समतेचं वारं प्यायलेली पाखरंसत्तेला एका मर्यादेच्या पलिकडे टीका सहन होत नसते. टीकेमुळे आधीच स्थायी स्वभावाने असुरक्षित असणारी सत्ता अस्थिर होऊ लागते. त्यामुळे टीका करणाऱ्यांची आपसूकच गळचेपी सुरु होते. आणि लोकशाही व्यवस्था अपरिहार्यपणे कमकुवत होण्यास सुरुवात होते.

लोकशाही ही अथांग आभाळासारखी आहे. तिथे ताकदवान अन् अजस्त्र गिधडाचेच राज्य असून चालत नाही, एखाद्या नाजूक मखमली फुलपाखरालाही तितक्याच मुक्तपणे आणि निर्धास्तपणे विहारता आले पाहिजे.

अर्थात, गळचेपी याच सत्तेच्या काळात सुरु झालीय, असे मानण्याचे काही कारण नाही. याधीही होत होती. अगदी अनादी काळापासून.

स्वातंत्र्योत्तर भारतात ज्या काही सत्ता या देशात आल्या, मग काँग्रेस असो व अन्य, त्यातल्या सर्वांनीच गळचेपी केलीय. अर्थात त्यांचे संदर्भ त्या त्या वेळी वेगळे होते आणि त्या त्या सत्तेशी संबंधित होते.

तुम्हा आम्हाला माहीत असलेल्या गोष्टीच्या अंगाने बोलू. खैरलांजी घटनेसंदर्भात उर्मिला पवार आणि इतर कार्यकर्त्या ज्यावेळी मंत्रालयात आंदोलन करायला गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात डांबून, त्यांना नक्षलवादी घोषित करण्याचे पराक्रम झाले होते. सत्ता होती आघाडी सरकारची आणि दिवंगत आर आर पाटील तत्कालीन गृहमंत्री होते. आता फक्त नक्षलवादी ऐवजी देशद्रोही ठरवले जात आहे. फरक टर्ममधील आहे. सत्तेची प्रवृत्ती सारखीच आहे.

मग आताच इतकी आरडा-ओरड का? तर त्याचेही उत्तर स्पष्ट आहे. आता ही गळचेपी करण्याची डेअरिंग आणि इंटेंसिटी तीव्र झालीय. त्यामुळे सारा माहौल चिंताग्रस्त आहे.

अशावेळी, 'बुडत्याला काठीचा आधार' ही म्हण म्हणजे या वर्तमानाचं यथायोग्य चित्रण ठरेल. लोकशाही नामक जहाज गटांगळ्या खात असताना, या जहाजावर बक्कळ पैसा कमवून पुन्हा अभिव्यक्ती आणि जनहिताच्या बाता मरणाऱ्यांची गर्दी असताना, कुठेतरी आधाराची काठी बनत आशेचा किरण डोकावतो. मग कान्हैयाचा रुपाने असेल, किंवा हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश.

आपापल्या समाजाचे नेते असले, तरी त्यापलिकडेही ते बोलताना दिसतात. अनिर्बंध सत्तेचे वाटेकरी असलेल्या घातकी तोफांसमोर निधड्या छातीने बिनधास्त उभे राहतात. वर्तमानात हेही नसे थोडके.

एकेकाळी सत्तेला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारे सुद्धा या सत्तेपुढे मान खाली घालून उभे असताना, ताठ मानेने चॅलेंज देणारे हे चेहरे नक्कीच दखलपात्र ठरतात. वैचारिक बैठक काही जन्मजात नसते, अनुभवातून अन् कालौघात ती बैठकही तयार होते. मात्र नेत्तृत्व अपरिपक्व आहे म्हणत ते नाकारु नका.

नव्या दमाच्या या नेत्यांना अधिक परिपक्व होण्यास वेळ देत, जेव्हा कधी आवाज दाबला जाईल तेव्हा आपण आवाज उठवला पाहिजे.

आणि निरंकुश सत्तेच्या हव्यासापोटी या नव्या किरणांना रोखू पाहणाऱ्यांना उद्देशून ज. वि. पवार यांच्या चार ओळी नमूद कराव्या वाटतात :

समतेचं वारं प्यायलेली पाखरं
त्यांना असं डांबू नका..
तुरुंगासह उडून जाणारच नाहीत
अशा भ्रमात राहू नका..

जिग्नेश, संसदीय राजकरणातल्या संघर्षासाठी शुभेच्छा !

No comments

Powered by Blogger.