तहसील ऑफिसातला कवीसातबाऱ्याशी संदर्भात माहितीसाठी आमच्या रोहा (रायगड) तहसील ऑफिसला गेलो होतो. तसे तिकडे जाणे फार होत नाही. पण हल्ली फेऱ्या वाढल्यात. काम झाल्यावर निघालो. तळमजल्यावर बाहेर जाणाऱ्या गेटजवळ एका व्यक्तीने थांबवले आणि विचारले, "तुम्ही नामदेव अंजना ना?"

मी आचंबित होत होकारार्थी मान डोलावली. थोडा गोंधळलो. कारण या व्यक्तीला मी तर कधी भेटलो नव्हतो. मी काही विचारायच्या आधीच त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली. ते होते रोहा तहसील ऑफिसमधले अधिकारी. कूळवहिवाट विभागाचं काम ते पाहतात.

"माझी ओळख कशी?", असे विचारण्याआधीच त्यांनी सांगितलं, "तुमचं लेखन वाचतो, छान लिहिता." खरंतर लेखनामुळे जोडली गेलेली माणसे कमी नाहीत. पण हे व्यक्तिमत्व काहीसे वेगळे होते.

तहसील ऑफिसच्या गेटपाशी उभ्या-उभ्या झालेली ती १०-१५ मिनिटांची भेट. पुढे खूप दिवस भेट झाली नाही. पण माझ्या नीट लक्षात होतं. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गावी गेलो, तेव्हा खास वेळ काढून तहसील ऑफिसला जाऊन, दुसऱ्या मजल्यावर डोकावलो.

खरंतर कार्यालय जरी चकचकीत असले, तरी आजूबाजूला लालफितीने बांधलेल्या जुनाट फाईली, सारख्या फेऱ्या घालाव्या लागतात म्हणून त्रासलेल्या लोकांच्या रांगा, गप्पा मारत काम करणारे कर्मचारी आणि तहसीलदार असल्याच्या आवेशात फिरणारे ऑफिस बॉय किंवा शिपाई वैगरे. या साऱ्या महौलात कुणाला कविता वैगरे सुचेल याची सुतराम शक्यता वाटणार नाही. पण इथल्या एका व्यक्तीने या साऱ्या शक्यता चूक ठरवत, कवितांची आवड जोपासली आहे, नुसती जोपासली नाही तर कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित केला आहे. रोहा तहसील ऑफिसमधील या कवीचे नाव आहे संजय माने.

संजय माने सर हे सध्या रोहा तहसील ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. अत्यंत सहृदयी आणि विनम्र व्यक्तिमत्व. साहित्याची प्रचंड आवड आणि नवनवीन काही करण्याची ओढ. त्यामुळे अशा व्यक्तीची भेट होऊन ते माझ्या मित्रसंग्रहात येणार नाहीत, असे कसे होईल?

यावेळच्या भेटीत तर आम्ही तहसील ऑफिसमध्येच मैफल भरवली. चाय पे कविता वैगरे टाईप. लालफितीच्या गराड्यात काव्याची मैफल बहुधा पहिल्यांदाच भरली असावी. त्यात संजय माने यांच्या भावणाऱ्या आणि भिडणाऱ्या अर्थपूर्ण कविता. वाह...!

'अनुराधा' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रेमाचा चेहरा आणि प्रेमाचाच आत्मा असलेल्या या कविता मनात घर करतात. ओळीगणिक दाद द्यावी वाटते. प्रेम, निसर्ग, नाती, भावना इत्यादी गोष्टी संजय माने यांच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतात.

प्रेम शब्दाचा अर्थ मांडताना त्यांनी लिहिलेल्या एका कवितेतील या ओळी किती नेमक्या आहेत पाहा :
"विश्वासाच्या चिरेबंदी पायावर
आपुलकीच्या मजबूत भिंती
त्यावर एकमेकांच्या काळजीचं
चांदणं पांघरणारं छप्पर"

सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द आपल्या झोळीत घेऊन फिरणाऱ्या आणि भेटलेल्या प्रत्येक वाटाड्याला सकारात्मक करणाऱ्या या माणसाला भेटून प्रचंड आनंद झाला. वयाचे प्रचंड अंतर असले तरी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधणारे संजय माने नामक सृजनशील व्यक्तिमत्व नक्कीच माझ्या मित्रसंग्रहातील हिरे आहेत.

No comments

Powered by Blogger.