पप्पांची डेडबॉडी बघायला गेलेली आई!

माझ्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच निलिमाच्या लग्नात काढलेला पप्पांचा फोटो. 


खूपच दर्दभरा वगैरे लिहितो, अशी अनेकांची माझ्याबाबत तक्रार असते. त्यांची माफी मागूनच हे लिहितोय. कारण काल्पनिक वगैरे लिहायला फार जमत नाही. जे अनुभवलंय, जे जगलोय, जे पाहिलंय, ते मांडतो. किंबहुना, तेच मांडता येतं. बाकी काल्पनिक लिहायला गेलो की, दहा-पंधरा ओळींपलिकडे लिहिणं जमतच नाही. म्हणून जगण्यातलचे काही क्षण मांडत असतो. दुसरी गोष्टी अशी आहे की, मला व्यक्त व्हायचं असतं. बस्स.

विशेषत: पप्पांच्या आत्महत्येवरील बापाने आत्महत्या केली तो दिवस! हा लेख वाचल्यानंतर अनेकांनी पर्सनली फोन करुन तक्रार केली की, असे भयानक काही लिहित जाऊ नकोस. असे लेखन अंगावर येतं. झोप लागत नाही. मला त्यांचं म्हणणं पटतं, पण मला दुसरं लिहिता येत नाही. माझं लेखन हे माझं जगणं आणि माझं भोवताल मांडत राहतं. आजही तेच करणार आहे. जगण्यातला एक भयानक क्षण मांडणार आहे.

पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे महाडच्या सावित्री नदीचा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहात मध्यरात्री वाहून गेला. कित्येक जणांचं आयुष्य त्या पाण्यात वाहून गेलं. तडफडत. कुणाचा काही पत्ता नाही. या भयानक घटनेने माझ्या आयुष्यातील एका प्रसंगाची आज तीव्र आठवण झाली. अर्थात, हल्ली कामाच्या धबाडग्यात थोडं विस्मरणातही जातात अशा आठवणी. पण काही घटनांमधून त्या नको असलेल्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोरुन सरकू लागतात. प्रचंड त्रास होतोच. पण आठवणींना रोखता येत नाही. रोखता आलं असतं, तर मीच काय, आजूबाजूचे कित्येक जण आज सुखात असते. हा आसवांचा खेळ दिसलाच नसता.

महाडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. असे कधीही न घडो. किड्यामुंग्यांसारखी अफाट आकाराच्या गाड्या आणि लाखमोलाची माणसं वाहून गेली. नदीच्या उदरात गुडूप झाली. हाहा:कार माजला.

महाडच्या घटनेचा दुसरा दिवस. शोधकार्य सुरु होतं. या दुर्घटनेचा बळी ठरला असल्याची शक्यता असणाऱ्याच्या एका नातेवाईकाशी आमचे रिपोर्टर उमेश कुमावतांनी टिकटॅक केला. टिकटॅक म्हणजे माहिती घेतली. तो नातेवाईक म्हणाला, कुणीच माहिती देत नाही. आम्ही डेडबॉडीची वाट पाहतोय. आम्हाला काहीच आशा उरली नाही. पण सरकारी यंत्रणा डेडबॉडीसाठी आम्हाला येरझऱ्या घालायला लावतेय. नीट माहिती दिली जात नाही.

हे सारं भयानक आहे. मृतांच्या नातेवाईकांना योग्य माहिती, योग्यप्रकारे देणं अत्यंत गरजेचं असतं. ही बातचीत ऐकताना, पाहताना माझ्याच आयुष्यातील एक भयानक प्रसंग डोळ्यांसमोर आला.

