या संस्कृतीरक्षकांचं करायचं काय?सकाळी वेलवेट कंडोमची बातमी केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील कुटुंब नियोजनाशी संबंधित एका कार्यक्रमात पूर्णत: देशी बनावटीचं महिलांसाठीचं वेलवेट कंडोम लाॅन्च केलं. बातमी पोस्ट करुन ट्विटर-फेसबुकवर शेअर केली आणि सात-आठ मिनिटांचा अवधी गेला असेल, तेवढ्यात शनी शिंगणापूर चौथऱ्याची बातमी आली. विश्वस्तांनी वाद टाळण्यासाठी शनी चौथऱ्यावर सरसकट सर्वांनाच प्रवेश देण्याची घोषणा केली. आता शनी चौथऱ्याची बातमी माझ्या सहकारी सरांनी केली आणि ती पोस्ट करुन शेअर केली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कंडोम आणि शनी चौथरा प्रकरणाचा संबंध काय? तर संबंध आहे आणि तो संबंध कुजक्या विचारांच्या तमाम मेंदूचं विकृत प्रदर्शन घडवणारं आहे.

शनी चौथरा प्रवेशबंदी हटवल्याच्या घोषणेची बातमी पोस्ट केल्यानंतर तथाकथित संस्कृतीरक्षकांनी वेलवेट कंडोमच्या बातमीखाली आपली 'संस्कृती दाखवायला सुरुवात केली. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळाल्यावर गड्यांचा पार्श्वभाग जळफटला असावा. वेलवेट कंडोमच्या बातमीखाली अतिशय घाणेरड्या, गलिच्छ शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवर तथाकथित संस्कृती रक्षक कमेंट करु लागले.

'हे कंडोम त्या तृप्ती देसाईला द्या' अशा घाणेरड्या शब्दात कमेंट करत आपल्या कुजक्या मेंदूचं प्रदर्शन घडवत काही संस्कृती रक्षक शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिल्याचा निषेध करत होते आणि आहेत.
जिच्या उदरातून जन्म घेतला, त्या मायेला समानतेचा हक्क मिळाला तर एवढा हैदोस का? इतकाच राग आहे, तर भुसनळ्यांनो महिलेशी लग्न का करता? मायेच्या रुपाला शिव्या देताना आणि त्यातही ती माय विधायक काम करत असताना तिला गलिच्छ शिव्या देणं, हे तुमच्या चार हजार वर्षे जुन्या संस्कृतीत लिहिलंय काय?

मीही हिंदू आहे. मात्र, 'हिंदू संस्कृतीत हे नाही, ते नाही' असं जे काही तथाकथित बोगस संस्कृतीरक्षक म्हणतात, त्यांची 'ते आणि हे नाही' ही यादी नक्की कुठेय? त्या यादीत महिलांना शिव्या देणं आणि समानता नाकारणं असेल, तर हिंदू असल्याची लाज वाटते. आणि तसं नसेल, तर मायेला लिंगावरुन शिव्या देणाऱ्यांनो, तुम्हाला हिंदू असल्याची लाज वाटायला हवी.

राहता राहिला मुद्दा तृप्ती देसाईंचा. शनी चौथरा आणि तृप्ती देसाई प्रकरण सुरु झाल्यापासून तृप्ती देसाईंवर अश्लिल जोक्स आणि कमेंट सुरु आहेत. या बाईचा हा पब्लिसिटी स्टंट आहे, बोगस बाई आहे, दिखाऊपणा आहे किंवा आज वेलवेट कंडोमच्या बातम्यांखाली आलेल्या अत्यंत घाणेरड्या कमेंट, या साऱ्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या. एक महिला येते आणि ती ४०० वर्षांपासून जिथे असमानतेची वागणूक मिळतेय, त्याविरोधात आवाज उठवते आणि लढा यशस्वीही होतो, हे काही उचललं बोट, लावलं की-बोर्डला आणि केली कमेंट, यातलं काम नाही. तृप्ती देसाईंनी आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये (मग तुम्ही त्याला 'पब्लिसिटी स्टंट'ही म्हणा) आंदोलन करुन हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेस भाग पाडला. वैचारिक घुसळण घडवून आणली. आणि लढा यशस्वीही झाला. त्यामुळे तृप्ती देसाईंचा या यशस्वी लढ्यात नक्कीच छोटा का होईना वाटा आहेच.

यासोबतच आदरणीय विद्या बाळ यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विकृत शब्दांचे शिंतोडे उडवायला हे संस्कृती रक्षक मागे पडले नाहीत. अरे तुमच्या मायेला हक्क मिळवण्यासाठी तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून ही बाई लढतेय. त्यांच्याबद्दल तरी आदर बाळगा.

शेवटी एकच सांगणं, संस्कृतीच्या नावाखाली संस्कृतीचे धिंडवडे काढू नका. सामान्यांच्या मनात याच संस्कृतीचा राग वाढत गेला, तर संस्कृतीचं रक्षण करता करता स्वत:चं रक्षण करण्याची वेळ येईल.No comments

Powered by Blogger.