आपण फक्त एवढंच करुया...काल गांधींबद्दल काहीच लिहिले नाही. कारण गांधीवादी आणि गांधी विरोधक अशा दोन्हीकडून रणकंदन सुरु होतं. एकीकडे गांधी पटवून देण्याची धडपड दिसली, दुसरीकडे गांधींना चूक ठरवण्याचीही धडपड दिसली. मुळात गांधी पटवून देण्याची गोष्ट नाही. विवेकी आणि शांतताप्रिय माणसाला गांधी पटतोच. आणि चूक ठरवण्याची धडपड तर गांधी असल्यापासूनची आहे. त्यावर न बोललेलेच बरे.

प्रश्न असा आहे की, गांधींचा विरोध करता करता, अन् नथुराम गोडसेचं समर्थन करता करता, अनेकजण वधाच्या नावाखाली हत्येचं सुद्धा समर्थन करत आहेत. आपण इतक्या विखारात अन् असंस्कृत देशात वावरतो आहोत का, जिथे हत्येचं इतक्या उघडपणे समर्थन केले जाते?

गांधी की गोडसे हा वादाचा विषय कसा होऊ शकतो? निशस्त्र वृद्धाची हत्या करणाऱ्याला सहानुभूती कशी दिली जाऊ शकते? दिली जात असेल, तर सहानुभूतीदारांच्या मेंदूच्या तपासणीची नितांत गरज आहे. कारण हे मेंदू देशाला हिंसेच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक संतोष शेणई सरांचं एक वाक्य मला आठवतंय. मागे एका ग्रुपवर चर्चा सुरु असताना त्यांनी गांधी-गोडसे वादावर छान वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले - 'गांधी' हा विचार आहे, त्याची बांधिलकी मानता येते किंवा नाकारता येते. पण 'नथुराम' हा विचार नाही, ती विकृती आहे, ती केवळ नाकारताच येते.

या देशात गांधीवाद समजलेला नसूनही गांधीवादी असल्याचे सांगणारे जसे खोऱ्याने आहेत, तसेच केवळ कुणीतरी सांगितले म्हणून गांधीला विरोध करणारे सुद्धा खोऱ्याने सापडतील. हल्ली तर त्या शरद पोंक्षेंचे नाटक बघून सुद्धा गांधींचा विरोध करणारे वाढलेत. हे एक अजब आहे. केवळ नाटक पाहून, भारावून जात विरोध करणे. असो.

एखादा मुलगा आपल्या आई-वडिलांना त्रास देतो, त्याला ते नकोसे होतात. म्हणून त्यांना बाजूला करतो. त्याचवेळी आई-वडील नसणाऱ्यांना मात्र त्याच आई-वडिलांची किती आपुलकी असते. ओढ असते. त्याला ते हवे असतात. कारण त्याने आई वडिलांचे प्रेम अनुभवलेले नसते.

गांधींचे सुद्धा तसेच आहे. या देशाने गांधींना बाजूला केले, तरी जगातल्या कित्येक देशांना गांधी हवाच आहे. कारण त्यांना गांधींच्या विचारांची ताकद माहित आहे. असो.

येत्या काळात केवळ संघ किंवा भाजपचा विरोध म्हणून गांधींना आपलंसं करणारे वाढतील आणि अर्धवट माहितीवर गांधींना विरोध करणारेही वाढतील. अशा उथळ गोंधळात आपण फक्त एवढंच करुया - अहिंसा आणि सत्य ही तत्व जोपासणारा गांधी जपूया.

No comments

Powered by Blogger.