आपला तो बाब्या...आपला पक्ष काय विचारधारेचा आहे, पक्षाचा नेता काय विचारधारेचा आहे, याची किमान माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे बाळगायला काय हरकत आहे मी म्हणतो? म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार असलेल्या व्यंगचित्रात अधिक सातत्य राखून असलेल्या राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी टीका सहन न झाल्याने काल परवा कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या. यावरुन हे तोंड वाजवायला लागतं आहे. अन्यथा, मनसेच्या ऑनलाईन दादागिरीला मी तर कंटाळलो आहे.


फेसबुक की अन्य कुठल्याशा सोशल मीडियावर कुणा व्यक्तीने राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केली, म्हणून मनसैनिकांनी त्याला उठा बशा काढायला लावल्या - अशी बातमी आहे.


काय कमालीची विसंगती आहे पहा. ज्या पक्षाचा नेता व्यंगचित्रकार म्हणून देशाचे पंतप्रधान, मोठमोठे राजकीय नेते इत्यादींवर हवे तसे तोंडसुख घेण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहे, त्या नेत्याच्या पक्षाने एखाद्या व्यक्तीला विरोधी मत मांडण्याचा अधिकार देऊ नये? आक्षेपार्ह कमेंट असेल, तर स्वीकारायला नकोच. पण मग कायदेशीर तक्रार करा ना, उठाबशा काढायला लावणे, ही दादागिरी का? की ही पद्धत पक्षीय विचारसरणीचा भाग मानायचा? किती काळ असल्या गुंडगिरीच्या पद्धती राज ठाकरे अवलंबत बसणार आहेत?


एका झटक्यात आलेले १३ आमदार, नाशिकमधील जवळपास ४० नगरसेवक, मुंबईतील ७ पैकी ६ नगरसेवक गमावल्यानंतर सुद्धा आपल्या राजकीय पद्धतीवर फेरविचार करावा, अशी कधी चर्चाही कृष्णकुंजवर होत नसेल का?


आज 'एकला चलो रे' या भूमिकेतून राज ठाकरे यांचा पक्ष जातो आहे. युती, आघाडी, वंचित आघाडी वगैरे तडजोडयुक्त लोंढणे गळ्यात न बांधता जाणारा हा पक्ष तेवढ्यासाठी कौतुकास्पद ठरतो, विविध मुद्द्यांवर थेट, ठाम आणि रोखठोक भूमिका घेतल्याने सुद्धा मनसेचे कौतुक करावे वाटते. मात्र आपल्या पक्षीय क्रिया आणि विचारसरणीचा काहीतरी ताळमेळ कधी बांधला जातो की नाही? की तशी शिकवण कार्यकर्त्यांना दिली जात नाही? की तीच शिकवण आहे? असो.


मूळ मुद्दा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आहे. हे रोज दिवसागणिक वाढत जाणारे फॅड थांबले पाहिजे. यांच्या नेत्याने जाहीर सभेतून 'गांडू'पासून सगळे शब्द वापरावे, हवे तसे व्यंगचित्र काढावे, मात्र यांच्या विरोधात कुणी काहीच बोलू नये, असल्या अपेक्षा ठेवता? स्वतःही तसे वागायला, बोलायला शिका की.


ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या, त्यांनी माझ्या 'गंडलेले नवनिर्माण' या पोस्टवरील मनसेच्या कार्यकर्त्याच्या कमेंट वाचाव्यात. मग उठाबशा काढण्यासाठी शिवाजी पार्क बुक करायला लागेल, इतके अपशब्द वापरणारे खोऱ्याने कार्यकर्ते पक्षातच आहेत, हे कळून येईल. असो.


राज ठाकरे अनेकदा आपल्या भाषणात विविध संदर्भावेळी एक म्हण वापरत असतात, ती म्हणजे, 'आपला तो बाब्या, अन् दुसऱ्याचा तो कार्टा'. हेच आज राज ठाकरेंना सांगावे वाटते.


गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांच्या काही भूमिका पटल्या होत्या. त्यावरुन त्यांच्या बदलत्या राजकीय वाटचालीवर अंदाज बांधावा, भाष्य करावे, तर नेमके हे असले प्रकार करुन आपल्या मूळ पदावर कार्यकर्ते येतात. असो.


राजसाहेब, कार्यकर्त्यांना खरंच समजवा. सर्वसामान्य माणूस भित्रा असतो. मात्र, त्याला एका मर्यादेच्या पलिकडे दादागिरी सहन होत नाही. मग तो जमेल त्या गोष्टीतून विरोध करतो. तुम्हाला मतांमधून तो विरोध दाखवण्यात आला आहे. इतका जालीम अनुभव गाठीशी असताना सुद्धा कार्यकर्त्यांना पाठीशी घालता, हे फारच धाडसाचे आहे. काही विधायक गोष्टी लावून धरा, म्हणजे धरता, पण मध्येच हे प्रकार करता आणि विधायक गोष्टी विसरुन तुमच्या पक्षीय दादागिरीच्या गुणांचीच जास्त चर्चा होते. विधायक गोष्टी मागे पडून जातात. विचार करा जमलं तर.

No comments

Powered by Blogger.