कोबाड गांधी सुटले!


'डून' या डेहारादूनमधील प्रसिद्ध शाळेत शिक्षण. संजय गांधी वर्गमित्र. त्यानंतर मुंबईतील सेंट झेवियर्समधून शिक्षण. वरळी सीफेसला अलिशान अपार्टमेंट. लंडनमधून चार्टर्ड अकाऊटन्सीचं शिक्षण...... ते आदिवासी पाड्यात काम करणारा कार्यकर्ता. कसा आहे या माणसाचा प्रवास. कोण आहे हा कोबाड गांधी?.......

साधरणत: अत्यंत गरिबीची, हालाखीची परिस्थिती, त्यातही सरकारच्या कुठल्याही योजना न पोहोचल्याने सरकारविरोधात असलेल्या रागातून किंवा अभ्यास कमी असल्याने ब्रेन-वॉशिंगमधून अनेकजण नक्षलवादाकडे झुकतात, असे अनेक संशोधनपर वृत्तांमधून किंवा संबंधित घटनांच्या विश्लेषणातून लक्षात येतं. खरंतर नक्षलवादी होणाऱ्यांची कारणं अनेक असतील, पण गरिबी आणि अशिक्षितपणा, हे त्यातले महत्त्वाचे. पण एखादा अमाप पैसे असलेला आणि उच्चविद्याविभूषित कुणी नक्षलवादी चळवळीला सहानुभूती देणारा असेल तर…. थोडं स्वीकारायला कठीण जाईल. पण कोबाड गांधी हा त्यातलाच माणूस.

भारतात बंदी असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या आरोपावरुन आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोबाड गांधी यांना अटक करण्यात आली. मात्र, पंजाबमधील पटियाला कोर्टाने तीन दिवसांपूर्वीच कोबाड गांधींना सर्व खटल्यांमधून सुटका केली.

पण यापुढे जाऊन कोबाड गांधी या माणसाबद्दल सांगायचंय, जे थोडं इंटरेस्टिंग आणि धक्कादायक असे काही आहे. नक्षलवादी चळवळीत सहभागी होणाऱ्यांच्या आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीला छेद देणारी पार्श्वभूमी कोबाड गांधींची आहे. म्हणून त्या व्यक्तीबद्दल सांगण्याचा हा प्रयत्न...

कोबाड गांधींचा जन्म अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातला. अगदी एंगल्ससारखा वगैरे. म्हणजे नाही का, एंगल्सचा जन्मही उद्योगपतीच्या घरातला. मात्र, कार्ल मार्क्सच्या खांद्याला खांदा लावून कामगार वर्गासाठी भांडवलदारविरोधी मार्क्सवादी चळवळीत तो सक्रीय राहिला. तसंच काहीसं कोबाड गांधींचं.

1951
साली नर्गीस आणि अदी यांच्या पोटी कोबाड गांधी यांचा जन्म झाला. टिपिकल पारसी कुटुंबात. हे कुटुंब मूळचे गुजरातमधील. पण मुंबईत स्थायिक झालेले. कोबाड यांचे वडील अदी हे जगातील सहाव्या क्रमांकाची गणली जाणारी प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी असलेल्या ग्लॅक्सोमध्ये सिनियर फायनान्स एक्झिक्युटिव्ह होते. त्यामुळे घरचं वातावरण श्रीमंतीचंच. कोबाड गांधींचं घरही मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वरळी सीफेसवरील इमारतीत अलिशान अपार्टमेंटमध्ये. अत्यंत ऐश्योआरामाचं जगणं. कष्ट करुन जगावं, असं काही नाही. मात्र, तरीही कोबाड गांधी या माणसाला आदिवासींचं जगणं जाणून घ्यावं वाटलं, हे विशेष.

