अमेरिकेतल्या पुस्तक दुकानांची सैर घडवणारे दोन लेख

पुस्तकप्रेमी आणि वाचक म्हणून जगभरात पुस्तक विक्रीची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच राहिली आहे. मग गूगल सर्च करुन याबद्दल नेहमीच माहिती मिळवतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज यासंबंधी लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर सरांनी १८ मैलांची ग्रंथयात्रामथळ्याचा लेख लिहिलाय. यात त्यांनी न्यूयॉर्कमधील स्ट्रँड बुक स्टोअरच्या यशस्वी वाटचालीबद्दल सांगितलंय.

८९ वर्षांपूर्वी म्हणजे १९२७ साली सुरु झालेल्या स्ट्रँड बुक स्टोअरमध्ये आजच्या घडीला सुमारे २५ लाख 'प्रिंटेड' पुस्तकं आहेत. तीन मजली इमारतींचा त्यांचा संसार आहे. इथे प्रिंटेडहा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. कारण किंडल किंवा इतर ईबुक रिडर डिव्हाईसमुळे प्रिंटेड पुस्तकं वाचण्याकडे कळ कमी दिसतो, अशी ओरड आहे. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही, हे कुबेर सरांच्या या लेखातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. लेख एकंदरीत भारीय. वाचनीय. सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेला.

याच निमित्ताने आणखी एका लेखाचा इथे उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं, तो म्हणजे निळू दामलेंच्या ब्लॉगचा. साधारणत: मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचं विश्लेषण वाचण्यासाठी निळू दामलेंचा ब्लॉग (http://niludamle.blogspot.in/) फॉलो करतो. न चुकता प्रत्येक नवीन पोस्ट वाचत असतो. दामले सरांनी जवळपास तीन-चार आठवड्यांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरानावाचा लेख लिहिलाय. अमेरिकेतल्या पुस्तक व्यवसायाचा आढावा घेणारा हा लेख अत्यंत वाचनीय असा आहे.

दामले सरांनी या लेखात अमेरिकेतील आयडोहा राज्यामधील बेंट कॉर्नर्स युज्ड बुक्सया दुकानाबद्दल सांगितलंय. जुनी पुस्तकं विक्री, खरेदी असं या दुकानाचं स्वरुप. यासोबत आणखी दोन दुकानांबद्दल दामले सरांनी या लेखात सांगितलंय. ती दुसरी दोन दुकांनी लय भारीयेत. मला खूप आवडली.

त्यातलं पहिलं म्हणजे- पॉवेल बुक्स. अमेरिकेतील पोर्टलँड शहरात हे दुकान वसलंय. आपण इमॅजिन करु शकत नाही, हे दुकान तब्बल १.६ एकरावर पसरलंय. हे दुकान १९७१ साली सुरु झालंय. पुस्तकं खरेदी-विक्री असं या दुकानाचं स्वरुप. दिवसाला जवळपास ३००० पुस्तकं हे दुकान खरेदी करतं. दुकानाचं उत्पन्न सुमारे १० कोटी डॉलर आहे. प्रिंटेड पुस्तकांच्या दुनियेत हे नक्कीच आश्वासक उदाहरण आहे.

दामले सरांनी या लेखात आणखी एका दुकानाचा उल्लेख केलाय, तो म्हणजे- मिनेसोटातील कॉमन गुड बुक्स’. इथेही जुनी पुस्तकं विकली जातात. इथला मालक जाम विनोदी आहे. त्याने जुन्या पुस्तकांच्या कपाटावर लिहिलंय- ‘Quality Trash’ म्हणजेच दर्जेदार कचरा. मला या नावावरुनच भारी वाटलं. क्वालिटी ट्रॅश. कसलं भारीय. साला कचरा या शब्दालाही दर्जा मिळवून दिलाय. अशा आणखी काही दुकानांबद्दल दामले सरांनी या लेखात लिहिलंय. ज्यांना शक्य त्यांनी दामले सरांचा ब्लॉग नक्की वाचा. वर लिंक दिलीच आहे.

जगभरातील पुस्तकांच्या दुकानांचे किस्से भारीयेत. विशेषत: युरोप-अमेरिकेत पुस्तकांच्या दुकानांनाही वेगळा इतिहास-भूगोल आहे. तसं आपल्याकडे फार कमी आहे. किंवा असल्यास मला माहित नाही. असो.

कुबेर सरांचा आजचा लेख वाचल्यावर तीन आठवड्यांपूर्वी वाचलेला निळू दामलेंचा लेख आठवला. म्हणून थोडं शेअर केलं.

No comments

Powered by Blogger.