पार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडीदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश्न होता. पण शिकायचं मुंबईतच, हे पक्क होतं. तस्सच झालं. दहावी झालो आणि मुंबईत आलो. काकांच्या येथे राहण्याची व्यवस्था झाली. खाणं-पिणं सर्व तिथेच. त्यांच्या घरातला एक सदस्य बनून राहिलो. विलेपार्लेतील आंबेवडीतील झोपडपट्टीत. ते नाही विमानतळाशेजारी आहे. तेच. पण इथे राहून शिकायचं, तर कामही करावं लागणार. कारण हातात पैसा असल्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्यात कॉलेज वगैरे होतंच. मग अर्धवेळ नोकरी करण्याचं ठरवलं. मुंबईत या संकल्पनेला पार्ट टाईम जॉब असं प्रतिष्ठित शब्द आहे. काम कोणतंही असो, पार्ट टाईम जॉब करतोय म्हटलं की, त्याला एक वेगळाच स्टँडर्ड यायचा. असो. तर म्हटलं पैसा आवश्यक आहे. पावलोपावली खर्च वाढतोय. किमान वरखर्चाचे तरी पैसे आपण जमा केले पाहिजेत. मग आयुष्यातील आणि मुंबईतलाही जॉब सुरु केला- वडापाव विकण्याचा.

तुम्ही कधी मुंबईत आला आहात का? आला असाल, तर तुम्हाला आता सांगेन, ते ठिकाण कळेल. ते म्हणजे- अंधेरीहून दादरच्या म्हणजेच शहराच्या दिशेने निघालो की, अंधेरी सोडताच उजव्या बाजूला एक भली मोठी झोपडपट्टी लागते. विमानतळाला वेढा घातलेली. याच झोपडपट्टीतून मुंबईनगरीच्या प्रवासाची सुरुवात केली. इथे संभाजीनगर आणि आंबेवाडी अशा दोन झोपडपट्ट्या एकमेकांशेजारी आहेत. त्यातल्या आंबेवाडीत काकांच्या घरी मी राहत असे. आणि शेजारील संभाजीनगर झोपडपट्टीत, मात्र हायवेशेजारी एका वडापावच्या दुकानात कामाला जात असे. आता विमानतळाच्या उन्नत मार्गासाठी इथल्या झोपडपट्ट्या हलवल्या गेल्यात. पण काही झोपड्या अजूनही आहेत.

तर संभाजीनगरमध्ये अगदी हायवेशेजारी एक वडापावचं दुकान आहे. आजही आहे. तुम्ही अंधेरीहून शहराच्या दिशेने निघालात की, ते उजव्या हाताला दिसतं. अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. (बरं, तुम्ही तिथे कधी गेलात, तर माझं नाव सांगून वडापाव खाऊही शकता. वडापावही चविष्ट आहे.) तिथे बने आडनावाची ताई आहे. तिचं ते दुकान. नवरा वारला. मग आता काय करायचं म्हणून आठ-दहा वर्षांपूर्वी तिने हे दुकान उघडलं. ती मूळची रत्नागिरीची. तर काकाचं कुटुंब जवळपास 30-35 वर्षे मुंबईत राहत होतं. त्यामुळे त्यांच्या ओळखीने मी त्या वडापावच्या दुकानात कामाला लागलो.

काम काय तर पाव अर्धे तोडायचे, त्यात तिखट, गोड आणि सुकी चटणी लावायची आणि वडा ठेवून गिऱ्हाईकांना द्यायचं. कटलेट असेल, तर तो व्यवस्थीत चार तुकड्यांमध्ये कापून, त्यावर चटणी टाकून द्यायचं. पार्सल असेल, तर ते नीट कागदात बांधून द्यायचं. बस्स. संध्याकाळी 6 ते रात्री 9.30 पर्यंत काम. पगार 450 रुपये. आयुष्यातील पहिला पगार घेतला तो याच वडापावच्या गाडीवर. जवळपास 10-11 महिने इथे काम केलं. सुरुवातीला 450 रुपये असलेला पगार तीन-चार महिन्यांनी थेट 800 रुपये झाला. कॉलेजमधील वरखर्चासाठी एवढे पैसे खूप व्हायचे. पुढे कॉलेजचा खर्च वाढला म्हणून दुसरा चांगला जॉब बघितला आणि 10-11 महिन्याने वडापावच्या गाडीवर जाणं सोडून दिलं.

