आदरणीय (?) शोभाबाई!आदरणीय (?) शोभाबाई,

खरंतर तुमचं एकही पुस्तक मी आजतागायत वाचलं नाहीय. मला इंग्रजी फार जमत नाही आणि पेज थ्री कल्चरबद्दल वगैरे लिहिता, असं ऐकलं. त्यामुळे तसंही तुमच्या लेखनाला कधी स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला नाही. असो. तरीही हे पत्र तुम्हाला लिहितोय. पत्रकारितेतला नवखा पोरगा आहे. त्यामुळे चुकभूल द्यावी-घ्यावी.

परवा तुमच्याशी संबंधित बातमी करत होतो. आता बातमी काय असेल, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण हल्ली तुमच्या बातम्या अशाच प्रकारच्या होतात. अर्थात- वादग्रस्त विधानांच्या. आणि आताही तसाच विषय आहे- ऑलिम्पिक खेळाडूंच्या खिल्ली उडवण्याची. तर बातमी करताना तुमच्या नावापुढे 'सुप्रसिद्ध लेखिका' अशी बिरुदावली अभिमनाने लावली आणि बॅलन्स बातमी केली. खरंतर मनात तुमच्या विधानाबाबत प्रचंड राग होता. पण बातमीत तो उतरु दिलं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे आठवलं. आणि बातमी तटस्थपणेच केली.

शोभाबाई, या पत्रातून मी माझं मत मांडणार आहे. ते तटस्थ वगैरे आहे की नाही, हे मला माहीत नाही. कारण हे पत्र वैयक्तिक आहे. या देशातील क्रीडाप्रेमी म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून थोडं तुमच्या थोबाडावर चार शब्द फेकणार आहे.

थेट मुद्द्याकडेच येतो. उगाच वेडीवाकडी वळणं नको. तुम्हाला फार वेळ नसेल वाचायला. इतर ट्वीट्स करायचे असतील. आणखी कुणाचे अपमान करायचे असतील.

तर शोभाबाई, खरंतर तुमच्याबद्दल प्रचंड आदर होता. कारण आपल्या कलेतून ज्या माणसाने आमच्या महाराष्ट्राची ओळख देशासह जगभरात निर्माण केली, त्या आदरणीय दिवंगत गौतम राजाध्यक्षांच्या घराशी तुम्ही नातं सांगाता. तुम्ही मूळच्या मराठी आहात म्हणूनही वेगळा अभिमान होताच. हो.. हे सारं होतं यातच मोडतं. किंबहुना तुम्ही ते मोडायला भाग पाडलत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टी आहेतच. त्या नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना, मी तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रखर समर्थक आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे, सातासमुद्रापलिकडे जाऊन देशाची मान उंचावण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्यांचा अपमान करणं नाही. (अर्थात, तुमच्या ट्वीट्सना आलेल्या रिप्लायवरुन हे एव्हाना कळलंच असेल.)

शोभाबाई, तुम्ही भारतीय संस्कृतीचे दाखले आपल्या लेखानातून कायम देता, असं ऐकलंय. पेज थ्री कल्चरचं भारतीय जीवनाशी आलेला संबंध वगैरे मांडता, असंही ऐकलंय. (तुमच्या लेखनाबद्दल फक्त ऐकलंयच. वाचलं नाही, हे प्रामाणिकपणे नमूद करतो. आणि यापुढे वाचावं, असंही वाटत नाही. असो) पण गेल्या काही दिवसांपासून तुमची वादग्रस्त विधानं पाहता, तुमच्या कल्चरवरही आम्हाला बोलावं लागेल, असं दिसतंय. एक सांगू का शोभाबाई, विकिपीडियावर मराठीत तुमच्याबद्दल मोजून 10 ओळी आहेत. भारतीय लेखिका म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. त्यातही मराठीशी नातं सांगता. त्याच मराठीत तुमच्याबद्दल 10 ओळींपेक्षा जास्त माहिती नाही. (एकदा विकिपीडिया सर्च करुन बघा. मग कळेल.) यातच तुमची विधानं किती गांभीर्यानं घ्यावी, असाही प्रश्न पडतोच. पण तरीही एका सर्कलमध्ये, तुमच्या मताला किंमतही आहे. म्हणून हा नको असलेला आणि मनाविरुद्धचा पत्रप्रपंच.आता तुमच्या ट्वीटकडे येतो. “Goal of Team India at the Olympics: Rio jao. Selfies lo. Khaali haat wapas aao. What a waste of money and opportunity.” हे तुमचं ट्वीट. कुणाबद्दल केलंय? तर घरदार सोडून, अफाट मेहनत करुन, जीवाची बाजी लावून, घाम गाळून, सातासमुद्रापलिकडे फक्त आणि फक्त भारताचा तिरंगा डौलाने फडकला जावा, या एक आणि एकमेव उद्देशाने गेलेल्या माझ्या भारतीय खेळाडूंबद्दल. या ट्वीटनंतर कुणा भारतीयाला राग येणार नाही? अर्थात, राग कसा आला हे ट्वीट्सला मिळालेल्या रिप्लायवरुन कळलंच असेल. आयुष्याचे वाभाडे काढणारे रिप्लाय आलेत तुमच्या ट्वीटला. वाचले असालच. किंवा अशा रिप्लायना भावही देत नसाल, म्हणून कदाचित वारंवार वादग्रस्त विधानं करण्याची सवय जडली असावी. पण एकदा वाचा.. मग कळेल आपण काय आणि कुणाबद्दल बोलतो आहोत.