कोबाड गांधींचं सुरुवातीचं शिक्षणही डेहरादूनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डूनया खासगी शाळेतून झालं. या शाळेशी त्यांचं वेगळं नातं राहिलं आहे. कायमच. विशेष म्हणजे या शाळेत शिकत असताना इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी हे कोबाड गांधींचे वर्गमित्र होते. संजय गांधींशी कोबाड गांधींचे अत्यंत जवळचे सख्य होते. अत्यंत जवळचा मित्र. कोबाड गांधी पुढे मुंबईत आले. तरीही ते संजय गांधींना कधीच विसरले नाहीत किंवा संजय गांधी त्यांना कधी विसरले नाहीत.

पुढे मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण झालं. आणि त्यानंतर चार्टर्ड अकाऊन्टन्सीच्या शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं. तिथे चार्टर्ड अकाऊंटन्ट बनल्यानंतर इंग्लंडमधीलच काही कंपन्यांत त्यांनी कामही केलं. तिथेच त्यांचा काही डाव्या संघटनांशी संबंध आला आणि ते डाव्या विचारांकडे ओढले गेले.

ते भारतात परतले, त्यावेळ अकाऊंटन्सीची प्रॅक्टिस न करता किंवा कोणतंही फर्म न काढता मुंबईतल्या झोपडपट्ट्या फिरले. तिथली गरिबी पाहिली. दीन-दुबळ्याचं जगणं पाहिलं आणि थेट नागपूर गाठलं. आदिवासींच्या न्याय-हक्कांसाठी लढण्यासाठी. दरम्यान, अनुराधा यांच्याशी त्यांचं लग्न झालं. अनुराधा म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलावंत-डॉक्युमेंट्री मेकर सुनील शानभाग यांची बहीण. अनुराधा यांचा मृत्यूही आदिवासींसाठी लढताना जंगलात झाल्याची मला एके ठिकाणी माहिती मिळाली. अनुराधा यांनीही आदिवासींसाठी आपलं आयुष्य वाहून दिलं होतं.

माओवादी विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. नक्षलवादी चळवळीत ते सक्रीय होते, असाही त्यांच्यावर आरोप आहे. मात्र, न्यायालयाच्या कुठल्याही पायरीवर त्यांच्यावरचे कुठलेच आरोप सिद्ध झाले नाहीत.

आता प्रश्न असा आहे की, नक्षलवादी म्हणून आरडाओरड करुन त्यांना अटक करण्यात आली, त्यावेळी बहुतेक वृत्तपत्रांनी पानंच्या पानं भरुन कोबाड गांधींवर लेख लिहिली. नक्षलवादी अटक, असे म्हणत बातम्या दिल्या. मात्र, न्यायालयात तर तसा कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. किंबहुना, कोणतंही बेकायदेशीर वक्तव्य न केल्याने त्यांना सोडूनही देण्यात आलंय. आता काय? आता पानंच्या पानं भरुन सुटल्यानंतर लिहिणार आहात का?

हे सारं झालं न्यायालय वगैरे आणि थोडंफार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. पण मला राहून राहून वाटतं की, या माणसाच्या एकंदरीत आयुष्याबद्दल आणखी जाणून घ्यायला हवं. अत्यंत विलक्षण कुतुहलाचं आयुष्य, विस्मयचकित करणाऱ्या घटना, देशात महत्त्वाच्या स्थानी असलेल्या नेत्यांशी थेट ओळख, ऐश्योआरामाचं जीवन, गडगंज संपत्ती, तरीही आदिवासींसाठी रानोरान भटकणं.... हे सारंच अफाट आहे! काय असेल यामागची प्रेरणा? श्रीमंतीचं, ऐश्योआरामाचं जगणं सोडून आदिवासींच्या न्याय-हक्कासाठी लढायाला का गेला असेल हा माणूस? शोधायला हवं. कुछ अलगही केमिकल है इस आदमी में.... या माणसाला जाणून घ्यायला हवं आणि जमल्यास भेटायलाही हवं.


No comments

Powered by Blogger.