दिग्गजांच्या अनुभवांचा संच : उतरतात त्या आठवणीतुमच्या आठवणी तुम्हाला खूप काही शिकवणाऱ्या असतात. मग थोरा-मोठ्यांच्या, ज्यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप पाडली हे, ज्यांनी सार्वजनिक आयुष्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा दिग्गजांच्या आठवणी किती मोलाच्या आणि महत्त्वाच्या असू शकतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. असाच अनुभवांचा संच म्हणजे उरतात त्या आठवणी

आठवणी खऱ्या बोलतात. आठवणी कधीच फसवत नाहीत. त्या तुम्हाला तुमच्या खऱ्या आयुष्याची सफर घडवतात. मुळात त्यांना खोटं बोलताच येत नाही. शिवाय, आठवणी कधीच वैयक्तिक नसतात. माणसं आठवणींना वैयक्तिक चौकटीत डांबून ठेवतात. त्यांना मोकळा श्वास देत नाहीत. तो देणं गरजेचं आहे. कारण आठवणी या अनुभवांचं संच असतात. अनुभवांचं एकत्रिकरण म्हणजेच आठवणी. मग अनुभव इतरांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत... अशाच प्रकारे थोरा-मोठ्यांच्या अनुभवांच्या आठवणी या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अरुण शेवते सरांनी केला आहे. हे पुस्तक ऋतूरंगदिवाळी अंकातील अनुभवाधारित लेखांचा संग्रह आहे.

मेहरुनिस्सा दलवाई यांचं हमीदभाईंवरील अंतर, दया पवार यांचा बलुत्यातील रिकामी जागा, मंगला नारळीकरांचा उरतात त्या आठवणी हे तीन लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी केलं होतं. पुस्तक वाचताना अर्थात हे तीन लेख पहिल्यांदा वाचून काढले. कारण या तीनही लेखांबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. उत्सुकतेची अपेक्षा या तिन्ही लेखांनी शंभर टक्के पूर्ण केलीच. मात्र त्यानंतर मग उर्वरित लेख वाचण्यास सुरुवात केली आणि या तीन लेखांसह इतर लेखांसह अखंड पुस्तकच किती महत्त्वाचं कळू लागलं. यशवंतराव गडाख यांचा लेख...त्यानंतर मल्लिका अमरशेख यांचा गिनीपिग, शांता शेळकेंचा गप्पा आणि गप्पा, मे. पुं. रेगेंचा प्रतिबिंब, सरोजिनी वैद्यंचा मळभ आणि उन्ह, सुलोचना यांचा शूटिंग इत्यादी लेखही अत्यंत वाचनीय तर आहेतच, शिवाय पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं आहे.

थोरा-मोठ्यांचं ऐकत जा, चार ज्ञानाचे शब्द ते सांगतात, असे लहाणपणापासून आजीकडून ऐकत आलोय. नंतरच्या काळात आत्मकथा, चरित्रपर लेखन वाचत असताना, ते खरंही ठरलं. मोठ्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात. जगण्याला नवे परिमाण ठरवून देतात, नवी ऊर्जा देतात, ध्येयं गाठण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करतात. अरुण शेवतेंनी संपादित केलेलं उरतात त्या आठवणी पुस्तक आपल्याला या सर्व गोष्टींसह जगण्याची उमेद देतं. या पुस्तकात लिहिणाऱ्या प्रत्येक दिग्गजाचे अनुभव आपल्या जगण्याला नवी उमेद देतं. एका क्षणी त्यांचे अनुभव आपणही अनुभवतो किंवा त्या आठवणींचे आपणी हळूच भाग होऊन जातो.

निवडक पण तितकेच महत्त्वाचे लेख एकाच पुस्तकाच्या रुपाने आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अरुण शेवते सरांचे विशेष आभार. मित्रहो, वेळ मिळाल्यास, जमल्यास, हे पुस्तक एकदा नक्की वाचा.

No comments

Powered by Blogger.