के. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व'कधी भेट नाही. प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. दूर दूरचा परिचय सुद्धा नाही. दोन पुस्तकांच्या पलिकडे त्यांची पुस्तकेही वाचली नाहीत. हे नम्रपणे नमूद करतो. तरीही के. रं. शिरवाडकर या लेखकाचे माझ्या वैचारिक जडण-घडणीवर मोठे उपकार आहेत.

कॉलेजमध्ये असताना कुठल्याशा लेक्चरला आमच्या प्राध्यापिका डॉ. कुंदा प्र. नि. यांनी 'आपले विचारविश्व' पुस्तक वाचायला सांगितले होते. तातडीने कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तक मिळवलं आणि वाचलं. नंतर ते संदर्भासाठी संग्रही सुद्धा ठेवावे वाटले. म्हणून खरेदी केले.

आतापर्यंत तीनदा तरी हे पुस्तक पूर्ण वाचले असेन आणि शंभरहून अधिक वेळा संदर्भासाठी आवश्यक प्रकरणे नजरेखालून घातली असतील. जगाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या विचारधारा मोजक्या शब्दात हे पुस्तक वगळल्यास क्वचितच कुठल्या मराठी पुस्तकात असतील. किंबहुना, नाहीच म्हटले तरी चालेल.

वेद उपनिषदांपासून चिनी, इस्लामी, ग्रीक, युरोपियन तत्वज्ञानापर्यंत, मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड ते अगदी निऑम चॉमस्कीपर्यंत, महानुभाव संप्रदायापासून ते गांधींपर्यंत..आस्तिक-नास्तिक सर्वकाही. अवघ्या जगाचे तत्वज्ञान 'आपले विचारविश्व'मध्ये सामावले आहे.

जीवनाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती म्हणजे त्या समाजाच्या विचारांची गुणवत्ता - हे के. रं. शिरवाडकर यांचे विधान किती नेमकेपणाने आजच्या घडीला लागू होते. आणि असेच शतकों-शतके लागू असेल, यात वाद नाही.

ज्या ज्या वेळी माझ्या सोबतच्या माणसांनी माझ्या गंभीर लेखनाची टर उडविली, हसले, त्या त्या वेळी मला के. रं. शिरवाडकरांचे 'आपले विचारविश्व'च्या प्रस्तावनेततील पाहिले वाक्य आठवते आणि लेखन पुढे सुरु ठेवावे वाटते. ते वाक्य म्हणजे - "कुठल्याही गंभीर लेखनाची मुळे आयुष्यातील विविध अनुभवांत खोलवर रुजलेली असतात, मग ते अनुभव बौद्धिक असोत वा व्यवहारिक."

आज झुंडशाही बोकळत असताना केरंचे एक विधान इथे नमूद करावे वाटते. त्यांनी व्यक्त केलेली भीती किती विचार करण्यासारखी आहे, हे कळून चुकते. ते म्हणतात - "सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणाऱ्या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे."

मराठी वाचकांना विचारांची शिदोरी देणारा आणि अवघ्या जगाचे तत्वज्ञान समजावून सांगणारा हा लेखक आपल्यातून निघून गेला, ही मराठी विचारविश्वाची खरंच मोठी हानी आहे.

केरंना त्यांच्या भावाच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या कवितेतून बोलावेसे वाटते,
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण !

मराठी वाचकांचे विचारविश्व ज्यांनी अधिक व्यापक केले, समृद्ध केले, त्या के. रं. शिरवाडकर यांना मनापासून आदरांजली.

No comments

Powered by Blogger.