सुभाष
काॅलेज सोडून नियमित जाॅब पकडावा, असा विचार डोक्यात होता. फर्स्ट ईयर डिस्टिंक्शनमध्ये पास झालेलो. पण सेकंड ईयरला अॅडमिशन घेण्यासाठी १५ हजार रुपये नव्हते. सगळी धावाधाव संपल्यानंतर अखेर सुभाषला याबाबत सांगितलं. त्याने तातडीने १० हजार रुपये रोख हातात ठेवले आणि म्हणाला, आरामात परत कर. पण शिक्षण सोडू नकोस.


सुभाषसारखे आजच्या जगात सहसा भेटत नाहीत. निस्वार्थी आणि मुक्तहस्ताने मदत करणारे. सुभाष वेगळा आहे. अफाट संवेदनशील माणूस.


खरंतर वरील प्रसंग हा माझ्याबाबतीत घडला म्हणून सांगितला. आणि हा फक्त एक झाला. असे असंख्य प्रसंग सुभाषच्या खात्यात जमा आहेत. सुभाषने माणसं कमावलीयेत. तो खरा श्रीमंत आहे.


सुभाषच्या या जाणीवेमागे असंख्य खाचखळग्यांचा इतिहास आहे. मुळात चढ-उतार पार केल्याशिवाय अथांग समुद्राचा अनुभव गंगा-यमुनेसारख्या महानद्यांनाही चुकला नाही. तिथं आपली काय बात? तसंच काहीसं सुभाषचं आयुष्य भन्नाट वळणांचं, अतिव दु:खाचं आणि अफाट इनस्पिरेशनल आहे.


माझी आणि त्याची भेट झाली मुंबईतील विलेपार्ल्यात. संत जनाबाई रोडवरील जाधवांच्या पेपर स्टाॅलवर. पेपरलाईन टाकून चहा पित बसलो असताना, सुभाष पेपर टाकत तिथे आला. त्याला पेपरलाईनसाठी पोरगा हवा होता.


त्याचवेळी मी जिथे पेपर टाकायचो, त्याने दोन-एक महिन्याचा पगार दिला नव्हता. जाधवांनी सूचवलं, याच्याकडे काम करणार का? तातडीने हो म्हणालो. सुभाषचं नाव पार्ल्यातल्या पेपरवाल्यांमध्ये आदरानं घेतलं जाई. त्यामुळे तशी ओळख होतीच. बस्स आमच्या ओळखीचा आणि पुढच्या काळात मैत्रीचा प्रवास इथून सुरु झाला. सुभाष अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक झाला.


सुभाषशी ओळख असणं अभिमानाची बाब वाटावी, इतका सच्चा माणूस. एकास दोन नाही. अगदी आत एक-बाहेर एक. स्पष्ट आणि सरळ. मात्र साधा. याच साधेपणामुळे अनेकांनी त्याला फसवलंही. पण तो तरीही आपला मदत करण्याची सवय सोडली नाही. सुभाषकडे काम करता करता कित्येकांना मदत करताना आणि कित्येकांनी हजारो रुपयांना सुभाषला फसवल्याचं ऐकलंय. 'जाऊदे, कुठे नेणाराय पैसा.' असं बोलून त्याचा प्रवास सुरुच आहे. अविरत आणि अखंड. सुभाषच्या या स्वभावाचं मला फार कौतुक वाटतं.


सुभाषचा वैयक्तिक प्रवास खाचखळग्यांचा आहे. मात्र तेवढाच इनस्पिरेशनल. माणूस म्हणून घडण्याचा प्रवास.


कळतही नव्हतं, त्या वयात सुभाषच्या आईचं निधन झालं. मग शाळा शिकत असतानाच गावातल्या किराणा मालाच्या दुकानात कामाला राहिला. शेतात कामं करत, शाळेपासूनच नोकरी करत शिक्षण घेतलं. दरम्यान वडिलांनी दुसरं लग्न केलं. आईची माया ती आईचीच. हे कळू लागल्यानंतर त्याने अभ्यासातली गोडी वाढवली आणि दहावी-बारावी पूर्ण केली. पुढे पदवीचं शिक्षण घेऊन मुंबईत आला. मात्र शिक्षणाच्या जोरावर नोकरीची वाणवा असल्याने मिळते ते काम करत गेला.


हनुमान रोडवरील फुलांच्या दुकानात काम करुन, खाण्या-पिण्याची आणि त्या दुकानातच झोपण्याची व्यवस्था झाली. पुढे पेपरलाईन टाकू लागला आणि मग स्वत:ची पेपरलाईन सुरु केली. मधल्या काळात कुठेच आधार मिळेना म्हणून हनुमान रोडवरच्याच गझाली हाॅटेलच्या फूटपाथवर वडापव पोटात सारुन कित्येक रात्री घालवल्या. मातीचं आंथरुण आणि आभाळाचं पांघरुण. बस्स!


या सर्व गोष्टींना आता १५ हून अधिक वर्षे लोटली. रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सुरु झालेला प्रवास मुंबईच्या सावलीत विसावलाय. आता पार्ल्यातील एका चांगल्या भागात रुम घेऊन, पत्नी आणि चिमुकल्या मुलीसोबत स्थायिक आहे. इतक्या खाचखळग्यांची जाणीव मनात कायम ठेवून, अशाच स्थितीतून कुणी आला असेल तर सुभाष मदत करायला मागे पुढे पाहत नाही. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये, इतका दानशूर. या व अशा अनेक गोष्टींमुळे त्याचा मित्रपरिवारही अफाट आहे.

No comments

Powered by Blogger.