संमेलनाच्या नोंदी (भाग तीन)चंद्र-सूर्य-तारे यांच्या पलीकडे जात, आपल्या कवितेतून ठाम अशी भूमिका घेत, आपल्या आणि समाजाच्या जगण्यातील खाच खळगे, भोवतालाचे पडसाद इत्यादी गोष्टी नीरजा यांच्या कवितेचं आशय सूत्र. किंवा त्यांच्या कवितेतून डोकावतात, नव्हे स्पष्टपणे जाणवतात. अशा संवेदनशील आणि पुरोगामी विचारांच्या कवयित्रेचा लळा माझ्यासारख्या तरुण वाचकाला लागणार नाही, असे कसे होईल?

महानगर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सुजाता पाटील म्हणाल्या, “ज्यांच्यामुळे मी साहित्यिक म्हणून घडले, त्या नीरजा यांनी इथे उपस्थिती लावल्याने मला प्रचंड आनंद होतोय.” खरंतर माझ्याही भावना तशाच होत्या. महानगर साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नीरजा यांना ऐकण्याची संधी मिळणार होती. नुसते विचार नव्हे, त्यांची कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मिळाली.

मी ज्या जिल्ह्यातून येतो, त्या रायगडची ओळख सांगताना ज्यांची नावं पटकन सांगतो, त्यात एक नाव कवयित्री नीरजा यांचेही असते.

नीरजा यांनी महानगर मराठी साहित्य संमेलनात कवितांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवले. नावाला अध्यक्षपद खांद्यावर न घेता, ज्या कवींनी कविता सादर केल्या त्यांचं थोडक्यात विश्लेषण सुद्धा नीरजा यांनी केलं. या विश्लेषणाला टीकेचा सूर नव्हता, तर समजूतदार शब्दांचा मुलामा होता. किती नेमक्या शब्दात त्यांनी संजय चौधरी, नामदेव कोळी आणि आप्पा ठाकूरांच्या कविता, गझलेचं चालता-बोलता समीक्षण केलं. वाह!

नीरजा व्यासपीठावर बोलत असातना, माझ्या बाजूला बसलेले कवी नामदेव कोळी मला म्हणाले, “नीरजा यांच्यासारख्या कवयित्रीच्या तोंडून आपल्यासाठी कौतुकाचे दोन शब्द यावेत, हे माझे अन् माझ्या शब्दांचे भाग्य आहे. एखादा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतं.”. खरंच, नीरजा यांच्याबद्दल नव्या पिढीच्या कवींमध्ये अशीच भावना आहे. त्यांनी ती भावना आपल्या लेखनातून कमावली आहे.

नीरजा यांच्या भाषणावेळी जेव्हा जेव्हा टाळ्या वाजत होत्या, तेव्हा तेव्हा मी बसलेलो त्या मागच्या-पुढच्या रांगेतून, आजू-बाजूहून कौतुकाचे शब्द नीरजांप्रती ऐकायला मिळत होते, त्या त्या वेळी मला अभिमान वाटत होता. आपण ज्या जिल्ह्यातून येतो, तिथल्या माणसाचे असे कौतुक नेहमीच अभिमानास्पद वाटते.

नीरजा यांनी समारोपाचं भाषणही उत्तम झालं. अत्यंत धाडसी होतं भाषण. “रायगड पट्ट्यात, जिथे विवेकी विचारांची मोठी परंपरा होती, तिथे आज कपाळावर टिळे लावत जथ्थेच्या जथ्थे रस्त्याने जाताना दिसतात. ब्राम्हण आणि दलित स्त्रिया या जोखडातून बाहेर येण्यासाठी धडपडत असताना, बहुजन वर्ग मात्र पुन्हा त्याच गुलामगिरीच्या आणि प्रतिगामी शक्तींच्या जोखडाखाली जाऊ पाहतोय.”, अशी मांडणी नीरजा यांनी यावेळी केली. समोर एवढा मोठा सामुदय असताना, जाहीर व्यासपीठावरुन अशी भूमिका मांडण्याचं धाडस नीराज यांच्यासारख्या कवयित्रीने केलं. साहित्यिक भूमिका घेत नाहीत, म्हणणाऱ्यांनी नक्कीच या भाषणाची दखल घ्यायला हवी.

संमेलन संपल्यावर नामदेव कोळी यांनी माझी आणि नीरजा यांची भेट घालून दिली. अगदी काही सेकंदांची भेट झाली. दोन शब्द त्यांच्याशी थेट बोलता आले. तो क्षण जपून ठेवावा म्हणून एक फोटोही काढला. सोबत बाजूलाच उषा तांबे होत्या. दोन लेखिका आणि मी वाचक. किती मस्त क्षण बंदिस्त झालाय. नीरजा यांच्यासारख्या आवडत्या लेखिकेची भेट, तीही साहित्याच्याच प्रांगणात, अन् आमच्याच जिल्ह्यात होणं, हा सुवर्ण क्षणच.

पुढील भागात महानगर साहित्य संमेलनातून माझ्या किताबखान्यात आलेल्या पुस्तकांविषयी..

No comments

Powered by Blogger.