प्रिय साथी अस्मा..काल अस्मा गेली. सॉरी अरे-तुरे करतोय. पण आपल्या जवळच्या माणसाला आपण अरे-तुरेच तर करतो. नाही का? अस्मा वैचारिकदृष्ट्या जवळचीच. तर अस्माच्या जाण्याने काय एवढा फरक पडतो, असे कुणालाही वाटून जाईल. पण फरक पडतो. कारण मानवतावादी चळवळीत अत्यंत महत्त्वाच्या स्थानी अस्मा उभी होती. निडरपणे आणि निर्भिडपणे.

अगदी १५ दिवसांपूर्वीच २७ जानेवारीला तिने ६७ व्या वर्षात पदार्पण केले होते. ५२ साली जमलेल्या या रणरागिणीने ऐन तारुण्यात चळवळीत झोकून दिले. केवळ रस्त्यावरची लढाई नव्हे, तर न्यायालयीन लढाई सुद्धा तिने लढली. ती पेशाने वकील होती.

पाकिस्तानसारख्या लोकशाहीच्या नावाखाली कधी दडपशाही, कधी एकाधिकारशाही, तर कधी लष्करशाही गाजवणाऱ्या देशात लोकशाही टिकून राहावी म्हणून तिने आवाज बुलंद केला.

भारतात जसे अल्पसंख्यांकांचे प्रश्न लाऊन धरल्यावर मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा आरोप होतो, तसा पाकिस्तानात अस्मावर हिंदूंबाबत झाला. एकंदरीत इकडचे आणि तिकडचे कट्टर सारखेच. असो. पण अस्माने कधीच माघार घेतली नाही. ती कमकुवत घटकांची आवाज बनली आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींविरोधात पेटून उठली.

बहिण हिना गिलानी हिच्यासोबत सुरु केलेली वुमेन्स अॅक्शन फोरम, नंतर वकिलांची संघटना असलेल्या बार असोसिएशनचे प्रमुखपद, मानवाधिकार आयोग.. असा खूप मोठा प्रवास अस्माचा आहे. 'मानवाधिकार चळवळ म्हणजे अस्मा जहांगीर' असे समीकरण पाकिस्तानात बनले होते. अगदी १९८० ते कालपर्यंत.

१९८२ साली झिया उल हक यांच्या अन्यायकरी निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरुन अस्माने लढा दिला. त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. पण ती डगमगली नाही. प्रत्येक दडपशाहीला तिने प्राण पणाला लावून विरोध केला. मग मुशर्रफ असो वा आणखी कुणी. बालकामगार आणि फाशीची शिक्षा याविरोधातील तिचे लढेही प्रभावी राहिलेत.

कधी तुरुंगवास भोगला, कधी नजरकैद, कधी जीवे मारण्याच्या धमक्या, तर कधी प्रत्यक्ष हल्ले... तरी ती लढत राहिली. निर्भिड वृत्तीच्या या रणरागिणीचा मॅगसेसे, राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड अशा कित्येक मान-सन्मानांनी गौरव झाला.

पाकिस्तानसारख्या धर्माच्या नावावर टोकाची भूमिका घेणाऱ्या देशात काम करताना अस्मा म्हणायची, ""We never learnt the right lessons. We never went to the root of the problem. Once you start politicising religion, you play with fire and you get burnt as well.".

नेमक्या शब्दात अस्माने भोवताल मांडलंय. पाकिस्तानसह सगळ्याच देशात ते लागू होतं.

२०१६ साली अब्दुल सत्तार इधी गेले, काल अस्मा जहांगीर. पाकिस्तानात माणुसकीच्या ज्या काही मोजक्या जिवंत खुणा होत्या, त्या मिटत जात आहेत. आधीच वैचारिक सर्वनाशाच्या निराधार कड्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानसारख्या देशातील असे हिरे काळाच्या पडद्याआड जाऊ लागलेत. परिस्थिती कठीण आहे.

प्रिय साथी अस्मा,
मानवतावादी चळवळीतील महत्त्वाची व्यक्ती म्हणून तुझी आठवण राहिलंच, मात्र लोकशाही टिकवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च पदाला रस्त्यावर उभी राहून थेट आव्हान देणारी रणरागिणी म्हणूनही तू कायम आठवणीत राहशील.

नामदेव अंजना

No comments

Powered by Blogger.