नियोगींच्या शोधात!चार पाच वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे. गिरिजा गुप्ते मॅडमनी शंकर गुहा नियोगींवर वाचन करायला सांगितलं होतं. गिरिजा गुप्ते म्हणजे साठ्ये कॉलेजच्या सोशोलाॅजीच्या हेड. आणखी मोठी ओळख सांगायची तरत्या कामगार नेते कॉ. वसंत गुप्तेंच्या कन्या. तर त्यांनी नियोगींवर वाचायला सांगितले. त्यांनी जाणीवपूर्वक संदर्भपुस्तकांची नावं वगैरे काहीच दिली नाहीत. म्हणाल्यातुझं तू शोध आणि वाच. त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्येही खूप काही गवसेल. आयते संदर्भ दिले तर शोधण्याच्या प्रोसेसमधील ज्ञान गमावशील. 

झालं.. म्हटलं आता हे नियोगी कुठे भेटतीलमग गूगलबाबाकडे गेलो. वीकिपिडियावर माहिती मिळाली. पण तीही त्रोटक. मग डोकं आणखी भणभणायला लागलं. म्हटलं काय फाल्तूगिरीय रावगिरीजा मॅडमने नाव सांगावं एखद्या व्यक्तीचं आणि त्याच्याबद्दल इंटरेनेटलाही माहिती नसावी! 

त्या काळात दादरच्या मुंबई मराठी संदर्भ ग्रंथसंग्रहालयात आठवड्याला दोन-तीनदा येणं जाणं होत असे. कॉलेज सुटल्यावर कामावर दांडी मारुन दादर गाठलं. तिथे ते दाढीवाले काका असायचे. अजूनही असतात बहुधा. ते दाढीवाले काका कधी हसतच नसत. कायम धीरगंभीर चेहरा. पुस्तकांची खडान् खडा माहिती. तिथले कम्प्युटर आता आलेपण या काकांना कुठल्या रकान्यात कुठलं पुस्तक आहेते करेक्ट माहिती असे. अजूनही असेलच अर्थात. 

तेव्हा सात रुपये दिवसाचे द्यावे लागत. आता दहा रुपये झालेत. कदाचित आणखी वाढलंही असेल. वर्षभरात गेलोही नाही. असो. तर रिसिट घेतल्यावर म्हटलंशंकर गुहा नियोगींवर काहीही हवंय. 

नियोगींवर फार काही मिळेल वाटत नाही. त्यांना म्हटलंजे आहे ते द्या. कारण नियोगी कोण प्राणी आहेइथपासूनच माझ्या अज्ञानाची सुरुवात होती. त्यांनी सुरुवातीला कुठलंसं मॅगझिन आणलं. १९९३ चा अंक. कव्हरची दोन्ही पानं गळून पडली होती. कुठलंसं साप्ताहिक होतं. त्यात एक लेख नियोगींवर होता. हर्डीकरांनी लिहिलेला. रिपोर्ताज टाईप. 

संदर्भ ग्रंथसंग्रहालयाच्या वर पंखा असलेल्या जागी खिडकीपाशी एकदम हवेशीर बसलो. लेख वाचायला सुरुवात केली. अंगातली धडधड वाढली. वाचनाच्या उत्सुकतेचा वेग वाढत गेलातस तसा वाचनाचाही वेग वाढला. हुश्श....  लेख संपला.

शंकर गुहा नियोगी आता डोक्यात-ह्रदयात-मनात शरला. फिट बसला. आता हा नियोगी बाहेर निघत नाही. झापटलंय नियोगीने. 
घरी आलो. दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो. तेव्हा गिरिज मॅडमना नियोगींबद्दल काय माहिती मिळालीयाचा इतिवृत्तांत दिला. त्यांना हलकासा आनंद झाला. मग त्यांनी पहिला संदर्भ दिला. म्हणाल्यारंगनाथ पठारेंनी शंकर गुहा नियोगींवर रिसर्च करुन पुस्तक प्रकाशित केलंय. 

शोधमोहीम रंगनाथ पठारेंच्या साहित्याकडे वळली. कुठून कळलं माहित नाहीगोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने पठारेंचा दस्ताऐवज प्रकाशित करण्यात आल्याचं कळलं. केशव गोरे स्मारकात येणे-जाणे नित्याचे असते. स्नेहल पंगेरकर नावाची मैत्रीण होती. ती आणि मी इथल्या लायब्ररीत तासन् तास वाचत बसायचो. त्यामुळे तिथले काका ओळखीचे होते. 

दुसर्‍या दिवशी केशव गोरे गाठलं. रिसर्च डाॅक्युमेंटेशन मिळवलं. आणि तिथल्या तिथे वाचायला सुरुवात केली. अफाट.. अद्भुत.. अचंबित करणारा संघर्ष! 

शंकर गुहा नियोगी... गांधींपेक्षाही अस्सल गांधीवादी. जुलमी-अत्याचारी भांडवलदारीला आव्हान देत खाण कामगारांसाठी लढा उभारत असतानाही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन आंदोलनं. इतका अहिंसावादी भारताच्या संघर्षशाली इतिहासात क्वचितच कुणी झाला असावा. रंगनाथ पठारेंनी नियोगींचं सारं आयुष्यसंघर्ष कट टू कट चितारलंय. 

