धावरकुट्यातथाकथित प्रमाण वगैरे भाषेत लोहार. पण आमच्या गावाकडं धावरकुट्या. शेतीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अंग. कोयता-विळी पाजवण्यासाठी धावरकुट्याला पर्याय नाही. नितीन मोकल यांच्या पोस्टसोबत गणेश बागल यांनी टिपलेला हा फोटो पाहिला आणि धावरकुट्याची जिंदगी डोळ्यासमोरुन सरकू लागली.

सप्टेंबर महिना उजाडला की पाऊस परतीच्या मार्गाला निघतो. महिना संपेस्तोव निघून जातो अन् लागोलग थंडी येते. हिकडं भाताच्या काड्या हातभर वर आलेल्या असतात. पंधरा-वीस दिसात कोंबड्या पिल्लाचा निवद दाखवून कापणीला सुरुवात केली, तरी चालतंय. असे हे दिवस.

कापणी जवळ आली, मग कोयत्या, विळ्या, कुऱ्हाडी पाजवून घ्यायला पायजे. मग ढोरांशी जाणा-यांची रानावनात, पाणी भरणाऱ्या बायकांची विहिरीवर अन् म्हातारी-कोतारी भर दुपारी कुणाच्यातरी पडवीत बसून तांदूळ निवडताना....सगळीकडे एकच चिंता- ह्यो औंदा धावरकुट्या आला नाय तो. मेला राह्यला कुठं? भाता कापायला झालीत. आता धावरकुट्याला बोलावणं धाडण्याची यळ आली की काय म्हणायची कुणब्यावर?

चर्चांचं फड ठिकठिकाणी सुरु असताना कधीतरी दुपार टळून सूर्य मावळतीला निघताना एक बैलगाडी गावात शिरते. दोन पांढरे शुभ्र बैल, त्यांच्या शिंगांना भगवा रंग, भारदस्त आणि आडदांड...बैलांची मिजास काय! अहाहा!

बैलगाडीत एक छोटंसं बिऱ्हाड. दोन चिमुरड्या पोरी, एक पोरगा, पोरांची माय अन् दस्तुरखुद्द धावरकुट्या. बैलांचा कासरा वढतच म्हणतो, आरं थांब की रं फुकणीच्या. लय जोर कराय लागलाय व्हय. बैल जाग्यास थांबतात. चिमुरड्या बैलगाडीतना उड्या टाकतात, मंग हळूच त्यांची माय उतते. अन् सर्वात शेवटी धावरकुट्या. तेव्हा कुठं बैलांना जरा हायसं वाटतं. डोंगराच्या मध्यावर गाव असल्याने चढणीने आले व्हते. पार कंबरडं मोडलं असावं. त्यात या बिऱ्हाडाचं ओझं.

आडदांड शरीर, चांगला साडेसहा-सात फुटी उंच, कोळश्यानं माखलेला धोतर अन् वर गंजी... धावरकुट्या नाव जरी कानी पडलं तरी हे असं डेळ्यासमोर येतं. त्यात परत त्याची पोरं अन् बायको हायच. दोन पोरी. दोघीबी लहानच. कायम भोंगा सुरुच. पण धावरकुट्याच्या कामात अडथळा नाय. चुकून तापलेल्या निखा-यांकडे सरकल्या तरी धावरकुट्या फक्त पोरींकडे बघायचा, त्याच्या एका भेदक नजरेत पोरी चराचरा थरतरायच्या. पोरगा कामात हुशार व्हता. शाळेचे उंबरठे पाहिले सुद्धा नव्हते. पायाला भिंगरी लाऊन बिऱ्हाड फिरतं. कुठली आलीय शाळा अन् कुठलं काय. पण पोराला जाणीव होती बापाच्या कष्टाची. ऐन थंडीत अंगातना घाम गळेस्तोव ऐरणीवर एकामागोमाग एक हातोडे हाणायचा. त्याची माय बी ह्योच काम करायची.

धावरकुट्याचा बि-हाड असाच या गावातून त्या गावात फिरता. एका ठिकाणी म्हणून नाही. फिरत्या पायांवर पोटांचं चक्र सुरुय, हेही खरंच. पण यातली घुसमट जीवघेणी होती.

तर धावरकुट्या वेशीवरच बैलगाडी थांबवायचा. मग सारा सामानसुमान घेऊन दोन घरं पालटून एका बोळात बसायचा. दोन दिस मग त्याच बोळात मुक्काम. रातच्याला झोपायला फक्त कुणाचीतरी पडवी शोधायचा. बाकी घर उघड्यावरच. निळ्या छताखाली. सुरक्षित. आणि तसंही जिंदगीच उघडी पडलीय, तिथं घर अन् त्या सामानाचं काय घेऊन बसायचं म्हणा.

धावरकुट्या नेहमीच्या जागी थोडा विसावतो न विसावतोय, तोच कोयता, विळी, कुऱ्हाडींची रांग लागते, तर कुणी नवी कोयती उलटी सुलटी करुन पाहत बसतो. गेल्यावेळीपेक्षा विळा-कोयती पाजवण्याचा भाव वाढवला म्हणून हुज्जत घालणारी साळू आक्का आठवतेय. "मेल्या एवढं कमवून कुठं उरावर नेणारेस?" असं म्हणणाऱ्या साळू आक्काला धावरकुट्या काळजाला भिडावं अशा स्वरात म्हणायचा, 'उरावर नेण्याएवढं कमावलं आसतं तर कशाला या तीन पोरास्नी घेऊन गावोगाव हिंडलो असतो गं माय?" मग साळू आक्काही नरमून म्हणायची, "कर...कर... तू काय ऐकायचा नाहीस. रातच्याला पोरांना घरी पाठव. दोन भाक-या देती".. मग धावरकुट्याचं काम पुन्हा सुरु.

दोन दिवसाची वस्ती, पण त्याचं जगणं कळून जायचं. दिवसभर काम करुन रात्री थोडा आराम. तिन्ही पोरांना गावभर हिंडून जेवण गोळा करायला सांगायचा, तेव्हा कुठं रात्रीच्या जेवणाची सोय व्हायची.

धावरकुट्याचं काम तासं-तास उभं राहून पाहायचो. कदाचित तेव्हा तेवढी समज नव्हती म्हणून असेल, धावरकुट्याच्या बायकोच्या सतत पाणावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळायचा नाही. सोबत जेवताना दगडासारखी कडक भाकरी चावणारी चिमुरडी आठवतायेत. त्याचा पोरगा आमच्यासोबत खेळायला यायचा. दोनच दिस असायचे, पण त्याचा पोरगा आमचा दोस्त झाला होता. रवी त्याचं नाव. एकदा घरी जेवायला नेल्याचंही आठवतंय. रवी भारी दोस्तार होता. हुशार होता. आता कुठं आसल माहित नाय... कदाचित बापासारखंच नशिबाच्या ऐरणीवर हातोडे मारत असेल.

धावरकुट्याचं जिणं हे असं असतंय. सगळीच हेळसांड. जगणंच विस्कळीत. पोरांचं शिक्षण नाही की काही नाही. आता तर शेती करणारेही फार कमी झालेत. त्यामुळे धावरकुट्याच्या हातालाही काम नसतं. जेव्हा काम होतं तेव्हा पोरांना शिकवलं नाही. आताच्या चक्रात पार कोलमडून निघतो हा समाज. घुसमट सारी.

जिंदगीवर किती काळ हातोडा मारणार आहोत, या अनुत्तरीत प्रश्नाशी दिस-रात झगडत आजही धावरकुट्या गावोगाव हिंडतो.

No comments

Powered by Blogger.