छोटी सी बातपुन्हा 'छोटी सी बात' पाहिला. अरुण, प्रभा आणि त्यांच्यात लुडबूडणारा नागेश. अनुक्रमे अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि असरानी. यांच्यात कथानक फिरवत अत्यंत शांतपणे शेवटाकडे जाणारा हा एक सुरेख सिनेमा.

कर्नल अर्थात माझे मोस्ट फेव्हरेट अशोक कुमार यांची एन्ट्री मिड हाफनंतर असली तरी अत्यंत महत्त्वाची भूमिका. किंबहुना व्हेरी व्हेरी इंपॉर्टन्ट.

गावाकडून मुंबईत आल्यानंतर ज्या टाईपचे आपण असतो, तसा अगदी साधा आणि आठ तास नित्यनेमाने ऑफिसला जाणारा अरुण. मग त्याला रोज बस स्टॉपवर भेटणारी प्रभा. तिच्याबद्दल आकर्षण. मग प्रेम. मात्र धाडस होत नसल्याने होणारी चलबिचल. त्यात नागेशची लुडबुड. आणि निराशा.

अखेर कर्नल अर्थात अशोक कुमार यांची एन्ट्री. मग त्यांच्या अरुणला मिळालेल्या टिप्स. त्यातून अरुणची बदललेली स्टाईल. आधीपासूनच प्रेमात असलेल्या प्रभाला इंप्रेस करण्यात अरुण यशस्वी होतो. मग थोडा एन्डचा इंटरेस्टिंग सीन. एक्साइटमेंट वगैरे वाढवतो. आणि व्ह्यायचे ते होते. म्हणजे अर्थात, अरुण आणि प्रभाचे मिलन. बरं यात विद्या सिन्हा खूपच म्हणजे खूपच सुंदर दिसते.

मी फार काही सिनेमे वगैरे पाहत नाही. त्यामुळे त्यावर लिहायला काही आपल्याला जमत नाही. एवढ्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात नसतील मला आल्या. पण जुनी मुंबई, त्यावेळची शांतता प्रेमात पडणारी आहे.

डायलॉग वगैरे इतरांचे फार खास आहेत, अशातला भाग नाही. पण अशोक कुमार यांच्या तोंडी असलेले ऐंशी टक्के डायलॉग फिलॉसॉफीकल आहेत. ऐकताना भारी वाटतात. साला असा कुणी कर्नल खऱ्या आयुष्यात भेटला, तर खरे प्रेमही जुळतील, अन् ब्रेकअप व्हायचे थांबतीलही. असो.

यातली दोन्ही गाणी प्रचंड आवडतात. अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण. त्यातले पहिले 'जानेमन जानेमन'. याला आशा भोसले आणि येसुदास यांचा आवाज आहे. दुसरे गाणे अफाट सुंदर आहे. ते म्हणजे 'न जाने क्यू' हे गाणे. लता मंगेशकर यांचा आवाज आहे या गाण्याला. या दोन्ही गाण्यांना सलील चौधरी यांनीच संगीत दिले आहे आणि गीतकार योगेश यांनी लिहिले आहेत.

बासू चटर्जी या अफलातून माणसाने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. बासूंचे सगळेच पिक्चर आवडतात. म्हणजे जेवढे पहिले तेवढे. अमोल पालेकर यांच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा मराठी माणूस या सिनेमाशी जोडला आहे, तो म्हणजे व्ही. एन. मयेकर. त्यांनी एडिटिंग केलीय. अगदी उत्तम.

अमिताभ बच्चन यांचा काही सेकंदाचा सीन, धर्मेंद्र-हेमा मालिनी जोडीचा काही मिनिटांचा डान्स. हेही आहेच.

मारामारी नाही, राग-संताप वगैरे नाही, तोडफोड नाही, आवाज चढवून बोलणे नाही, गर्दी नाही, गाण्यांचा नि नाचाचा गोंधळ नाही... सर्व कसं शांत आणि निवांत.

No comments

Powered by Blogger.