कोण पुलं?
आज एकजण तावातावाने सांगत होता, 'पु. ल. देशपांडे म्हणजे तमाम मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत', 'असा एकही मराठी माणूस सापडणार नाही, ज्याला पुलं माहीत नाहीत'. पुढे आणखी काय काय म्हणत होता. महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न वगैरे. मी थोडे थोडे ऐकून घेतले आणि न राहून बोलूच लागलो.


पु. ल. देशपांडे हे उत्कृष्ट साहित्यिक होते, यात कुठलाच वाद नाही. माझ्यासारख्या वाचकाने तर हे नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल किंवा पुलंचे लेखन वाचले नाही असा त्याचा अर्थ होईल. मात्र, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही, हे विधान जरा अतीच होतं राव. आणि आता 'भाई : व्यक्ती की वल्ली'निमित्त अनेकजण हे विधान करत सुटलेत.


पुलंच काय, तुमची कितीतरी लेखक मंडळी आमच्या गावापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. हा त्या लेखकांचा दोष की तिथवर शिक्षण पोहोचवणाऱ्या सरकारचा दोष हे खरंच माहीत नाही. पण हे सत्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा तत्सम शहरं आणि काही निमशहरी भाग वगळला तर या लेखकांचे लेखन गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले नाही, हे वास्तव आहे.


दूर कशाला, माझ्या शाळेत अभ्यासबाह्य केवळ एकच पुस्तक होते. तेही मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये खिडकीवर पडलेले असायचे. शिपायांना बोलवण्यासाठी बेल ठेवण्यासाठी त्या पुस्तकाचा नंतर नंतर वापर होऊ लागला, हेही आठवते आहे. ते पुस्तक म्हणजे - श्यामची आई. त्यातल्या सुरुवातीच्या चार - पाच रात्री वाचल्या होत्या.


दहावी होईपर्यंत अभ्यास सोडून कुठलेच पुस्तक आमच्या नशिबी नव्हते. हा माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून माझ्यापुरता मर्यादित आहे, असे नाही. खरेतर माझा हा अनुभव प्रातिनिधिक आहे, असे मी म्हणेन. कारण अशीच स्थिती कमी - अधिक प्रमाणात ग्रामीण भागात आहे.


आम्हाला तर जगातील सर्व विनोद आपला लक्ष्या, अशोक सराफ, गोविंदा, जॉनी लिव्हर हेच लिहितात की काय, असेच वाटत होते. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार वगैरे आमच्या गावीही नव्हती. शहराशी संपर्क आला, ग्रंथालयांच्या पायऱ्या चढू लागलो, तेव्हा कुठे पुलं वगैरे काही गोष्ट जगात आहेत, हे कळू लागलं. अर्थात, यात पुलंचा कमीपणा नाही, पण आमच्यापर्यंत त्यांचे लेखन या कधी पोहोचलेच नाही. आजही शंभरतील फार फार तर तीस लोकांना पुलं माहीत असतील. जर सरासरी काढायची तर. अशी स्थितीत असताना आपण किती धाडसी विधाने करतो की, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस सापडणार नाही वगैरे.


आणि हो, या लिहिण्यातून पुलंना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने म्हणा किंवा वाचक - लेखक किंवा एकंदरीत साहित्यविश्वाने आमच्यापर्यंत हे लेखन कधीच पोहचवले नव्हते. आजही अशीच स्थिती आहे. हे वास्तव आपण स्वीकारून साहित्य गावापर्यंत पोहचवले पाहिजे. तरच या लेखकांवर सिनेमे निघाले तर प्रेक्षक येतील.


बाकी मुंबई - पुणे किंवा तत्सम शहरांमध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या प्रमाण मानून अवघ्या राज्याला किंवा कधी कधी जगाला पण लागू होतात, असले अवाजवी धाडस काहीजण करतात ना, त्यांची फारच कमाल वाटते. या शहरी डबक्यातून बाहेर पडून पाहण्याची गरज आहे. हे बाहेरचे जग खूप गोष्टींपासून अद्याप अनभिज्ञ आहे. अर्थात, ते अनभिज्ञ राहू नये, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.


खूप विस्कळीत लिहिले आहे. पण इन शॉर्ट, अनेक साहित्यिक नि त्यांचे साहित्य शहरांच्या वेशी ओलांडून शेताच्या बांधावर कधी पोहोचलेच नाही. ते पोहोचायला हवे.
Powered by Blogger.