मुंबईतील 'लेनिनग्राड'यंदाचं वर्ष कम्युनिस्टांसाठी तसं अनेकार्थाने स्मरणीय असे आहे. त्यातल्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकेकाळी टर्निंग पॉईंट ठरलेल्या वगैरे. एक म्हणजे अर्नेस्ट चे गव्हेराचा 50 वा स्मृतीदिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर क्रांतीला एक शतक पूर्ण होतंय. दोन्ही अत्यंत महत्त्वाचे टप्पे डाव्यांसाठी आहेत. ऑक्टोबर क्रांतीमुळे प्रेरणा, तर चे गव्हेराच्या हत्येने मोठा लॉस.. अशा दोन्ही अंगाने हे वर्षे महत्त्वाचे आहे.

आता दोन्ही गोष्टींच्या खोलात शिरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी माहित आहेत. किंवा इतिहासाच्या पानांमधून कधीतरी शालेय जीवनात वगैरे डोळ्याखालून गेलेल्या आहेत.

आजचा विषय वेगळा आहे. परवा दादरला भुपेश गुप्ता भवनात गेलो होतो. हे भूपेश गुप्ता भवन 'लेनिनग्राड' चौकात आहे. म्हणजे तुम्हाला कळलं ना, कुठे आहे ते? आताच्या ओळखीने सांगायचं तर, सिद्धिविनायक मंदिराला वळसा घालून तुम्ही रवींद्र नाट्य मंदिराकडे गेलात की, जे मोठं चौक लागतं तेच 'लेनिनग्राड चौक'. रस्ता क्रॉस केल्यावर उजव्या बाजूची तीन-चार मजली जी इमारत आहे, ते भूपेश गुप्ता भवन आहे.

या परिसरात अनेकदा आलोय. कधी रवींद्र नाट्य मंदिरात, तर कधी भूपेश गुप्ता भवनात. 'लेनिनग्राड'चं नाव पाहिलं की वारंवार प्रश्न पडायचा, हे नाव इथे देण्यामागचं कारण काय असावं? तसा अंदाज होताच की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा काही काळ असो, डाव्यांचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात होतं. मात्र नंतरच्या काळात ते नेतृत्त्वाच्या अभावात नाहिसं झालं. त्यामुळे ते कारण असावं. मात्र खात्री नव्हती.

परवा भूपेश गुप्ता भवनात पुस्तकं आणायला गेलो होतो. लोकवाड:मयची. पुस्तकं घेतल्यानंतर तिथल्याच कम्युनिस्ट ऑफिसमध्ये काही वेळ बसलो. 'युगांतर'ची मागील चार-पाच अंक नजरेखालून घातली आणि निघालो. खाली आल्यानंतर कळलं की, कॉम्रेड राजन बावडेकर आहेत इथे. मग पुन्हा दुसऱ्या मजल्यावर गेलो.

कॉ. राजन बावडेकर अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व. डाव्या चळवळीबद्दल तळमळ असणारं नि चळवळीच्या वैचारिक अधिष्ठानाची चिंता असणारं व्यक्तिमत्त्व. भूपेश गुप्ताला सेकंड फ्लोअरला त्यांची केबिन आहे. अगदी जुन्या ऑफिसटाईप. फार शोबाजी नाही. एका भिंतीवर चे गव्हेराचा फोटो. बाकी पुरस्कार वगैरे आणि टेबलावर वेगवेगळ्या पुस्तकांसोबत युगांतरचे अंक जागच्या जागी ठेवलेले.