मी सातवीत होतो. म्हणजे आजपासून जवळपास दहा-अकरा वर्षे आधीची गोष्ट. पप्पा त्यावेळी प्रचंड आजारी असायचे. मुंबईला हिऱ्याच्या कारखान्यात असताना डोक्याला ट्युबलाईट लागल्याने त्यांच्या मेंदूवर आघात झाला होता. उपचार झाले. मात्र, त्यांना झटके येत असत. कधी कुठेही निघून जात असत. अर्थात, काम वगैरे सर्व सुटलं होतं. कधी दोन-तीन दिवस कुठल्या कुठे निघून जायचे, तर कधी आठवडा आठवडा. मग आई वेड्यासारखी बिना चपलीची रान-वन, खेडीपाडी शोधून काढी. शेती सांभाळून आई पप्पांना शोधत असे. अनेकदा आईला कुठेतरी ते भेटत असत किंवा कधी कधी तेच स्वत:हून घरी परतत असत. असं साधारण तीन-चार वर्षे सुरु होत. यात तीन-चार वर्षात कित्येकदा पप्पा कुठेतरी निघून जायचे. मग शोधाशोध वगैरे सुरुच.

मी नववीत असताना एकदा असाच झटका आला आणि पप्पा मागच्या दारातून निघून गेले. आम्हाला वाटलं, ते नेहमीप्रमाणे दोन-तीन दिवसांनंतर येतील परत. तरीही आईने शोधाशोध केलीच. पण ऐन भात लावणीचा काळ होता. त्यामुळे उन्हा-तान्हातून उभा केलेला हा संसार असा अर्ध्यात सोडताही येत नव्हता. त्यात पंधरा-वीस गुरं आमच्या घरी होती. भात लावणी, गुरं असं सर्व सांभाळून आई पप्पांना शोधायला, गावं हिंडायची. त्यावेळी आजी होती. त्यामुळे आम्हा तिन्ही भावंडाच्या जेवणाचं आणि शाळेची व्यवस्था ती करी. त्यामुळे आईला आजीची तशी मदतच होई. एकटी आई रान-वन-गाव-शहर सर्व सर्व ठिकाणी जायची. तीन-चार वर्षांपासून पप्पा नियमितपणे कामाला नव्हते, त्यामुळे घरात पैशांचीही वणवण असायची. शेतीच्या मजुरीतून मिळालेल्या पैशांत घर चालायचं. त्यामुळे पप्पांना शोधण्यासाठी कुणाकुणाकडून पैसे घेई.

आठवडा उलटला, दोन आठवडे झाले, महिना गेला... पप्पा परतलेच नाही. आधी जसे तीन-चार दिवसांनी किंवा आठवड्यांनी ते स्वत:हून परतत असत, तसे आले नाहीत म्हणून सर्वांचीच चिंता वाढली. मुंबईहून नातेवाईक गावी आले. आपापल्या वेळेनुसार सगळीजणं शोधाशोध करु लागले. या शोधाता दीड-दोन महिना उलटला.

दिवसभर पप्पांना कुठे कुठे शोधून आलेली आई रात्री चुलीपाशी भाकऱ्या शेकवताना हमसून-हमसून रडत असे. आणि आम्ही तिन्ही भावंडं तिच्या बाजूला बसून तिच्याकडे बघत रडायचो. आजी थोडी खमकी होती. ती आम्हाला सावरायची. आजी सारखी म्हणायची, मी गावदेवाला नवस केलाय. माझा पोरगा आला, तर दहीहंडी बांधीन, पाच घरात भिका मागेन.

या साऱ्यात तीन महिने गेले. अनेक नातेवाईकांनी तर आशाच सोडली होती. ते आईला तसं समजवण्याचाही प्रयत्न करायचे. पण आई त्यांचं काहीच मनावर घेत नव्हती. कुणी कितीही सांगितलं तरी ती उजाडलं की शोधायला बाहेर पडत असे.

पप्पा हरवल्याची रोहा पोलीस ठाण्यात रितसर कळवलंही होतं. त्यामुळे पोलिसांनी रायगडमधील अनेक पोलीस ठाण्यात याबाबत माहिती पोहोचवली. मात्र, सुरुवातील सुरुवातील पोलीस आईला उलट-सुलट प्रश्न विचारत, त्यामुळे आधीच खचलेली आई आणखी चिंतेत पडायची. त्यात सुरुवातीचे एक-दीड महिना शोधायला मदत करणारे अनेकजण नंतर नंतर यायचेही बंद झाले. त्यामुळे आई एकटीच शोधत फिरायची.