त्या काळात देशात दोन कामागार नेत्यांची प्रचंड चर्चा होती. त्यात एक होते गिरणी कामगारांचा संप घडवणारे डॉ. दत्ता सामंत आणि दुसरे होते खाण कामगारांसाठी लढणारे शंकर गुहा नियोगी. दत्ता सामंतांनी केलेला संप आशियातील सर्वात मोठा संप ठरला. मात्र, नियोगी याहून वेगळे होते. या दोघांमध्ये बेसिक फरक असा होता की, नियोगींना वैचारिक बैठक होती. वाचन, सामाजिक जाण, निरीक्षण असे विविध गुण त्यांच्या अंगात होते. मला तर ते गांधींपेक्षाही गांधीवादी वाटतात. 

छत्तीसगडमधील दल्ली राजहरा हे मुळातच खाणींचा परिसर म्हणून ओळखला जातो. इथले बहुतेक सगळेच लोक खाणीत काम करणारे. मात्र, खाण मालकांनी कधीच या लोकांच्या जगण्याप्रति संवदेनशीलता दाखवली नाही. कधीच त्यांच्या दुखण्या-खुपण्याकडे गांभिर्याने पाहिलं नाही. खाण मालकाइतकेच शासन-प्रशासनाने ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष केलं. त्यामुळे लहान मुलांसह गर्भवती महिलांना प्रचंड आजारांना, त्रासाला सामोरं जावं लागे. मुळातच खाणींमुळे नाना समस्यांना तोंड द्यावं लागे.

एकदा खाणीतच काम करणाऱ्या कुसुमबाई नावाच्या महिलेवर नीट उपचार झाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कुठलाही उतावीळपणा न करता त्यांनी अत्यंत अहिंसेचा मार्ग शोधला आणि इथल्या 109 कामगारांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये हॉस्पिटल सुरु केलं. आजही 5 ते 50 रुपयांत उपचार येथे होतात. संघटनांच्या बळावर आणि समाजसेवी वृत्तीच्या माणसांवर तीन मजली हॉस्पिटल कामगारांच्या भल्यासाठी सरुच आहे. अहिंसेच्या मार्गाने खाण मालकांना दिलेलं हे एक उत्तर होतं.

पुढे अहिंसेच्याच मार्गावर चालत नियोगींनी अनेक आंदोलनं केली. खाण कामगारांच्या आरोग्याचे, त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाचे, हक्क-अधिकारांचे मुद्दे घेत मोर्चे काढले. आवाज उठवला. मात्र, कुठेही कसली कुणाला दुखापतही केली नाही. 70 च्या दशकात खाण कामगारांच्या बोनससोबत इतर मागण्यांसाठी जवळपास 10 हजारांहून अधिक कामगारांना घेऊन ते रस्त्यावर उतरले. आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. मात्र शासन-प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलं होतं. अशा वेळी कुणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल, मात्र नियोगींनी इतका मोठा लोकसमूह शांतपणे सांभाळला. त्यांच्या इतका कुशल संघटक, विचारी नेता पुढेही कुणी झाला नाही, होणार नाही.

कमाने वाला खाएगा’ असे म्हणत अहिंसेच्या मार्गाने खाण कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या शंकर गुहा नियोगींची 28 सप्टेंबर 1991 च्या रात्री काळोखात गोळी मारुन हत्या करण्यात आली. ती कुणी केली, हे स्पष्ट होतं. खाण कामगारांना गुलामांची वागणूक देणाऱ्या खाण मालकांना अहिंसेच्या मार्गाने जेरीस आणणाऱ्या निशस्त्र नियोगींना शस्त्राने संपवलं गेलं. नियोगी हे जुलमी भांडवलदाऱ्यांचे स्वतंत्र भारतातील पहिले बळी ठरले.

नियोगींच्या अंत्ययात्रेत अलोट गर्दी होती. तळागाळातील माणसं होती. असं म्हणतात, छत्तीसगडच्या इतिहासात कुणाच्याच अंत्ययात्रेत इतकी माणसं नव्हती, तितकी नियोगींच्या अंत्ययात्रेत होती. ती सारी नियोगींनी कमावलेली माणसं होती. जोडलेली माणसं होती. ज्यांच्यासाठी लढला, ते सारे तेव्हा एकवटले होते. ‘लाल हरा झंडा जिंदाबादनियोगी भैया जिंदाबाद’, या घोषणेने छत्तीसगड हळवं झालं होतं. तळागाळातल्या माणसांच्या दु:खाला आपलं दु:ख समजून त्याला फुंकर घालणारा असा कामगार नेता होता.

खरंतर नियोगींबद्दल खूप लिहिता येईल. नियोगी हा नुसता शब्द एका लेखात डोळ्यांसमोर आला आणि नियोगींबद्दल वाचनासाठी केलेले प्रयत्न आणि नियोगींचं आयुष्य डोळ्यांसमोर तरळू लागलं. खरंतर हे त्रोटकच सांगितलं. यापेक्षा अधिक संघर्षमय असं जगणं नियोगींचं होतं. एकदा नक्की जाणून घ्या. नियोगी खरा ‘माणूस’ होता.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

No comments

Powered by Blogger.