आँधी हमारे बस में नहीं, मगर...फेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तरी अनेकांना शंका असतेच. त्यामुळेच ते इथल्या लेखनाला दुय्यम समजतात. मला ते पटत नाही. मध्यामात काम करत असताना, एवढे नक्कीच लक्षात आले आहे की सोशल मीडियाचा प्रभाव दखल घेण्याजोगा झाला आहे. कारण महिन्याकाठी किमान चार ते पाच तरी बातम्या सोशल मीडियातून आलेल्या असतात. इन शॉर्ट.. या माध्यमाचा प्रभाव आहेच.

इन जनरल न बोलता स्पेसिफिक माझ्यापुरते बोलून, ते जनरालाईज् करतो. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

फेसबुक किंवा ब्लॉगवर लिहिताना मी कुठलेही विधान करताना उथळपणा टाळतो. एखादी पोस्ट लिहिल्यावर त्यातील एखाद्या मुद्द्यावर कुणी प्रश्न विचारला, तरी त्यावर स्पष्टीकरण देण्याची तयारी ठेवतो.

मागे मी रावते, पवार, मनसेवर लिहिलेले ब्लॉग हे कित्येक संदर्भ शोधून, चर्चा करुन लिहिले होते. कारण उद्या कुणी त्यातून आपल्याला खोडून काढू नये किंवा कुणी चूक दाखवली तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद करता यावा.

माझी हुशारी वगैरे सांगण्याचा हेतू नाही. पण इथे गांभीर्याने लेखन केले जाते, हे कळावे म्हणून वरील उदाहरणे दिली. किंबहुना, मीच नव्हे, असे अनेकजण इथे सिरीयसली लेखन करतात. थोडक्यात या व्यासपीठावर सुद्धा जबाबदार लेखन केले जाते.

असे सारे असताना, सोशल मीडियावर (फेसबुक, ब्लॉग इ.) लिहिणारे वायफळ लिहितात, उथळ असते, त्यावर विश्वास ठेवू नये इत्यादी सरसकट विधाने जबाबदार लोकांनी टाळली पाहिजेत आणि या लेखनाकडे सुद्धा गांभीर्याने पाहिले पाहिजे.

मला या ठिकाणी आशुतोष जावडेकर यांचे एक विधान मुद्दाम नमूद करावे वाटते. ते म्हणतात, "सोशल मीडियातील लेखन म्हणजे साहित्याचे लोकशाहीकरण आहे." मला हे अगदी पटले आहे. इथे प्रत्येकजण व्यक्त होतो. ते चूक की बरोबर हा मुद्दा नंतर येतो. मुक्तपणे व्यक्त होता येणे, हे महत्त्वाचे. कदाचित आम्ही लिहितो ते 'अग्रलेखी' भाषेत नसेल, पण 'थेट' असते, एवढे नक्की.

सरते शेवटी तेच... व्यक्त होण्यासाठी प्रत्येक युगाचे, प्रत्येक पिढीचे एक माध्यम असते. आजच्या युगाचे, पिढीचे माध्यम सोशल मीडिया आहे, असे म्हणूया. ते स्वीकारले पाहिजे. त्यावर टीका करुन लिहिणाऱ्या मंडळींचे खच्चीकरण करु नये.

आणि हो, आमच्या लेखनाचा प्रभाव किती असेल माहित नाही. पण तरीही आम्ही लिहिणार, बोलणार आणि न पटलेल्या गोष्टींना धडका मारणारच. इथे शेवट करताना मला अझहर इनायती यांचा शेर आठवतो, त्यानेच शेवट करतो. या शेरमधून सोशल मीडियावरील लेखनामागची माझी किंवा माझ्यासारख्या अनेकांची भूमिका लक्षात येईल...
ये और बात कि आँधी हमारे बस में नहीं..
मगर चराग़ जलाना तो इख़्तियार में है..

No comments

Powered by Blogger.