“काय बकाल वस्तीत राहतोस रे तू!”


पुस्तकं वाचत असताना काही वेळा काही लेखच्या लेख किंवा संपूर्ण कथाच आपल्या आयुष्याशी रिलेट करणारी वाटते. त्यावेळी ते पुस्तक वाचण्यातही वेगळी मजा निर्माण होते. आपण आपल्याबद्दलच काहीतरी वाचत आहोत, असं वाटू लागतं. माझ्या बाबतीत असं अनेकदा झालंय. म्हणजे पुस्तकच्या पुस्तक नव्हे, पण एखादी कथा, एखादा लेख वगैरे माझ्याशीच रिलेटेड वाटू लागतं. वाचताना मग आणखी मजा येते.
       
आज वीक ऑफ असल्याने मनोहर सोनवणेंचं 'सदरा बदललेली माणसं' वाचायला घेतलंय. वसंत आबाजी डहाकेंची दीर्घ प्रस्तावना वाचल्यानंतर 'हुश्श्श' करत पुस्तकातील लेखांकडे वळलो.
       
जागतिकीकरणाच्या रेट्यात आपलं भोवताळ कसं बदलत गेलंय, याबाबत काही वैयक्तिक किस्से, मात्र ते आपलेसे वाटावे, असे किस्से या पुस्तकात आहेत. एकूण दहा लेखांचा हा संग्रह. पैकी सध्या पहिल्याच लेखात अजून मी आहे. 'स्केवअर फुटातली माणसं' हा पहिला लेख वाचतोय. पुण्यातील सोमवार पेठेतील लहानश्या खोलीतलं राहणीमन पुढे कसं बदलत गेलं, हे सोनवणेंनी यात मांडलंय. या लेखाच्या पहिल्याच पानावरील लेख मला रिलेट करणारा वाटला. तो असा :

मनोहर सोनवणेंनी आपल्या पुस्तकाच्या पहिल्याच लेखाच्या सुरुवातील राहत असलेल्या वस्तीची एक आठवण सांगितलीय. त्यांनी लिहिलंय- आमचा वाडा ज्या गल्लीत होता तिचं नाव खडीचं मैदान. ही या शहरातली सामान्याहून सामान्य, कुणाच्या खिजगणतीतही नसलेली एक नगण्य गल्ली. इथून तिथून सारी सामान्य माणसांची वस्ती. त्यांना तुम्ही दारिद्र्यरेषेखालचे म्हणा वा वरचे, त्यांनं काहीही फरक पडला नाही. त्यांचा जगण्याचा झगडा कधी चुकला नाही. जातीधर्माची लेबलं इथल्या लोकांनीही मिरवली असतील; पण त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कष्ट, दु:ख, अवहेलनेने कधी हा भेदभाव पाहिला नाही. बाप्यांची शिवराळ भांडणं, हाणामाऱ्या, दारु पिऊन झिंगत येणं हे इथं स्वभावत:च घडणारं. सार्वजनिक नळावर पाणी भरताना नाही तर धुणी धुताना एकमेकींच्या अंगावर बाया-बापड्यांनी धावून जाणं काय किंवा दुपारच्या वेळी आपापल्या दारात बसून दुसरीच्या घरातले गहू-ज्वारी-तांदूळ निवडणं काय, हेच इथलं रोजचं जिणं. सगळ्या घरांची दारं सताड उघडी. झाकून ठेवावं, लपवून ठेवावं असं त्यांच्याकडे काहीच नव्हतं. अशा वस्तीला बकाल म्हणतात, हे मला मी कॉलेजात गेल्यावर माझ्याकडे आलेल्या एका मित्रामुळे समजलं. माझ्या घरुन परतताना तो म्हणाला, काय बकाल वस्तीत राहतोस रे तू!”

मला आठवतंय मी मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये असतानाचा एक प्रसंग. तेव्हा पार्ल्यातील विमानतळानजीकच्या झोपडपट्टीत राहत होतो. कॉलेजमधून प्रोजेक्ट म्हणून शॉर्टफिल्म करायला सांगतली होती आणि प्रोजेक्टसाठी एक मित्र घरी आला होता. हा मित्र अंधेरीतील कोलडोंगरी भागातील एका हायक्लास टॉवरमध्ये राहत होता. त्याला झोपडपट्टीची तशी सवय नव्हती. प्रोजेक्टचं काम झाल्यानतंर तो निघूनही गेला. तोपर्यंत काहीच बोलल नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आणखी एका मित्राला तो सांगत होता, अरे हा नामदेव कुठल्या कोनावड्यात राहतो रे! जीव घुसमटायला लागला. तेव्हा मनोहर सोनवणेंसारखंच माझ्याही मनातील गल्लीविषयक अभिमानाला ते वाक्य फार लागलं होतं.

अत्यंत रिलेट करणारा हा प्रसंग. मनोहर सोनवणेंचं पूर्ण पुस्तक वाचायचंय. पण पहिल्याच लेखातील पहिल्याच पानावरील हा प्रसंग अगदी माझाच वाटला. अर्थात आता पुढे पुस्तक वाचताना थोडी वेगळीट मजा येणार आहे. कारण हे पुस्तक आणि त्यातील प्रसंग आपलसे वाटू लागलेत.

पूर्ण झाल्यावर आणखी लिहीन. तोपर्यंत इतकंच!

No comments

Powered by Blogger.