महाआघाडीच्या सभेबाबत 10 निरीक्षणं2019 च्या लोकसभेची तयारी म्हणून पश्चिम बंगालमध्ये देशातील विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. लाखोंचा जनसागर समोर होता. केजरीवा यांच्यासारखा एरवी या महाआघाड्यांपासून अलिप्त राहणारा नेताही या सभेत होता. त्यामुळे या सभेचं महत्त्व मोठं आहे. या महाआघाडीच्या महासभेबाबत काही निरीक्षणं :

1. महाआघाडीच्या सभेत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे दिसले. मात्र, ते त्या व्यासपीठावर तोंडी लावण्यापुरते वाटले. काँग्रेसला वगळून महाआघाडी वगैरे चर्चा नको, म्हणून खर्गे तिथे होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. अर्थात, खर्गेंसारखा दिग्गज नेता हजेरी लावतो म्हणजे ठोस कारण असणार. पण तरी.

2. ज्याप्रकारे आपापल्या राज्यात ताकद राखून असलेले प्रादेशिक पक्ष एकजुटीने गाठी-भेटी घेत आहेत, महारॅली आयोजित करतायत, त्यावरुन यांची आघाडी काँग्रेसलाही धक्का द्यायला मागे-पुढे पाहणार नाही, असे वाटायला लागलंय. इन शॉर्ट, यूपीए-एनडीए सोडून तिसरी फ्रंट उभारुन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात किंवा निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात.

3. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा नेता जर महाआघाडीच्या व्यासपीठावर येत असेल, तर या महाआघाडीची मोट बांधण्यात यश मिळालंय, असे म्हणायला वाव आहे. कारण ठोस कारणं, नेमके मुद्दे, स्पष्ट भूमिका असल्याशिवाय पवार वगैरेंसारख्या मुरलेल्या राजकारण्यांच्या नादाला केजरीवाल लागणार नाहीत.

4. पश्चिम बंगालमधील महाआघाडीच्या व्यासपीठावर चार-पाच मुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते वगैरे होते. मात्र, त्यांचे वैयक्तिक राजकीय संबंध पाहता, ते कायम ताणलेलेच दिसतात. त्यात शरद पवार हेच समन्वयवादी दिसत होते. यांना जोडणारा धागा म्हणून पवारांकडे पाहू शकतो.

5. प्रत्येक प्रादेशिक पक्षाने जमेल तशा आघाड्या करुन, जमेल तसं स्वबळावर लढून, जास्तीत जास्त खासदार निवडून आणून, निवडणुकीनंतर एक व्हायचं, असा एक मानस दिसून येतो.

6. भाजप खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हेही महाआघाडीच्या व्यासपीठावर दिसले. तसे ते आधीही विरोधकांच्या व्यासपीठावर दिसले होते. मात्र, विरोधकांच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचे असणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे भाजपमधील इथर नाराजांना बळ मिळू शकतं आणि तेही पुनर्विचार करु शकतात.

7. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा अशांचा फायदा असा की, त्यांचे बोलणे लोक जास्त मनावर घेतील. कारण ते भाजपचे असून, पक्षविरोधी बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सिरियसली पाहिले जाईल. याचा फायदा विरोधकांना नक्कीच होईल.

8. महाआघाडीच्या व्यासपीठावरुन डाव्यांना लांब ठेवल्याचे चित्र होते. कालच्या सभेचं आयोजन ममता बॅनर्जींनी केल्याने डाव्यांना स्थान दिले नसावे. मात्र या नेत्यांनी विसरायला नको, देशात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम डावे करत आहेत. डाव्यांच्या शेतकरी संघटनाच मोठ-मोठाले मोर्चे काढत आहेत. त्यांना डावलत असाल, तर फटका निश्चित बसेल.

9. महाआघाडीच्या व्यासपीठावरील नेत्यांची भाषणं ऐकल्यांतर एक निश्चित आहे की, हे लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार नाहीत. निकालानंतर पक्षीय बलाबल पाहून ठरवतील. यात काँग्रेस प्रचंड मागे पडू शकतं. त्यामुळे एखाद्या प्रादेशिक पक्षाचा नेताच पुढे येऊ शकतो.

10. प्रत्यक्ष महाआघाडी आणि अप्रत्यक्ष महाआघाडी असेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. कारण जर प्रत्यक्ष महाआघाडी घोषित केली गेली, तर भाजपला आपला शत्रू ठरवणे सोपे जाईल आणि भाजप तसा प्रचार सुरु करेल. मात्र, अप्रत्यक्ष किंवा आतून महाआघाडी आणि प्रत्यक्षात स्वतंत्र ताकदीनुसार लढून नंतर एक व्हायचं, असं झाल्यास, भाजपची गोची होईल आणि नेमका कुणाला विरोध करायचा, असा गोंधळ उडू शकतो. सध्याच्या महाआघाडीचा हेतू असाच काहीसा दिसून येतो.

अर्थात, ही निरीक्षणं फार वरवरची आणि घाईची आहेत. मात्र, तरीही साधरणत: असं चित्र आहे. महाआघाडीच्या व्यासपीठवरील नेत्यांच्या राजकीय गाठी-भेटी, त्यांच्या त्यांच्या राज्यातील समीकरणे, मित्रपक्षांशी असलेले संबंध, त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वकांक्षा, दरम्यानच्या काळातील यांची भाषणं इत्यादी गोष्टींचा अभ्यास करुनच खरेतर निष्कर्ष काढायला हवे, मात्र तूर्तास कालच्या सभेतून जे वाटलं ते मांडलंय.

No comments

Powered by Blogger.