स्टेप अप रिव्हॉल्युशनकोणतीही चळवळ असो, तिला कलेची साथ मिळाली, तर तिची तीव्रता दसपटीनं वाढते. आणि एखाद्या चळवळीचं माध्यमच कला असेल, तर?.. तर मग चळवळीची उंची नक्कीच दखल घेण्यासारखी असते. याबाबत इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टेप अप रिव्हॉल्युशन' या हॉलिवूडपटाचा विषयही असाच आहे आणि याच सूत्रावर आधारलेला आहे. मॉब डान्सच्या माध्यमातून आपली राहती वस्ती वाचवण्याचा यशस्वी लढा काही तरुण देतात.. त्यांची ही कहाणी.

आज वीक ऑफ होता, म्हणून यूट्यूबवर सर्च करताना, हा सिनेमा समोर आला. थोडा वेगळा वाटला म्हणून पाहत गेलो आणि खरंच एका मस्त विषयावर बनवलेला सिनेमा पाहता आला. हिंदीत डब केला गेलाय. त्यामुळे भाषेचा अडसर आला नाही. मोजून 99 मिनिटांचा सिनेमा आहे, त्यामुळे कंटाळवाणाही वाटला नाही.

मॉब डान्स हा सिनेमाचा विषय असला तरी त्यातील लव्ह स्टोरी, ड्रामा कमी नाहीय. मात्र त्यावर फार वेळ खर्च केला गेला नाही. विषयाला धरुन सिनेमा पुढे नेला जातो. त्यामुळेच कुठे कंटाळवाणं वाटत नाही.

दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावर मियामी नावाचे शहर वसले आहे. या शहरात या सिनेमाचं कथानक फिरतं. इथल्या एका हॉटेलमध्ये काही तरुण काम करत असतात. डान्सची आवड असलेले हे तरुण ट्राफिक असो किंवा कुठला कार्यक्रम, तिथे मॉब डान्स करतात आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. त्यातून पैसे कमावणे हा हेतू असतो. सीन नामक तरुण त्यांचा मुख्य असतो.

पुढे सीन आणि त्याचे मित्र ज्या भागात राहतात, त्या म्हणजे मियामी कोस्टवर बिल अँडरसन नामक बिल्डारची नजर पडते आणि तिथे आलिशान हॉटेल बांधण्याची कल्पना त्याला सुचते. अर्थात, यात सीन आणि त्याच्या दोस्तांची राहती वस्ती जाणार असते.

ज्या मॉब डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करुन पैशासाठी वापर केला जायचा, त्याचाच या बिल अँडरसन विरोधात आवाज उठवण्यासाठी का वापर करु नये, अशी कल्पना सीनची गर्लफ्रेंड एमिली सुचवते. इथे थोडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती म्हणजे, ही एमिली बिल्डर असलेल्या बिल अँडरसनची मुलगी असते. हे जेव्हा सीनच्या ग्रुपला कळते, त्यावेळी अर्थात थोडी वादाची ठिणगी पडते. मात्र तिथूनही थोडी खटापट होऊन पूर्ववत होतं. नंतर वस्तीत हॉटेल बांधण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आखला जातो, तिथेच सीन आणि त्यांचा ग्रुप मॉब डान्स करुन त्या माध्यमातून आपली भूमिका मांडतात. आणि बिल्डर बिल अँडरसनला झुकायला भाग पाडतात. अशी थोडक्यात या सिनेमाची स्टोरी आहे.

'One step can change your World' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. ती किती नेमकी आहे, हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येते.

Ryan Guzman (सीन), Kathryn McCormick (एमिली), Peter Gallagher (बिल्डर बिल अँडरसन), Misha Gabriel (सीनचा मित्र) ही महत्त्वाची स्टारकास्ट. यापलिकडेही अनेकांच्या छोट्या-मोठ्या भूमका आहेत. त्याही अर्थात उल्लेखनीयच आहेत. स्कॉट स्पिर याने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय.कॅमेरा, एडिटिंग वगैरे गोष्टी कशा आहेत, यावर मी बोलणार नाही. कारण त्यातले मला कळत नाही. पण विषयाचे म्हणाल, तर एक उत्तम विषय आहे. स्टार्ट टू एन्ड कुठेही बोअरिंग वाटत नाही. सिनेमा यूट्यूबवर अव्हॅलेबल आहे. नक्की पाहा.

No comments

Powered by Blogger.