अशाचतच एकदा माणगाव जवळील गोरेगाव पोलीस ठाण्यातून गावातील एका टेलिफोनवर फोन आला. आम्हाला एक डेडबॉडी मिळालीय. तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीशी कपडे मिळते जुळते आहेत. नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. तुम्ही येऊन पाहून जा. हे भयानक होतं. थरकाप उडवणारं.

मला आठवतंय पोलिसांचा फोन संध्याकाळच्या सुमारास आला होता. मी शाळेतून घरी आलो. वऱ्हांड्यातील धकाड्यावर बसून जेवत होतो आणि गावातना कुणीसा बोलवायला आला. काटकर बय, पोलिसांचा फोन आलाय.”, असं तो म्हणाला. नक्की कोण होता, ते आठवत नाही. बहुतेक आमच्या घरासमोरील दामूबाबा. आई वाड्यात होती. गाई-बैलांना पेंड घालत होती. मी आईला ओरडून सांगितलं, तेव्हा आई धावतच वऱ्हांड्यात आली आणि थेट फोनवाल्या घरात गेली. तिथून येताना आई प्रचंड घाबरलेली होती.

आई घरात आली आणि रडायला लागली. आम्ही तिन्ही भावंड, आजी आणि बाजूची तानी आक्का असे सर्वजण घरात तिच्यापाशी बसलो होतो. मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला म्हणजे निलिमाला समज होती. लहान भाऊ म्हणजे अक्षयला तेवढं समजत नव्हतं. त्यामुळे आई रडतेय म्हणून तोही रडू लागला होता. मी, निलिमा, आजी आणि तानी आक्काने आईला समजावलं आणि विचारलं की काय बोलले पोलीस?

आई रडतच आम्हाला सांगू लागली, पोलीस बोलत होते, गोरेगावला या. माणगावच्या इथे. पोलीस स्टेशनला या. एक बॉडी भेटलीय.. नदीत वाहून आलेली. तुमच्या माणसासारखेच कपडे आहेत. तेव्हा या आणि खात्री करुन जा.

आता आमचाही थरकाप उडाला. हे सारं भयानक होतं. आता संध्याकाळ झालीय. आता कसा कुणी जाणार. बाहेर मुसळधार पाऊस. त्यात आता जायचं नाही, मग रात्र कशी काढायची? सकाळपर्यंत थांबायला आई तयार नव्हती. मग गावातल्या कुणीतरी पोलिसांना फोन करुन विचारलं की, सकाळी आलो, तर चालेल का? तर पोलीस म्हणाले, "सकाळीच या. बॉडी हॉस्पिटलला आहे. तेव्हा आता आलात, तरी काहीच होणार नाही."

सकाळी तीन-चार वाजताच आई निघाली. ती भल्या पहाटे गोरेगावला निघून गेली. नंतर आजीने आम्हाला शाळेत पाठवलं. जितकं आठवतंय मला, मी शाळेत प्रचंड रडलो होतो. आमच्या शाळेतील सर्व सरांनाही पप्पांबद्दल माहित होतं. त्यामुळे त्यांनीही समजून घेतलं. संध्याकाळी शाळेतून परतलो, तरी आई आली नव्हती. आम्ही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आलो होतो. घरी वातावरण प्रचंड शांत होतं. आजी चुलीजवळ काहीतरी करत बसली होती. अंगणातून येणारा-जाणारा हाका मारत विचारत होते, आली का रं आयस?

अखेर सात वाजण्याच्या सुमारास आई आली. आई एकटीच होती. कुणीच तिच्यासोबत नव्हतं. गेल्या तीन महिन्यांपासून पप्पांना शोधायला गेलेली आई एकटीच घरी आली की रडायला यायचं. पण आज ती एकटी आली याचं बरं वाटलं. वऱ्हांड्यात होतो मी. तिला पाहिलं. ती एकटी होती. म्हणजे ती बॉडी पप्पांची नव्हती तर. खूप बरं वाटलं.

