या सर्व मुलांना आणि मुलींनाही त्यांनी शिकवलं. संस्कार दिले. महाराष्ट्राच्या खेड्यांमध्ये राहून शारदाबाई या विदुषीनं देशाला हिमालयाशी स्पर्धा करणारी मुलं दिली, हे या पुस्तकातील वाक्य किती यथोचित आहे हे लक्षात येतं. आणि हेही खरंय की, मुलांना शिकवत असताना, संस्कार देत असताना, बाईंनी प्रत्येक मुलाच्या गंधमय वेगळेपणाला हिरावून न घेता फुलू दिलं.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

खरंतर शरद पवार नव्हे, तर शारदाबाई या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी. त्यांनी लोकल बोर्डात काँग्रेसचा आधार घेतला, मात्र त्यांची बिजं लढवय्यी शेतकऱ्याची होती. कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे अशा मंडळी पवारांच्या घरात येत-जात असतं. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर बाई वैचारिकदृष्ट्या या पक्षाच्या जवळ गेल्या. पण काँग्रेसच्या विचारांच्या शरद पवारांना त्यांनी कधी अडवणूक केली नाही.

मात्र, शेकाप आणि काँग्रेसबद्दल बाईंनी नमूद केलेलं मत आजही विचार करण्याजोगं आहे. त्या म्हणत, “काँग्रेसप्रणित समाजवादी समाजरचना तळागातल्या जनतेला कसा न्याय मिळवून देईल? सध्याचा काँग्रेसप्रणित समाजवाद हा आधी समृद्धी, नंतर वाटप असा आहे. तो मला पटत नाही. काँग्रेसला समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे कार्य करावयाचे असेल, तर काँग्रेसही प्रथम श्रमजीवी, शेतकरी, कामगार व गरीब मध्यमवर्ग यांचा विश्वास संपादन करणारी असली पाहिजे, तर संपत्तीच्या वाटपामध्ये गरिबांना आधी न्याय मिळेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने एकसंध समाजाची निर्मिती होऊ शकेल.”

बाईंच्या या वाक्यातून त्यांच्यावरील केशवराव जेधे, कर्मवीर अण्णा, राजर्षि शाहू यांच्या विचारांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो.

मात्र, असं असलं तरी त्यांनी शरद पवारांच्या राजकीय विचारांना विरोध केला नाही. शरद पवार १९६७ साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा अनंतराव पवार (अजित पवार यांचे वडील) यांनी शरद पवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळीही शारदाबाईंनी अनंतरावांना आधाराच दिला. आपली विचारसरणी त्या आड आणली नाही.

अनंतराव पवार (अजित पवारांचे वडील) अगदी शरद पवारांसारखे दिसत..

विचारांच्या दृष्टीनं काळाच्या कितीतरी पुढे असलेली बाई, शेतकरी-बहुजन समाजाच्या मदतीसाठी एका पायावर तयार असलेली बाई, घरदार सांभाळताना राजकारणात झोकून देऊन काम करणारी बाई… काळ, प्रवास सर्व उलट दिशेनं वाहत असतानाही धीर न ढळू देता, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाईनं आकाश ठेंगणं करून दाखवलं.

बाईंच्या विचार आणि कृतीमध्ये किती ताकद होती, हे त्यांच्या पोरा-बाळांनी विविध क्षेत्रात घेतलल्या भराऱ्यांमधून दाखवूनही दिलंय. बीज दमदार असेल, तर वृक्ष चांगलाच फोफावतो – हे याच पुस्तकातील शेवटचं वाक्य याचा सार आहे.

या लेखाचा शेवट करताना याच पुस्तकाच्या सुरूवातीच्या काही ओळी मुद्दाम इथे नमूद करेन. खरंतर शारदाबाईंचं आयुष्य काय होतं, हे या चार-पाच ओळीतून स्पष्ट होईल.

अनेक रानफुळे अतिशय सुवासिक असतात. तथापि, ती रानातच उमलतात, फुलतात. आपला आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात आणि तेथेच कोमेजूनही जातात. समारंभाच्या व्यासपीठापर्यंत ती पोहोचण्याची शक्यताही नसते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अशा फुलांची समाजाला फारशी माहितीही होत नाही. शारदाबाईंची व्यक्तिरेखा या रानफुलासारखीच.

3 comments:

  1. मागील महिन्यात 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. वाचन चालू असताना 'शारदाबाई गोविंदराव पवार' या पुस्तका बद्दल उत्सुकता होतीच..वाचण्याचा योग अजून आला नाही. तोपर्यंत हा ब्लॉग वाचायला मिळाला. खूप चांगली माहिती मिळाली. नक्कीच हे पुस्तक लवकरच वाचून पूर्ण करेन. धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहे सर🙏

    ReplyDelete
  3. उत्तम माहिती मिळाली.

    ReplyDelete

Powered by Blogger.