किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है...काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला सहाव्या रांगेत बसवलं गेलं. हे निषेधार्ह तर आहेच. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या मुजोर अन् अहंकारी मानसिकतेचं नागडं रुप दाखवणारं आहे. सत्तेत इतके मंत्रीही नाहीत, की पहिली रांग भरुन जावी. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षासाठी पहिल्या रांगेत खुर्ची मिळू नये?

त्यात आणखी एक मुद्दा असाय की, राहुल गांधींकडे शासकीय पद नाही. मात्र मग त्यावेळी प्रश्न असा येतो की, अमित शाहांकडे कोणतं शासकीय पद आहे, जेणेकरुन त्यांना पहिल्या रांगेतील खुर्ची बहाल करण्यात आली?

आणि तसेही एरवी प्रोटोकॉलची ऐशी-तैशी करुन कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्या राष्ट्रांच्या अध्यक्षांना मिठ्या मारल्या जातात, मग इथे तर आपल्याच देशातील पक्षाचा अध्यक्ष होता ना. इथे असे काय झाले की, पहिल्या रांगेतही स्थान दिले नाही.

असो. मुद्दा केवळ मानसिकतेचाही नाही, तर संस्कार, संस्कृती आणि परंपरेचाही आहे. कारण या गोष्टी केवळ बोलण्याच्या नसतात, त्या आचरणात आणायच्या असतात. मात्र विद्यमान सत्ताधारी केवळ या गोष्टी बोलण्यापुरते ठेवतंय. आचरणाच्या नावाने बोंब आहे. हेही असो.

याही पुढे जात एक गोष्ट भयंकर आहे, ती म्हणजे विरोधीपक्षांबाबतचा दृष्टीकोन. सत्तेला स्पर्श झाला की सत्ता अंगात शिरते, डोक्यात भिणते आणि मग वर्तनातून दिसू लागते, अंस म्हणतात. पण ती सत्ता अवघ्या तीन-साडेतीन वर्षात शिरेल-भिणेल-दिसेल असं वाटलं नव्हतं.

गुंगी गुडिया ते दुर्गा, असा बदल याच भाजपच्या तत्कालीन नेतृत्त्वाला करावा लागला, असे काँग्रेसचे राजकारण आहे. याच काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्त्वाने विरोधी पक्षातील अटलजींना यूएन डेलिगेशनमध्ये पाठवलं होतं. विरोधी पक्षांचा आदर करण्याची परंपरा पक्षीय नेतृत्वाच्या रक्तात असावी लागते. याही असेल. नाही असे नाही. मात्र ती दिसून येत नाही.

विरोधी मत जुमानणारच नाही, ही विद्यमान सत्ताधाऱ्यांची मानसिकताच भयंकर आहे. हुकूमशाही वगैरे टाईप आहे की नाही, ते माहित नाही, पण मुजोरीशाही नक्कीच आहे.

असो. या अहंकरी सत्ताधाऱ्यांसाठी राहत इंदौरी साहेबांच्या कवितेतील चार ओळी नेमक्या लागू होतात. त्या अशा :

जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है
सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है

No comments

Powered by Blogger.