मी टू आणि माझे काही मुद्दे


१) तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. तिने पोलीस तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला. महिला आयोगाने दखल घेतली. पुढे चौकशी होईल.
२) साजिद खानवर आतापर्यंत चार महिलांनी आरोप केले. त्यात एक पत्रकार, दोन अभिनेत्री आणि एक सहदिग्दर्शिका आहे. यातल्या दोघींचे आरोप सारखे आहेत. म्हणजे कपडे काढायला सांगितले.
३) आलोकनाथ यांच्यावर आतापर्यंत तीन जणींनी आरोप केले. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी, विनता नंदा यांचाही समावेश आहे. नंदा आणि हिमानी यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे, असे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवसावरून तरी वाटत नाही.
४) बीसीसीआयच्या सीईओवर आरोप केला. ते कुण्या सिने अभिनेत्रीने नव्हे. तिथेही प्रसिद्धीचा हव्यास असण्याचा प्रश्न नाही.
५) एम जे अकबर यांच्यावर आरोप सहकारी पत्रकार महिलांनी केलेत. या पत्रकार महिलांना प्रसिद्धीची काय गरज? आणि असतीच तर त्या आतापर्यंत का गप्पा बसल्या असत्या?
ही काही मोजकी आणि बातम्यांमध्ये असलेली उदाहरणे. वरील सर्व प्रकरणे कुठल्या ना कुठल्या यंत्रणेतून चौकशीच्या फेऱ्यात येतील. म्हणजे कायदेशीर मार्गाने जातील. मग प्रसिद्धी कसली? असो.
आपण या चळवळीवर जे आक्षेप घेतले जातात, त्यावर बोलू :
१. एवढी वर्षे काय करत होतात? ---
मुळात न्याय मागण्याला ठराविक काळ कसा असू शकतो? आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, ही जाणीव झाल्यावर व्यक्त होण्यात गैर काय? आणि तसेही, पीडित महिलेला/पुरुषाला त्या वेळेला न्याय मिळेल वाटले नसावे, किंवा आरोपी इतकी ताकदवान आहे की व्यवस्थेवर दबाव टाकू शकते असे वाटले असावे, किंवा आरोपी आपले करीयर संपवू शकते असे वाटले असावे, किंवा त्या त्या वेळची आणखी काही मजबुरी असावी..... या शक्यता नाकारता कशा येतील? मध्यंतरी काही काळ गेला, हा अन्याय झाला नसल्याचा निकष कसा असू शकतो?
२. प्रसिद्धीचा हव्यास ---
आलोकनाथ प्रकरणात हिमानी शिवपुरी, विनता नंदा या पीडित आहेत, बीसीसीआय सीईओ प्रकरणात सर्वसामान्य नोकरदार महिला आहे, साजिद प्रकरणात पत्रकार आहे. समाजातील जबाबदार क्षेत्रातील महिला आणि वर्षानुवर्षे प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या महिला जर आरोप करत असतील, तर त्यांना सुद्धा प्रसिद्धीचा हव्यास म्हणून बाजूला सारायचे? आणि उडदामाजी काळे गोरे असणारच. जाहीर व्यासपीठावरील चळवळ म्हटल्यावर त्यात आपली पोळी भाजणारे काही नग असणारच. पण म्हणून संपूर्ण चळवळीला बदनाम कसे ठरवतं येईल?
३. पोलिसात/कोर्टात जा, सोशल मीडियावर का? ---
कालची घटना आहे. टाइम्स नाऊच्या क्राईम रिपोर्टरला अज्ञातांनी बेदम मारहाण केली. तो रिपोर्टर अंगावरील जखमा, रक्त तसेच घेऊन पोलिसात तक्रार दाखल करायला गेला, पोलीस त्याला उलट विचारतात, तुला मारहाण झाली कशावरून, पुरावा काय? यावरून आपल्या व्यवस्थेचे आजचे रूप दिसून येईल. मग त्यावेळी पीडित महिलांना सुद्धा असे वाटले असावे, तर नवल काय? आणि त्यावेळी काही झाले तरी आपलीच बदनामी होईल, असे वाटले असावे आणि आज सगळ्या बोलायला लागल्यानंतर अंगात धाडस आले असेल, तर चूक काय? आणि तसेही अन्याय झाला असेल, तर ते कुठल्या माध्यमातून किंवा व्यासपीठावरून व्यक्त करावे, हा मुद्दा गौण ठरायला हवा.
४. फक्त शहरातील महिला, गावाकडील महिलांचे काय? ---
ज्यांच्याकडे जे व्यासपीठ आहे, त्यावरुन त्या व्यक्त होत आहेत. काहींच्या घरात मीडिया पोहोचते आहे, काहींना सोशल मीडिया योग्य वाटतोय. पण प्रश्न असा की, ग्रामीण भागातील महिलांचे काय? हा प्रश्न पीडित महिला किंवा त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांना विचारण्याऐवजी आपल्या व्यवस्थेच्या ठेकेदारांना विचारले पाहिजे. ग्रामीण भागात दबलेला आवाज बाहेर येईल, इतकी सुरक्षित, आपलीशी वाटणारी आणि निर्धास्त करणारी यंत्रणा या शासनाने उभारली पाहिजे, असे आपण पीडित किंवा पीडितांना समर्थन देणाऱ्यांना विचारण्याऐवजी शासनाला विचारले पाहिजे.
५. बदनामी केली जाते, त्याचं काय? ---
या चळवळीचा बदनामीसाठी वापर करणाऱ्या असतीलही, पण त्यांची संख्या काय, त्या कोण आहेत, कुठल्या क्षेत्रातल्या आहेत, याची आकडेवारी आणि एकामागोमाग एक विशिष्ट एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप करणाऱ्या जबाबदार स्त्रियांची आकडेवारी काय, याची तुलना आपण करणार आहोत की नाही? इथे कायद्यांचा दुरुपयोग केला जातो, तिथे नेतृत्व नसलेल्या एखाद्या चळवळीचे काय घेऊन बसलात? आणि अर्थात, मी टू ही गंभीर चळवळ आहे, हे जाणून प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाने व्यक्त झाले पाहिजे, कुणाचीही नाहक बदनामी यातून करू नये, जेणेकरुन मूळ गंभीर आरोपांना आणि पीडितांना याचा फटका बसेल, अशी आशा आपण बाळगू शकतो. आशा यासाठी कारण ही जाहीर व्यासपीठावरील चळवळ आहे, आपण कसे नियंत्रित करणार आहोत?
शेवटी एक महत्त्वाचे... शोषितांचा आवाज स्वतंत्र होऊ लागला की शोषक खाडकन जागे होतात आणि प्रश्न उपस्थित करून पुन्हा आवाज दाबायला बघतात, हे काही नवीन नाही. आज महिलांच्या बाबतीत होतंय, काल-परवा आणखी कुठल्या तरी समूहाबाबत होत होते. एवढेच. असो.

नामदेव अंजना | http://www.namdevanjana.com/ 

No comments

Powered by Blogger.