होय, मी 'फुरोगामी' आहे!गेले काही दिवस पाहतोय. काही महिने खरंतर. 'फुरोगामी' शब्दाची चलती वाढलीय. जगाच्या बेरीज-वजाबाक्या नुकतंच कळू लागलेल्यांना वाटावं की, 'फुरोगामी' हा शब्द 'पुरोगामी' शब्दाला समानार्थी शब्दच आहे की काय. इतका विकृत आणि प्रदूषित प्रचार केला गेलाय. यात शिकले-सवरलेले आघाडीवर आहेत, हे वेगळं सांगायला नको. कारण असल्या उचापत्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नसतात. तर असो. मुद्दा तो नाही. त्याही पलिकडचा आहे.

पुरोगामी... ज्याला इंग्रजीत बहुधा प्रोग्रेसिव्ह म्हणतात. या शब्दाच्या व्याख्येत मला शिरायचं नाही. म्हणजे 'द वर्ड प्रोग्रेसिव्ह डिराईव्ह्ड फ्रॉम लॅटिन वर्ड अमूक-तमूक' असल्या व्याख्या इथे द्यायच्या नाहीत. मला या शब्दातला आशय महत्त्वाचा वाटतो. मी त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन. जमेल तसा.

पुरोगामी शब्दाने कितीतरी मोठा अर्थ स्वत:त सामावून घेतलाय. आपल्या विचारांनी आणि त्या विचारांच्या कृतीतून आपल्या भोवतालात योग्य बदल घडवणार्‍या कित्येकांनी मोठ्या अभिमानाने स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतलंय. आणि पुरोगमी असल्याची ओळख ठेवणीतल्या दागिन्यांप्रमाणे जीवापाड जपलीय.

वर्षांमागून वर्षे लोटली, दशकं लोटली, अगदी शतकं लोटली. मात्र पुरोगामी विचार कालबाह्य झाले नाहीत. ते दिवसागणिक वृद्धिंगत होत गेले. उलट त्याकडचा ओढा आणखी वाढला. खरंतर हेच पाहता पुरोगामी विचारांमधील सामर्थ्य लक्षात यायला हवं होतं. पण उथळ विचारांनी भारावून गेलेल्या वर्तमान-वातावरणात इतका सखोल विचार करतो कोण? असो.

मुळात पुरोगाम्यांना 'फुरोगामी' म्हणून चिडवणार्‍यांच्या बेसिकमध्येच लोचा आहे. कदाचित तो जन्मजात असावा किंवा पुढच्या वाढीच्या काळात आजूबाजूच्या वातावरणाने दिला असावा. पण लोचा आहे हे नक्की. कारण त्यांना वाटतं की, पुढारलेला विचार करणारे स्वत:च स्वत:ला पुरोगामी म्हणवतात की काय. तर बच्चेलोग, असं नसतंय. जर नीट पाहा संपूर्ण प्रोसेसकडे. मग लक्षात येईल, ज्या ज्या व्यक्तींनी माणुसकीची कास धरली, ज्यांनी ज्यांनी सृष्टीतला प्रत्येक जीव सर्वोच्च मानला, ज्यांनी ज्यांनी अन्यायाचा कडाडून विरोध केला, त्या कुठल्याच व्यक्तीने कधीच स्वत:हून स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतलं नाही. त्यांना आजूबाजूच्या समाजाने पुरोगामी म्हटलं. जे आता फुरोगामी म्हणून हिणवतायेत, त्याच प्रवृत्तीने त्यांना पुरोगामी म्हटलं होतं. कारण अंधारातल्या माणसालाच उजेडाचं अप्रूप असतं. उजेडाला स्वत:चं कौतुक काय!

आपण त्याही पुढे जात पुरोगामीपणाची व्याख्या करुया. कदाचित सगळ्यात सोपी व्याख्या ठरेल अशी. ती म्हणजे - माणुसकीची भावना जपणे. इन शॉर्ट - पुरोगामी इज नन आदर दॅन माणुसकीची चळवळ. इतकं सोप्पंय. अर्थात माझ्यालेखी अशी व्याख्या.

आता थोडं फुरोगामी म्हणणार्‍यांकडे वळूया. या जमातीचं मला प्रचंड कौतुक वाटतं. हे भयानकरित्या गोंधळलेलं असतात. म्हणजे इतके गोंधळलेले की हल्ली हल्ली तर यांनी खिल्ली उडवण्याची लेव्हलही क्रॉस केलीय. काहीही गोष्ट घडली की पुरोगाम्यांवर आगपाखड सुरु करतात. इतकी की कधी कधी वाटतं यांना मेंटल डिसआॅर्डर वगैरे झालंय की काय.

महाराष्ट्राला-देशला, इव्हन जगालाही पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे. कट्टरतावादी विचारांना झुगारुन, अनिष्ट रुढींना नाकारुन, जुलमी प्रवृत्तींना पराभूत करुन ताठ मानेने मानवतावादी विचारांच्या पायावर पुरोगामी विचार भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. तुम्ही कितीही नावं ठेवलीत, कितीही फुरोगामी वगैरे म्हणत खिल्ली उडवलीत, कितीही हीन पातळी गाठलीत, तरी हे विचार संपत नसतात. कारण एका पॉईंटनंतर पुरोगामी केवळ विचार न राहता ती जीवनशैली होते. प्रत्येक गोष्टीकडे विवेकी नजरेतून पाहण्याची नवी दृष्टी तुम्हाला लाभते. आणि हो, ही 'फुरोगामी' म्हणण्याइतकी साधी गोष्ट नाहीय.

सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की, पुरोगाम्यांना 'फुरोगामी' म्हटलंत तर, 'पुरोगाम्यांची कशी जिरवली' वगैरे म्हणत तुम्ही केवळ काही क्षण समाधानी होऊ शकता. पण पुरोगामी विचार दडपू शकत नाही. ते पुरुन उरतात. आणि प्रत्येक सजीवाची संवेदना जाणणारा विचार सजीव राहणारच, हे वेगळं सांगायला हवं का?

कुणीतरी भल्याचा विचार करत असतो. मात्र त्याला नावं ठेवणारी कमी नसतात. या नावं ठेवणाऱ्यांना आमच्या गावाकडे 'काळोखाची कुजबूज' म्हणतात. कारण काळोखाने कितीही कुजबूज केली, तरी उजेडाला फरक पडत नसतो. तो अस्खलित स्पष्ट आणि खरा असतो.

शेवटी एवढंच सांगेन, माणसाकडे माणूस म्हणून पाहायला सांगणाऱ्या या विचारांना कुणी 'फुरोगामी' विचार म्हणत असेल, तर तसेही चालेल. कारण प्रश्न शब्दाचा नाही, प्रश्न त्यातील विचाराचा, भावनेचा आहे. आणि त्या भावनेशी पुरोगामी चळवळीतील साथी एकनिष्ठ आहेत.


नामदेव अंजना

No comments

Powered by Blogger.