हे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे!

इंग्लिश शाळांच्या पिवळ्या धमक बस सक्काळ-सक्काळ धावतात नुसत्या. इकडून तिकडे, तिकडून इकडे. कुठल्यातरी फूटपाथवर किंवा दुकानाच्या आडोशाला डोळे चोळत बसलेली चिमुरडी आपापल्या गाडीच्या रस्त्याकडे नजर रोखून असतात, गाडी लवकर येऊ नये या तीव्र इच्छेने.

जन्मठेपेची शिक्षा भोगायला जाणाऱ्या एखाद्या कैद्याच्या चेहर्‍यावरील एक्स्प्रेशन्ससारखे चिमुरड्यांचे चेहरे. कधीतरी ही सारी चिमुरडी शाळांविरोधातच उठाव करतील, असं वाटून जातं.मग गाडी येते तेव्हा नजर रोखून बसलेले चेहरे आणखी उदास होतात. जगणंच नकोसं झालेल्या माणसासारखे भासतात. त्या पिवळ्या धमक बसमधली मदतनीस खाली उतरते आणि एखाद्या जेलरप्रमाणे चिमुरड्यांना गाडीत भरते. आणि दरवाज्यातच उभी राहते पुढच्या कैद्यांना शोधत.

दहा-पंधरा जणांच्या घोळक्यातला एखादाच चिमुकला गाडीच्या इमर्जन्सी एक्झिट विंडोतून आपल्या बेन्चमेटला पाहून हसत हसत हात दाखवतो. अगदी एखदाच. बाकी सारे शाळेचे कैदीच जणू.

हसत-खेळत शिकवण्यापेक्षा, शिकण्याची आवड निर्माण करण्यापेक्षा जबरदस्तीने उत्तरं कोंबली जातायेत डोक्यात. शाळेच्या शंभर टक्के निकालाच्या हव्यासापुढं ही चिमुरडी शिकण्यालाच कंटाळत चाललीयेत. हे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे!

No comments

Powered by Blogger.