जीजी...समाजवादी कसा दिसतो, हे चित्ररुपाने कुणाला सांगायचं झाल्यास, मी जीजींचा फोटो समोर करेन. पांढरीशुभ्र दाढी, खादीचा कुर्ता, पायजमा, चेहऱ्यावरील मनमिळाऊ भाव आणि बोलण्यातील कमालीची आपुलकी....

कालच म्हणजे 30 तारखेला जीजींनी वयाची 93 वर्षे पूर्ण केली. इतक्या खाच-खळग्यांचा, आड-वळणांचा प्रवास असताना, आजही जीजी 'वृद्ध' झाले नाहीत. ते वाढत्या वयानुसार आणखी नव्या उमेदीने विचार मांडतात, बोलतात. त्यांच्यातला उत्साह थक्क करणारा आहे.

1940 साली जीजी परीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या 16 वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. 1942 च्या 7 आणि 8 ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी 'छोडो भारत'ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रीयपणे लढ्यात उतरले.

स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जीजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं. 18-19 वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा 10 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले.

1947 साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई भागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. त्यामुळे ते राजकीय पक्षापासून फारकत घेत, पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला आणि पक्षीय राजकारणापासून दूर राहत लोकांसाठी ते कायम लढत राहिले.

सहकारी चळवळी असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जीजींचं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार-समारंभ-गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोसो दूर राहिले. आपल्या सत्ताकेंद्रांनाही जीजींची महती कळली नसावी. हे जीजींचं दुर्दैव नव्हे, तर आपले दुर्दैवं आहे.

आज खादीचा प्रचार-प्रसार आपणच सुरु केल्याचा आव आणत काहीजण चरख्यासोबत फोटो-बिटो काढतात. अशांना आठवण करुन द्यावी वाटते, जीजींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. ते आजही खादीचे कपडे परिधान करतात. 1970 च्या दशकात तर त्यांनी 'Make Khadi a fashion' हा विचार मांडला होता.

30 डिसेंबर 1924 रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्र नगरमध्ये जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली. इथेच ते राहिले. त्यांचं अविरत सुरु असलेलं कार्य आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे युसुफ मेहर अली सेंटर. पनवेलजवळील तारामध्ये आहे. तिथे गेल्यावर आपल्याला कळून येतं की, ग्रामस्वराज्याची कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येते.

याच युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये जीजींना भेटण्याचा योग आला होता. गांधींजी आणि विनोबा भावेंसोबत काम केलेल्या या व्यक्तीसोबत बोलताना अवघडल्यासारखं झालं होतं, पण जीजींनी बोलण्यातून असे काही आपलसं केलं की, आमची जन्मोजन्मीची ओळख असावी. आपल्याकडे असलेली माहिती, अनुभव आणि विचार समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांची उत्सुकता, आवड आणि तळमळ वाखणण्याजोगी आहे.

जीजींनी काल वयाची 93 वर्षे पूर्ण केली. जीजी, तुमच्या निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

No comments

Powered by Blogger.