आई घरी आली. आणि खूप रडायला लागली. पप्पा नसल्याची खात्री करुन ती आली होती. आई घरी आल्यानंतर गावातल्या लोकांनाही गर्दी केली. काय झालं वगैरे विचारायला. आईने सांगितलं सर्व. रात्री जेवल्यानंतर आईला विचारलं, एवढा वेळ का झाला? आई म्हणाली, खूप वेळ पोलीस स्टेशनला बॉडीच आणली नव्हती त्यांनी. पोलीसही काहीच उत्तर देत नव्हते. विचारलं तर बोलायचे, तिथं बसा. बॉडी आली की सांगतो. हॉस्पिटलला आहे बॉडी. येईल की तुम्हाला बोलवू. मग बॉडी आली तेव्हाही माझ्यासारखेच खूप जण तिथे बॉडी बघून खात्री करायला आलेले. त्यांचाही कुणीतरी गेला असं बहुतेक. मग या गर्दीतून बॉडी पाहिली. पण ती बॉडी त्यांची नव्हती. तो दुसराच कुणीतरी व्हता.

कदाचित, तेव्हा मी तेवढा विचार केला नसेल, पण आज ते तीन महिने आणि खासकरुन तो दिवस आठवला तरी थरकाप उडतो. डेडबॉडी बघायला याअसा पोलिसांचा निरोप आल्यापासून ते बॉडी पप्पांची नाही, अशी खात्री पटेपर्यंत... यादरम्यानचा प्रत्येक क्षण कसा घालवला असेल? काय वाटलं असेल तिला? काय विचार तिच्या मनात आले असतील? तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल? किंबहुना, गोरेगावला पोलीस स्टेशनमध्ये बसून डेडबॉडीची वाट पाहत आई कशी बसली असेल? आपला नवरा जिवंत आहे की नाही, ही खात्री करण्याएवढी भयानक वेळ तिच्यावर आली होती.

तेव्हा हे सारं विचार करण्याएवढा मोठा नव्हतो कदाचित. पण आज जेव्हा कधी हा विचार करतो, तेव्हा तेव्हा अक्षरश: थरकाप उडतो.

हे सारं घडल्यानंतर दीड-दोन आठवड्यांनी पप्पा स्वत:च घरी परतले होते. ते अलिबागला कुठेतरी राहिले होते. असेच फिरते. कुणाच्या घरी नाही. कपडे माखलेले. प्रकृती पूर्णपणे ढासळळेली. ते आले तेही संध्याकाळीच. मला आठवतंय, पप्पा आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मग आम्ही शाळेतून आलो आणि घरी गेलो, त्यावेळी पप्पा खुर्चीत बसले होते. त्यांना पाहून रडायला आलं. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं. बाकी पूर्ण आठवत नाही. पण गेल्या तीन-साडेतीन महिन्यात घरात कुट्टा अंधार होता, आज त्यांच्या येण्याने घरात आनंद होता. पण ते बरे झाले नव्हते. त्यामुळे त्यानंतरही ते अनेकदा असे निघून गेले होते.

आयुष्यातली ही अत्यंत वेदनादायक घटना आठवण्याचं कारण म्हणजे परवा महाड दुर्घटनेतील नातेवाईकांचा बाईट. एक नातेवाईक बोलताना म्हणाला की, पोलीस नीट सांगतही नाहीत. खरंय हे. पोलीस कधीही नीट उत्तरं देत नाही.

मृतांच्या नातेवाईकांना आधार देऊन बोलणं गरजेचं असतं. मात्र, संवदेनाहीन असल्यासारखे पोलीस मृतांच्या नातेवाईकांशी वागतात. नातेवाईकांना समजावून सांगितलं जात नाही. त्यामुळे नातेवाईक घाबरण्याचीच शक्यता अधिक असते. या नातेवाईकांच्या मनावर काय परिणाम होत असले, याची कल्पनाच केलेली बरी.

No comments

Powered by Blogger.