कुबेर सरांचा फिडेलद्वेषी संपादकीय लेख आणि काही प्रश्न


लोकसत्तेचा आजचा संपादकीय (क्रांती, कॅस्ट्रोआणि जग) लेखात काही मुद्दे आक्षेपार्ह, दिशाभूल करणारे आणि असत्य वाटले. अमेरिकेतील एखाद्या पत्रकाराने फिडेल कॅस्ट्रोवर लिहिल्यासारखा आजचा संपादकीय वाटतो. कारण वाक्यागणिक फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसून येतो. फिडेलवरील रागापायी कुबेर सरांनी अत्यंत ऐकीव माहितीच्या आधारावर फिडेलवर टोकाचे आरोप केले आहेत. हे आरोप सर्वसामान्य वाचकांची दिशाभूल करणारे आहेत. या सर्वांवर चर्चा करण्याबरोबर संपूर्ण संपदकीय लेखाचीच चर्चा करुया.

नेहमीप्रमाणे सहा कॉलमचा संपादकीय. यातील पहिला दीड कॉलम हुकुमशहाची लक्षणं आणि वर्णन करण्यात घालवला आहे. या दीड कॉलममधील काही मुद्द्यांशी सहमत आहे. म्हणजे एखाद्या हुकूमशहानं खोट्या कहाण्या सांगणं किंवा एखाद्या हुकुमशहाचं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य विरोधी असतं वगैरे. किंवा अगदी नेतृत्त्वमंडलात दुसऱ्या क्रमांकावर कोणीही चालत नाही वगैरे. हे सर्व ठीकंय. हुकुमशहा कसा असतो, हे चांगल्याप्रकारे कुबेर सरांनी सांगितलंय. पण पुढे या मुद्द्यांचा फिडेल कॅस्ट्रोशी संबंध जोडल्याने, कुबेरसरांचा फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसू लागतो. अगदी प्रत्येक वाक्या-वाक्यातून.

पहिल्या दीड कॉलममध्ये हुकुमशहाचं वर्णन केल्यानंतर, हा कॉलम संपता संपता कुबेर सर लिहितात - क्रांतिकारकांत नेहमीच एक हुकुमशहा दडलेला असतो आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या कथित क्रांतीची अखेर होत असते. फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत हे सर्व घडले.म्हणजेच कुबेरसर फिडेलला हुकुमशहा समजतात. असेलही. पण याच संपादकीयमध्ये कुबेर सरांनी हुकुमशहाचं जे वर्णन केलंय, ते वाचल्यावर फिडेल हुकुमशहा कसा असेल, असा प्रश्न पडतो. चला तर मग कुबेर सरांच्या संपादकीयतील काही मुद्द्यांवर स्वतंत्रपणे चर्चा करुया...

मुद्दा क्र. 1 – हुकुमशहाचं (अप्रत्यक्षपणे फिडेलचं वर्णन करताना) वर्णन करताना कुबेर सर लिहितात, ‘त्यांची शारीरिक क्षमता दांडगी असते. ते सलग 20-20 तास काम करु शकतात. अमोघ वक्तृत्व हे अशांचे आणखी एक वैशिष्ट्य.

आता कुबेर सरांच्या वरील मुद्द्याची गोची कशी आहे बघा. बातिस्ता राजवट जुलमी होती, असमानता आणि भेदभावाला खतपाणी घालणारी होती, हे कुबेर सरांनाही मान्य असेल. नसेल, तर मान्य असायला हवे. कारण बातिस्ता राजवट तशीच होती, हे सर्वमान्य आहे. मग अशा राजवटीला उलथवून टाकायचं, तर 20-20 तास सलग काम करायला नको का? जनतेला विश्वासाने सोबत घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायला नको का? बातिस्ता राजवट जुलमी होती. मग फिडेलची शारीरिक क्षमता, शब्दश: शारीरिक न घेत आपण लष्करी ताकद म्हणूया, ती दांडगी नको का? मग हे सर्व फिडेलने केले असेल, तर तो हुकुमशहा कसा? जुलमी राजवटीविरोधात बंड करण्याचा त्याचा तो मार्ग होता. जनतेची असमानतेतून सुटका करणं, हे फिडेलचं ध्येय होतं.