लोकवाड:मयकडे अनेक जुनी दुर्मिळ पुस्तकं आहेत. अशी पुस्तकं ज्यांची पुन्हा आवृत्ती निघालीच नाही किंवा निघणं शक्य नाही. ही पुस्तकं लोकांपर्यंत कशी पोहोचवावी, यावर आम्ही चर्चा करत होतो. काय करता येईल, तुला काही सूचतंय का वगैरे चर्चा सुरु होती. मग ऑक्टोबर क्रांतीची चर्चा निघाली. मग पेडर रोडच्या रशियन सेंटरमध्ये जाऊन ये एकदा वगैरे त्यांनी सांगितलं. असं सर्वकाही चर्चा, वाद-विवाद सुरु होते. तेवढ्या माझी नजर केबिनमधील खिडकीतून बाहेर गेली आणि मला पुन्हा 'लेनिनग्राड चौक' आठवली. बावडेकरांची खिडकी लेनिनग्राड चौकाकडे आहे.

कॉ. बावडेकरांना लेनिनग्राड चौकाबद्दल विचारलं. म्हटलं, "हे इथे कसं काय? आणि शिवसेना तशी कम्युनिस्टांच्या कट्टर विरोधातली आणि त्यांचीच कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता आहे. तरीही इथे लेनिनग्राडचं फलक राहिलं कसं?"

भूपेश गुप्ता भवनच्या काही अंतरापासून दक्षिण मुंबईची हद्द सुरु होते. त्यामुळे तसा हा भाग अॅक्चुअल मुंबईच्या सीमेवरचा. इथला काही भाग तडीपार एरिया म्हणूनही प्रसिद्ध होता. थोडं पुढे चालत गेलं की गिरण्या सुरु व्हायच्या. फार काही डेव्हलपमेंट नव्हती. इथे डाव्यांनी भूपेश गुप्ता भवनची जागा घेऊन ठेवली होती. 1960 च्या वगैरे काळात. नंतर सुरुवातीच्या काळात डाव्यांचं वन ऑफ द हेड म्हणूनही या जागेकडे पाहिलं गेलं. कॉ. डांगे वगैरे मंडळींनी डाव्यांच्या हक्काचं प्रसारमाध्यम असावं म्हणून प्रेस सुरु केली. लोकयुग, युगांतर वगैरे.

नंतर ज्यावेळी इथे बऱ्यापैकी रहदारी वाढली, त्यावेळी चौकेला नाव देण्याची वेळ आली. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने आणि त्यावेळी डाव्यांना राजकीय पाठबळही बऱ्यापैकी होतं, त्यांनी 'लेनिनग्राड चौक' असं नाव दिलं.

मुंबईत फार कमी ठिकाणं उरलीयेत, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच म्हणूया हवं तर, जी कम्युनिस्टांची ओळख जपतायेत. त्यातील लेनिनग्राड चौक आणि भूपेश गुप्ता भवन हे आहेत. त्यामुळे याचं महत्त्वं तसं नक्कीच अधिक आहे.

आणि अर्थात, या लेनिनग्राड चौकेचं रशिया आणि लेनिनशी संबंध आहेच. रशियातील आताचं सेंट पीटर्सबर्ग म्हणजेच 1924 ते 1991 या काळातलं लेनिनग्राड शहर होय. स्वीडनसोबतच्या युद्धात 1703 साली रशियाने नेवा नदीवरील ही जागा जिंकली. त्यानंतर झार, पीटर वगैरेंनी या जागेला राजधानी केली. रशियाचं हे सत्ताकेंद्र पुढे रशियन राज्यक्रांतीनंतर डाव्यांनी मॉस्को हलवलं. 1924 साली या जागेला लेनिनग्राड नाव दिलं होतं. पुढे 1991 ला सेव्हियतच्या पतनानंतर पुन्हा सेंट पीटर्सबर्ग नाव देण्यात आले.

त्यामुळे रशियन राज्यक्रांती, लेनिन, डावी विचारसरणी अशा सर्वांचा इतिहास सांगणारा हा चौक मुंबईत आहे. तसा दुर्लक्षितच. पण चौकेबद्दल अनेकांनी कुतुहल व्यक्त केलं होतं. म्हणून थोडं लिहिलं.

No comments

Powered by Blogger.