इथे काम करतानाचा एक किस्सा आठवतोय. लय भारी आहे. पण त्यातून खूप शिकलो. त्याचा पुढे उपयोगही झाला. अजूनही होतोय. तर झालं असं होतं की-  इथे काम करत असताना मी डहाणूकर कॉलेजला शिकायला होतो. अकरावीत. खरंतर मुंबईच माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे ओळखीचे असे फार कुणी नव्हते. किंबहुना नव्हतेच. म्हणून वडापावच्या गाडीवर काम करायला कसलीच लाज वाटायची नाही. मात्र, कॉलेज सुरु झालं आणि आजूबाजूचे काहीजण ओळखीचे झाले. त्यात डहाणूकर कॉलेज पार्ले टिळक असोसिएशनचं. त्यामुळे पार्ले टिळकची अनेक मुलं डहाणूकरमध्ये अकरावीला होती. आणि पार्ले टिळकला अधिकाधिक मुलं-मुली विलेपार्ले, अंधेरी पूर्व भागातीलच. त्यामुळे सहाजिक मी जिथे वडापाव विकायला जायचो, त्या भागातही काही मुलं-मुली राहत होते.

कॉलेज सुरु झाल्यावर सुरुवातील कुणी ओळखीत नव्हतं. त्यात मी गावाकडून आल्याने शांत असायचो. सर्व मुलं मागच्या बेन्चवर बसण्यासाठी धावाधाव करायचे आणि मी पहिल्या. अगदीच हुशार वगैरे नव्हतो. तसा असण्याचं काही कारणही नव्हतं. कारण गावाल दहावीपर्यंत मराठीतून शिकून आलेलो आणि इथे हे कॉमर्सचं सर्व इंग्रजीत. काहीच कळत नव्हतं. म्हणून पहिल्या बेन्चवर बसून समजून घ्यायचो. अर्थात पुढे काही कॉमर्सही माझ्याने झेपलं नाही. म्हणून नाट्यमंडळात गेलो आणि अखेर बारावीनंतर स्ट्रिम चेंज केली आणि थेट समोरच असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये पत्रकारितेला प्रवेश घेतला. असो.

तर डहाणूकरमध्ये सुरुवातील एक महिना वगैरे कुणी ओळखीचं नव्हतं. पण नंतर ओळख व्हायला लागली. झाली. यातच जिथे वडापावच्या दुकानात कामाला होतो, तिथली मुलगी माझ्याच वर्गात होती. तेजस्वी नार्वेकर. कॉलेज चार-पाच वाजता सुटायचं. मग घरी जाऊन, थोडं फ्रेश होऊन, चहा प्यायल्यावर दुकानात जात असे. तेव्हा एकदा तेजस्वी वडा-पाव न्यायला आली होती, तेव्हा वडापावच्या दुकानाची जी मालकीन होती, त्या ताईला म्हटलं, ताई, मी आलोच पटकन. पाच मिनिटांत येतो.असे म्हणत तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.

खरंतर तिथून जाण्याची किंवा तेजस्वी आली म्हणून जाण्याची काहीच गरज नव्हती. कारण मी काही चुकीचं काम करत नव्हतो. पण तरीही वाटायचं की, हिला कळलं समजा की, मी वडापावच्या गाडीवर काम करतो, तर ती कॉलेजमध्ये सर्वांना सांगेल. म्हणून थोडी मनात भीती होती. कारण कुणाला कळलं की, मग विचारणार वगैरे. मग नको असलेली ती सहानुभूती.

अखेर त्या दिवशी तेजस्वीला टाळलं. पण एक दिवस खूप कामात होतो. कुणीतरी दहा-बारा वडापाव न्यायला आला होता. मग त्याचं पार्सल बांधणं सुरु होतं. तेवढ्यात तेजस्वी आली आणि मी तिला दिसलो. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर, वाटलं की हिने सांगितलं असणार. पण तिने कुणालाच नव्हतं सांगितलं. फार बरं वाटलं. आपण वडापावच्या दुकानात काम करतो, हे कुणाला कळायला नको, असंच सारखं वाटायचं.

एक दिवस पेपर आणायला हायवेच्या पलिकडे गेलो. संत जनाबाई रोडवर. पार्ल्यातील हा प्रसिद्ध रोड आहे. अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेता केतन क्षीरसागर वगैरे राहतात या रस्त्यावर. किंबहुना मकरंद देशपांडे राहतात, त्या बिल्डिंगसमोरच्याच पेपर स्टॉलवर पेपर आणायला गेलो. वाचनाची आवड होतीच. जरी कॉमर्सला होतो तरी. त्यामुळे नेहमी पेपर आणायला जात असल्याने तिथले पेपरवाले ओळखीचे झाले होते. गणपत जाधव त्यांचं नाव. आता त्यांनी पेपरस्टॉल बंद केलाय. आता ते तिथे नसतात. ते मूळचे चिपळूणचे. म्हणजे तसे गाववालेच. कोकणातले म्हटल्यावर. म्हणून त्यांच्याशी अधिक ओळख झाली. तर एके दिवशी जस्ट मी त्यांच्याशी बोलता-बोलता शेअर केलं की, वडापावच्या दुकानात काम करतो. पण तिथे वर्गातील काही मुलं-मुली राहतात. लाज वाटते. कॉलेजमध्ये सांगतील वगैरे.

