पाईपलाईनलहानपणी कधी मुंबईत एसटीने यायचो, त्यावेळी रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे फारच कुतूहल वाटायचे. अत्यंत सहज पळायच्या. एखाद्या सापासारख्या वळवळत. नागमोडी वळणे घेत. गाडीच्या वेगाने सुसाट.

एखाद्या सुंदर मुलीच्या कपाळावरील केसांचा झुपका ज्या लयीत तरंगत असतो ना, तशा लयीत पाईपलाईन दोन छोट्याशा टेकडीवर तरंगताना दिसायच्या. एखाद्या अडवळणाला सहज वळसा घालत आपल्या सोबत पुढल्या प्रवासाला यायच्या.

कधी एखाद्या करवंदीच्या जाळीत लपत छपत, कधी उजाड माळरानावर एकटीच सळसळत... कधी कधी तर सिमेंटच्या भिंतीची बंधनं तोडत बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या झाडासारखी ती पाईप लाईन कुठल्यातरी कठड्यातून बाहेर यायची... किती कौतुक वाटायचं तिचं!

का धावत येत असेल आपल्यासोबत? कुठे जात असेल ती? कुणाला भेटायला तर जात नसेल? आणि जात असेल, तर कुणाला भेटायला? तिचा कुणी सखा?... नाना प्रश्न पडायचे.

प्रवासात आपल्याला कधी तहान लागेल, म्हणून त्या पाईप लाईन आपल्यासोबत रस्त्याने येत असाव्यात, असेही वाटून जायचे कधी कधी. अन् मग असे वाटून, तिच्याबद्दल प्रचंड आदर वाटायचा, आपुलकी वाटायची.

मग शहर जवळ आलं की, पाईपलाईन गायब व्हायची. कुठे गेली, म्हणून नजर तिला शोधत बसायची. इतक्या प्रवासात ती सोबत असायची. तीही आपल्यासोबत मुंबईला येतेय, असं वाटायचं. मग दिसेनाशी झाली की वाईट वाटायचं. आणि काही वेळाने, ती तिच्या घराकडे गेली असावी, असे म्हणत तिला पुढल्या प्रवासापर्यंत विसरुन जायचो.

एखाद्या पाण्याच्या पाईपलाईन सोबतही आपले ऋणानुबंध जुळावे. किती अप्रूप करणारी गोष्ट वाटते आता. पण एक नक्की, निर्जीव गोष्टी कधीच विश्वासघात करत नसतात. त्या फक्त मैत्री निभावतात. त्या कधीच बदलत नाहीत. त्यांच्याशी झालेली मैत्री चिरंतर असते.

No comments

Powered by Blogger.