शोभाबाई, तुम्हाला दत्तू भोकनळ माहितंय? कसलं घंटा माहित असेल? नसेलच माहित. असतं तर असं ट्वीट करण्याआधी जनाचीव नाही, पण मनाची तरी लाज वाटली असती. सेल्फी काढण्यासाठी सातासमुद्रापलिकडे गेलेत, असं तुम्ही म्हणाला नसतात. अहो शोभाबाई, या दत्तू भोकनळची आई अंथरुणाला खिळलीय. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. म्हणून राहतं घर विकण्याची वेळ येऊन ठेपलीय. तरी हा पट्ट्या, फक्त आणि फक्त ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवावा, या ध्येयाने झपाटलाय. अर्थात, तुम्हाला हे सारं कळणार नाही. कारण तुम्ही कधी दत्तू भोकनळच्या किंवा त्याच्यासारख्या खेळाडूंच्या घरी कधी गेलातच नसाल. काय मेहनत करुन ते इथवर पोहोचलेले असतात, हे तुमच्या गावीही नसेल, म्हणून कदाचित तुम्ही सेल्फी काढायला गेल्याचं बोलता.

अभिनव बिंद्रा, विश्वनाथ आनंद किंवा इतर खेळाडूंमुळे भारताची ओळख जगात काय आहे, ही तुम्हालाही माहित असेलच. कारण बारा गावं फिरण्याची तुम्हाला आमच्यासारख्यांपेक्षा जास्त आवड आहे.

आमचे खेळाडू ऑलिम्पिकमधून पदक आणो अगर न आणो... त्यांचा अभिमान आम्हाला कायम राहील. कारण यातला हर एक जण अफाट मेहनतीने तिथवर पोहोचलाय. त्यामुळे त्यांनी केलेल्या मेहनीचा आम्हाला प्रचंड आदर आहे. तुमच्या प्रमाणपत्रांची किंचितही गरज नाही.

आणि हो शोभाबाई, हे पत्र लिहिताना प्रचंड संताप मनात होता. पण त्या संतापाला आवर घातला. थोडं उघडपणे लिहायचं म्हटलं असतं, तर यातल्या प्रत्येक वाक्याची सुरुवात आणि शेवट शिवीने करणार होतो. पण लिटरली त्या वेलकममधील नाना पाटेकरसारखं कंट्रोल कंट्रोल म्हणत पत्र लिहिलंय. नाहीतर आई-वडिलांचा उद्धार करण्याचंच ठरवलेलं. पण तुम्हाला दिलेल्या शिव्या, या अप्रत्यक्षपणे आमच्या गौतम राजाध्यक्षांनाही लागतील. म्हणून स्वत:वर नियंत्रण ठेवलं. असो.  

तर सरतेशेवटी, आदरणीय शोभाबाई डे आणि तत्सम मंडळी, खेळाडूंना पाठिंबा द्यायचा नसेल तर तोंड आवरा. उरला-सुरला आदर घालवू नका.

धन्यवाद!

No comments

Powered by Blogger.