मुद्दा क्र. 2. कुबेर सरांनी फिडेलचं अमेरिकी प्रेम सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते लिहितात – ‘अमेरिकाविरोधाची जाहीर भाषा करणाऱ्या या नेत्याने मधुचंद्रासाठी अमेरिकेचीच निवड केली होती आणि त्या देशात मित्रपरिवारासह मौजमजा करणं त्यांना आवडत असे. परंतु पुढे स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

इथेही कुबेर सरांचा फिडेलद्वेष दिसून येतो. कारण मधुचंद्रासाठी ही खरंतर फिडेलची वैयक्तिक गोष्ट. पण तरीही आपण असं म्हणूया की, एवढ्या मोठ्या माणसाला वैयक्तिक आयुष्य वगैरे गोष्ट नसते. असं जरी म्हटलं, तरी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, बातिस्ता राजवटीविरोधात दंड थोपटल्यानंतर फिडेलने कधीच अमेरिकेचे गालगुच्छे घेतले नाहीत. अमेरिकेच्या दुटप्पी, भांडवलदारी, कपटी राजाकारणाचा त्याने कायम कडाडून विरोधच केला. ज्यावेळेपासून बातिस्ता राजवटीविरोधात फिडेल उभा ठाकला, त्यानंतर अमेरिकेचे गोडवे फिडेलने गायलेत का? तर नाही. मग फिडेलला अमेरिकेचं आकर्षण होतं, असं कसं म्हणू शकता? मधुचंद्र वगैरे ही बंडाआधीची गोष्ट आहे, हे स्वत: कुबेर सर सांगतात. म्हणजे बंडाआधीच्या गोष्टींवर पुढील वाटचाल तोलणार आहात का? फिडेलचा अमेरिकाविरोध अवघ्या जगाला माहित आहे. मग बातिस्ताविरोधातील लढाई सुरु करण्याआधीचे दाखले देऊन, फिडेलला अमेरिकेबाबत दुटप्पी कसे ठरवता?

मुद्दा क्र. 3. कुबेर सरांनी दुसऱ्या कॉलमच्या शेवटी आणि तिसरा कॉलम पूर्ण फिडेल आणि चे गव्हेरा यांच्यातील सुसंवादी नात्यावरच संशय व्यक्त करण्यात घालवला आहे. फिडेलला क्युबन क्रांतीनंतर चे गव्हेरा नको होता, असं कुबेर सरांनी म्हटलंय. हे वाक्यच असत्य वाटतं. कारण चे गव्हेरा आणि फिडेल यांचं नातं पुराव्यानिशी सर्वांना माहित आहे. आता फिडेलला राग वगैरे होता, या चर्चा आहेत. ऐतिहासिक दस्ताऐवज या दोघांमधील सख्य समोर ठेवतं. मग चर्चांआधारे त्यांच्या नात्यावर संशय का व्यक्त करता

या संदर्भात कुबेर सर लिहितात – “दोन तलवारी म्यानात ज्याप्रमाणे एका वेळी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे दोन क्रांतिकारकही एकाच प्रदेशात एकत्र नांदू शकत नाहीत. चे याचा अंत झाला आणि कॅस्ट्रो यांना रान मोकळे मिळाले.” 

कुबेर सरांचं वरील वाक्य प्रचंड दुर्दैवी वाटतं. दुर्दैवी यासाठी की, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कुबेर सरांना चांगला अभ्यास असतानाही, त्यांना हे वाक्य लिहावं वाटलं. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून चे गव्हेराला फिडेलने बाजूला केलं, असं जर काही क्षणासाठी मानायचं ठरवलं, तर मग कुबेर सरांनी एक प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं, तो प्रश्न म्हणजे- फिडेलची सावली बनलेल्या राऊल कॅस्ट्रो या तलवारीला फिडेलने एकाच म्यानात कशी जागा दिली?’ कारण फिडेलला चे नको होता, तर राऊल कॅस्ट्रोही का चालला असता? त्यालाही बाजूला केलं असतं. मुळात चे गव्हेराला तसंही सत्ता उपभोगण्याचा हव्यास नव्हता. तो क्रांतीचा प्रसार करण्यासाठी क्युबन क्रांतीनंतर निघून गेला. त्यामुळे फिडेल चे गव्हेराच्या विरोधात होता, हे सपशेल खोटं विधान वाटतं.

