वाचणाऱ्याचे वर्षसरत्या वर्षात मी विशेष काय केलं असेन तर पुस्तक खरेदी आणि वाचनातील सातत्य. तुफान खरेदी केली आणि तुफान वाचलंय. 2017 या एका वर्षात शंभरहून अधिक पुस्तकं खरेदी करत, माझ्या किताबखान्यातील पुस्तकांचा पाचशेचा टप्पा पार केलाय.

मिलिंद बोकील, विलास सारंग, अरुण शेवते, जयंत पवार, अवधूत डोंगरे आणि आसाराम लोमटे या माझ्या सर्वाधिक आवडत्या लेखकांची सगळी पुस्तकं किताबखान्यात आणलीयेत. सारंगांची काही वगळली, तर बाकी सर्व वाचूनही झालीयेत.

'मुद्दा आहे जग बदलण्याचा', हे भारत पाटणकर लिखित पुस्तक किताबखान्यात आहे. या पुस्तकाची अनेकांना शोधाशोध असते. फार कुठे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे. डॉ. कुंदा मॅमनी ते भेट दिलंय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे, प्रवीण बांदेकरांची 'चाळेगत' कादंबरी. तशी ही कादंबरी सगळ्यांकडेच असेल. मात्र माझ्याकडे असलेल्या या प्रतीची खास ओळख म्हणजे, ती स्वत: बांदेकर सरांनी त्यांच्या स्वाक्षरीनिशी माझ्यासाठी पाठवलीय. ही दोन पुस्तकं यंदा किताबखान्यात विशेष आहेत.

सोबत अनेक लेखक-लेखिकांची पुस्तकं यावर्षी किताबखान्यात आली. तरीही खूप सारी राहिलीयेत. पुस्तक विकत घेऊन वाचण्यात वेगळी मजा असते. आपल्या वेळेनुसार वाचता येतं. वाचण्याचेही काही रेकॉर्ड केले. कुलदीप नय्यर यांचं 'शहीद' हे भगतसिंह यांच्यावरील पुस्तक एका दिवसात वाचून काढलं. त्याचसोबत, 'दिवे गेलेले दिवस' ही रंगनाथ पठारेंची कादंबरीही झपाटल्यासारखी वाचलीय.

वाचतानाचे किस्सेही खूप आहेत. पुस्तकातून फक्त माहिती घ्यायची नसते, तर ते पुस्तक अनुभवयाचं असतं. ते या वर्षात अनुभवण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाचे निरीक्षण हा एक अभ्यासाचा मुद्दा राहिला. पुस्तकांच्या समर्पण पानावर वेगळा लेख होऊ शकतो, इतकी छान निरीक्षणं आहेत. म्हणजे, पुलं वगैरे कसे कुठल्यातरी व्यक्तीला पुस्तक अर्पण करायचे. तसे सर्वच लेखक करत नाहीत. काही लेखक क्रिएटिव्हिटी दाखवतात. वेगळेपण दाखवतात.

म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर, नागराज मंजुळेंनी 'उन्हाच्या कटाविरुद्ध'च्या समर्पण पानावर "या शुभ्र कागदासाठी" असे लिहिलंय फक्त. किंवा जयंत पवार लिखित 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' पुस्तकाच्या समर्पण पानावर लिहिलंय, "कधीही न पाहिलेल्या आईस... तू नसतीस तर जन्माची कथा इथवर आली नसती, तू असतीस तर आशयासाठी इतकी वणवण झाली नसती."

एकंदरीत पुस्तकं ही वाचण्यासोबत अनुभवण्याची गोष्ट आहे, असे म्हणतात ते खोटं नाही. ही अनुभवण्याची, निरीक्षणाची प्रोसेसही भारीय. वाचनातला आनंद अफाट आहे.

नव्या वर्षात आणखी पुस्तकं खरेदी करायची आहेत. आणखी वाचायचंय.

No comments

Powered by Blogger.