इतिहासाचं क्लिनिकआपल्या आयुष्याच्या अकाऊंटमध्ये अशी काही माणसं असतात, ज्यांच्याकडे जगणं समृद्ध करणाऱ्या गोष्टींचा खजिना असतो. आणि या माणसांना आपण जेव्हा कधी भेटतो, तेव्हा तेव्हा ते आपल्याला समृद्ध करत असतात. अशा माणसांप्रती कधी अभिमान वाटतो, कधी कमालीचं अप्रूप वाटतं, कधी प्रचंड कौतुक वाटतं, कधी पराकोटीचा आदर वाटतो, तर कधी हे सारं एकत्रित वाटतं. आमच्या रोह्यात (रायगड) डॉ. श्रीनिवास वेदक नामक असेच एक 'विद्यापीठ' आहे.

पेशाने डॉक्टर असलेली संशोधक वृत्तीची ही व्यक्ती म्हणजे माणुसकीचा झरा. वेदक सरांचा एकंदरीत जीवनपट उलगडला की अचंबित व्हायला होतं. खऱ्या अर्थाने अष्टपैलू म्हणावं असे व्यक्तिमत्व.

आमच्या रोह्यातल्या मोरे आळीत डॉ. श्रीनिवास वेदक क्लिनिक आहे. इथे केवळ वैद्यकीय भोवताल नसतं, तर इंजेक्शन आणि गोळ्यांच्या पॅकेट्सच्या आजूबाजूला इतिहासाची असंख्य पुस्तकेही दिसतात. किंबहुना या पुस्तकांमागून औषधं डोकावत असतात, असे म्हटले तरी अतिरंजित ठरणार नाही. वेदक डॉक्टरांच्या कलीनिकमध्ये गेल्यावर वाटतं हे 'हिस्टरी रिसर्च रुम-कम-डॉक्टर्स क्लिनिक' असावं!

वाचक, लेखक आणि कुणाही संशोधी वृत्तीच्या माणसाला मोहात पडेल, असे आहे डॉ. वेदक क्लिनिक. डॉक्टर म्हणून ओळख नंतर आधी इतिहास अभ्यासक म्हणून ते स्वतःची ओळख करून देतात.

१९४५ चा जन्म आणि १९६९ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करुन आधी तळा शहरात आणि नंतर गेली ३४-३५ वर्षे रोहा शहराला आपली कर्मभूमी समजून इथे प्रॅक्टिस करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रासह इतिहासात अफाट रस असणाऱ्या, नुसता रस नव्हे तर या दोन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी करून बहुमोल योगदान देणाऱ्या वेदक सरांची काम करण्याची ऊर्जा पाहून माझ्यासारख्या तरुणाला प्रचंड अप्रूप वाटतं.

सध्या वय वर्षे फक्त ७२ आहे. यातला 'फक्त' शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी बोलताना यामागचा अर्थ कळून येतो. वय हे फक्त सांगण्यासाठी असते, हे त्यांनी सिद्ध केलंय. कारण वयाच्या ७२ व्या वर्षीही ते एखाद्या तरुणाला लाजवेल या नव्या दमाने, ऊर्जेने काम करतात.

परवा गावी गेलो, त्यावेळी न विसरतो वेदक सरांच्या कलीनिकमध्ये डोकावलो. पुस्तकांशी संबंध असलेल्या माणसाला ते ५-१० मिनिटात सोडत नाहीत. मग तो पेशंट का असेना! मी तर खूप दिवसांनी भेटायला गेलेलो, त्यामुळे चांगल्या अर्धा-पाऊण तास गप्पा मारल्या.

आमच्या मूळचे रोह्याचे असलेल्या सी. डी. देशमुखांवर वेदक सरांनी 'महाराष्ट्राचा कंठमणी : सी. डी.देशमुख' हे पुस्तक लिहिलंय. ते आऊट ऑफ प्रिंट असल्याने, त्यांच्याकडे एखादी कॉपी आहे का विचारायचं होतं.. पण मग गप्पा मारता मारता इतिहासात पोहोचलो. रायगडचा ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास तोंडपाठ. संदर्भ वैगरे सर्व. अफाट ज्ञानी माणूस !

या माणसाशी बोलताना, हे गेली ४४ वर्षे डॉक्टर आहेत हे आपण विसरून जातो आणि जन्मापासून इतिहास संशोधक आहेत, असेच वाटू लागते. रोहा आणि बाजूच्या तळा तालुक्याची डिक्शनरी म्हणजे डॉ. वेदक. केवळ रस्ते आणि पायवाटा नव्हे तर या तालुक्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमीही तोंडपाठ.

असे म्हणतात ना, आर के लक्ष्मण यांची एखादी रेघसुद्धा कुठलेतरी चित्र असायचे, गुलजारांचे प्रत्येक वाक्य म्हणजे एखाद्या शयारीची ओळ असते, तसेच डॉ. वेदक सरांचे बोलणे म्हणजे ज्ञानाची गंगा... प्रत्येक वाक्यात माहिती, तीही नवीन, कुतुहलजनक, उत्सुकता वाढवणारी, प्रगल्भ अन् समृद्ध करणारी!

वेदक सरांचे कार्य प्रचंड आहे. आमच्या डोंगरकुशीतल्या गावांवर त्यांचे प्रचंड उपकार आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे इथल्या अनेक तरुण तरुणींना उच्च शिक्षणाचे धडे गिरवता आले. तळा तालुक्यातील द. ग. तटकरे महाविद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा त्यांनी प्रचंड काम केले आहे, आणि अजूनही करता आहेत.

अजून खूप लिहिता येईल. डॉ. वेदक हे शब्दात न मावणारे व्यक्तिमत्व. अशा अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तींचा वारसा माझ्या मातीला असल्याचे सांगताना अभिमानाने ऊर भरुन येतो.

No comments

Powered by Blogger.