जंग तो खुद ही एक मसला है..


माध्यमनिर्मित युद्धज्वर पाहता, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना 'अहो जहो' करणे म्हणजे सुद्धा देशद्रोह ठरवा, इथवर 'नाजूक' स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हल्ला, युद्ध, प्रतिहल्ला यासंबंधी कथित प्रवाहाच्या विरोधात बोलणे म्हणजे आपणच तोफेसमोर उभे राहण्यासारखे आहे. भले हा प्रवाह दिशाहीन का असेना!

अशा एकंदरीत स्थितीत कुठल्याही राजकीय नेत्याने सडेतोड, स्पष्ट आणि विवेकी या शब्दांना साजेशी भूमिका घेणे सुद्धा कठीण होऊन बसते. आपले कार्यकर्ते सुद्धा युद्धाच्या दिशाहीन चर्चेच्या प्रवाहात अडकलेले असताना, पक्ष आणि राजकीय नेता म्हणून रोखठोक भूमिका शक्य नसते. कारण कार्यकर्ते दुरावण्याची आणि प्रवाह विरोधात जाण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात राज ठाकरे यांच्यासारखा नेता उजवा ठरला आहे.


पुलवामा हल्ल्याचा निषेध करत असताना, युद्ध नको सांगून, संवादाची मागणी करुन, राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसात विरोधी पक्षातील नेत्यांकडून जी अपेक्षा होती, ती पूर्ण केली. अगदी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने सुद्धा इतकी खमकी भूमिका घेणे टाळले. कदाचित जनभावना विरोधात जाईल, याची भीती त्यांना सतावत असावी. राज ठाकरेंनी असा कुठलाही विचार न करता, विवेकी विचार शाबूत ठेवला आणि भूमिका स्पष्ट केली. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी.


यावेळी राज ठाकरे यांच्या गेल्या काही वर्षातील भूमिका आपण विसरता कामा नये. जेणेकरुन या नेत्याची त्याच्या राजकीय चौकटीतील प्रगल्भता लक्षात येईल. पाकिस्तानी कलाकार, खेळाडू यांना वेळोवेळी मनसेने विरोध केला आहे. त्या त्या वेळी शस्त्रसंधी किंवा हल्ले असे कारण होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा राज ठाकरे यांनी निषेध व्यक्त करुन, प्रसंगी रस्त्यावर उतरुन विरोध केला. मात्र, शासन - प्रशासनाच्या व्यवस्थेत राहून विरोध करणे आणि युद्ध करून निषेध नोंदवणे यातील फरक ते जाणून आहेत, याचा मनस्वी आनंद वाटला.


राज ठाकरे यांच्या पत्रातील शब्द नि शब्द आजच्या घटकेला योग्य भूमिकेचा आदर्श आहे. तरीही भाजपची मंडळी त्यांना ट्रोल करत आहेत. मात्र तो जागतिक नाईलाज आहे. कारण अक्कलशून्य मंडळींना आपण काय बोलणार? राज ठाकरे यांच्या भूमिकेमागे नेमका अर्थ काय, हे कळण्याची मानसिकता आणि बुद्धी नसलेली मंडळी भाजपच्या सोशल मीडियावर काम करतात आणि युद्धाचे समर्थन करत सुटतात. असो.


खरंतर जे चूक आहे, त्यावर बोलत आलेच पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इतर असंख्य मुद्द्यांवर माझा टोकाचा विरोध आहे. मात्र, सद्यस्थितीत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही प्रगल्भ राजकीय नेत्याचे दर्शन घडवणारी आहे. अर्थात, असा संवाद करुन प्रश्न सोडवण्याची भूमिका राज ठाकरेंनी इतर मुद्द्यांवर सुद्धा घ्यावी, ही अपेक्षा आहेच. मात्र, तूर्तास इतकेच.


राज ठाकरेंची युद्धाबाबत भूमिका सांगितली. त्या भूमिकेचे कौतुक सुद्धा केले. पण मला काय वाटतं? तर साहिर लुधियानवीच्या काही ओळींमधून मी माझी भूमिका सांगेन :

"जंग तो खुद ही एक मसला है
जंग क्या मसअलों का हल देगी
इसलिए ए शरीफ इंसानों
जंग टलती रहे तो बेहतर है
आप ओर हम सभी के आंगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है"

तर साथींनो, आपण युद्धाचा विरोध केलाच पाहिजे. सोशल मीडियावर लिहून केला, तरी ते कमी नाही. याचे कारण युद्धाची खुमखुमी असलेले विद्यमान नेते सोशल मीडियाचा ट्रेण्ड पाहून निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे इथूनही राज ठाकरे यांच्यासारखे ठामपणे युद्धाच्या विरोधात उभे राहू.

3 comments:

  1. आम्ही सहमत आहोत

    ReplyDelete
  2. अगदी योग्य पणे विश्लेषण केले आहे..

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर !!

    ReplyDelete

Powered by Blogger.