मुद्दा क्रं. 4. पाचव्या कॉलमच्या सुरुवातीलाच कुबेर सर फिडेलद्वेष सांभाळत लिहितात- अशा प्रवृत्तीच्या हुकूमशहांना जागतिक मंचावर मिरवणे आवडते. कॅस्ट्रो त्यास अपवाद नव्हते. अमेरिकाविरोधी जगाचे ते प्रवक्ते बनले. यातून स्वार्थ साधण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
या तीन विधानांमधून कुबेर सरांना हे सांगायचंय की, फिडेलने काहीच केले नाही. त्याने फक्त स्वार्थ साधला आणि हुकुमशाही जगभर मिरवली. कुबेर सरांचा हा मुद्दा खोडून काढण्यासाठी अजित अभ्यंकराच्या महानायकाचे निर्वाण!या लेखातील एक पॅरा इथे देतो आहे. त्यातून तुम्हाला कळेल, की फिडेलने क्रांतीनंतर क्युबात काय काय केलं. अभ्यंकर सर लिहितात- क्युबन क्रांतीने जगाला काय दिले हे सांगताना तिने क्युबाला काय दिले, हे प्रथम सांगितले पाहिजे. सर्व प्रथम शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार आणि अल्पावधीतच ९९ टक्के साक्षरता या क्रांतीने दिली. सर्वांना उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या मोफत सेवा दिली. मानवी विकास निर्देशांकामध्ये अमेरिका आणि अतिश्रीमंत राष्ट्रांच्या मालिकेतील एक देश म्हणून नाव मिळविले. खनिज उर्जेला पर्याय देणाऱ्या मानवी, प्राणी तसेच सौर उर्जा स्रोतसाधनांचा विकास करून त्यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनविले. क्रांतीच्या पूर्वी असणारे साखरेसारख्या पर्यावरण विनाशक पिकाच्या निर्यातीवरचे अवलंबित्व कमीत कमी करून दाखविले. पर्यावरणस्नेही जैविक तंत्रज्ञानाचा विकास करून नवीन औषधांचा विकास केला. हेपिटायटिस बी, मॅनेंजायटिस, डेंग्यू यासारख्या आजारांवर लशींचा शोध लावला. १९६९ पासून ३ लाख २५ हजार ७१० क्युबन आरोग्य सेवकांनी जगातील १५८ देशांत आरोग्य कार्यक्रमांत सहभाग घेऊन आपल्या वैद्यकीय प्रणालीचा भ्रातृभावी लाभ त्यांना मिळवून दिला आहे. जैविक खतांचाच वापर मोठ्या प्रमाणात करून उत्पादनवाढ प्राप्त केली. शहरात शेती आणि शेती उत्पन्न घेण्याच्या पर्यावरणस्नेही पद्धतींचा विकास केला.

बरं कुबेर सरांनी यापुढेही फिडेलला वाक्यागणिक झोडपून काढलंय. खरंतर मनातच फिडेलबद्दल पूर्वग्रह ठेवून काही लिहिलं, तर त्यातून द्वेषयुक्त शब्दच बाहेर पडतील, यात शंका नाही. त्यात कुबेर सरांचा कम्युनिस्टांविरोधातील राग सर्वज्ञात आहे. ह्योगा चावेझवरील संपादकीय सर्वांना आठवतच असेल. कम्युनिस्ट म्हणजे चूकच, असं मनातच ठरलेलं असेल, तर मग पुढे लिहिताना-बोलतानाही वेगळं अपेक्षितही नसतं. त्यातून द्वेषाचीच भावना प्रकट होत जाते.

इतकं लिहिल्यानंतर-बोलल्यानंतरही मी प्रमाणिकपणे नमूद करु इच्छितो की, फिडेल चुकला असेलही. किंवा चुकला असेलच, असं म्हणूया. पण कमालीच्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि ऐकीव माहितीचा आधार घेत त्याला झोडपून काढणं कितपत योग्य आहे?

शेवटाकडे जाताना फिडेलच्याच एका विधानाने शेवट करेन. कुबेर सर म्हणतात, फिडेल हुकूमशहा होता. तर फिडेल हुकूमशहा होताच. मात्र, त्याची व्याख्या वेगळी होती. तो म्हणायचा, “क्रांती म्हणजे शोषितांची शोषकांविरोधातील हुकूमशाही”. आणि फिडेलने अशीच क्रांती केली. मग तुम्हा-आम्हाला ती हुकूमशाही का वाटेना. त्याच्या मते आणि क्युबावसीयांमते फिडेल योग्य होता. म्हणूनच फिडेलने पाच दशकांहून अधिक काळ क्युबाचं नेतृत्त्व केलं.

No comments

Powered by Blogger.