त्यावर जाधव म्हणाले. (ते वयाने साठीत होते. पण मी त्यांना काका वगैरे बोलत नसे. जाधवच म्हणे. फक्त आदराने. अरे-तुरे नाही.) तर जाधव म्हणाले, आतापर्यंत वडापावच्या गाडीवर किती चोरी केलीस?”
मी- अहो चोरी काय? मी चोरी नाही करत. वडापाव विकायला जातो तिथे. ती ताई रीतसर पगार देते मला.
जाधव- छे! चोरी केलीसच असशील.
मी- नाही ओ. चोरी वगैरे नाही करत. तुम्ही असे का बोलता आहात?
जाधव- मग तिथे कुठल्या पोरीला छेडलंस?
मी- अहो, काय बोलताय? पोरीला का छेडू? कामाला जातो मी तिथे..
जाधव- बरं.. म्हणजे तू चोरी नाही करत, कुठलं गैरकाम करत नाहीस....असं तुला म्हणायचंय?
मी- अर्थात. हो... माझ्या आईने मला चोऱ्यामाऱ्या करायला नाही शिकवलं.
जाधव- गाढवा, एवढं कळतं ना तुला? मग का लाज वाटते तुला काम करायची? मेहनत करतोस. मग लाजायचं का? तू कुठल्या देशीदारुच्या दुकानात कामाला नाहीस. वडापाव विकून पगार घेतोस. तिथे कॉलेजची पोरं येवो नाहीतर आणखी कुठली.. मेहनत करताना लाजायचं असेल, तर एक सांगतो, मुंबई सोडून गावी जा परत. कारण मेहनतीला लाजणाऱ्याच्या गांडीवर लाथ मारते ही मुंबई...

मी निशब्द झालो. जाधवांना काय सांगायचं होतं, हे मला कळलं. आपण आपल्या मेहनतीचा आदर केला पाहिजे. तेव्हापासून वडापाव विकताना कसलीही लाज वाटली नाही. जाधवांनी सांगितलेलं वाक्य नी वाक्य पटलं होतं. जाधवांकडून पुढेही खूप शिकायला मिळालं. या माणसाचं आणखी महत्त्व आहे माझ्या आयुष्यात, ते या ब्लॉग सीरीजच्या पुढील भागात लिहिणारच आहे.

आता जाधव बहुतेक विरारला राहतात. गेली दोन-एक वर्षे कुठे दिसले नाहीत. त्यांनी पेपरचा धंदाही सोडलाय. एकुलता एक पोरगा दारु पितो. बायको कायम आजारी. जाधव एकटेच कमावते. साठी पार केल्यानंतरही जाधव खूप काम करतात. जीवतोड मेहनत. मध्यंतरी कुठल्याशा पॉलिसी कंपनीत एजंट म्हणून होते. पॅनकार्ड की आरएमपी, असं काहीतरी. चार वर्षात डबल पैसे वगैरे. त्यात अनेकांच्या त्यांनी पॉलिसी काढल्या आणि ती कंपनी बंद झाली. ज्यांच्या पॉलिसी काढल्या, ते लोक जाधवांकडे पैसे मागू लागले. कधी कधी धमक्याही देत. नंतर घरातलं काहीतरी विकून त्यांनी ते पैसे चुकते केल्याचंही मला कुणीतरी सांगितलं. असो. तर असा हा जाधव माणूस. मनाने दिलदार. प्रामाणिक. पण आयुष्याच्या कचाट्यात असा अडकला की, साला आयुष्य नकोसं व्हावं. पण तरीही मेहनत करुन जगतोय. असो.

तर जाधवांशी बोलल्यानंतर वडापावच्या गाडीवर काम करायलाही काही वाटायचं नाही. त्यामुळे जाधवांचं माझ्यासाठी महत्त्व मोठंय. तर पहिला जॉब असा सुरु झाला.

अगदी मोजून 10-11 महिने काम केलं आणि वडापावचं काम सोडलं. त्याला दोन कारणं होती- एक म्हणजे 6-9.30 अशी साडेतीन तास काम करुनही मिळणारा पगार कमी वाटला आणि दुसरं कारण म्हणजे याच काळात MS-CIT करण्याचं ठरवलं. दोन दोन कारण मिळाल्यानंतर वडापावच्या गाडीवर जाणं बंद केलं. अर्थात त्या ताईला आधी सांगितलं. तीही खूप मानते मला. आजही कधी पार्ल्यात गेलो, तर ताईच्या वडापावच्या गाडीशी जाऊन एखादा वडापाव खाल्ल्याशिवाय परतत नाही.

वडापावची गाडी... हा माझा आयुष्यातील आणि मुंबईतील पहिला जॉब. मेहनत करताना लाजायचं नाही, हे इथे शिकलो. कोणतंच काम लहान-मोठं नसतं. पडेल ते काम करायचं, हे मला इथेच कळलं. त्यामुळे या पहिल्या-वाहिल्या कामाचं मला अजूनही विशेष कौतुक आणि आदर आहे.

3 comments:

Powered by Blogger.