मार्क्ससोबतच्या तीन भेटी!मला मार्क्स तीन वेळा भेटला. तिसऱ्यांदा भेटला, तेव्हा त्याने माझ्या मेंदूवर सत्ता काबीज केली होती. तिसऱ्यांदा भेटण्याचं कारण पहिल्या दोन भेटीत आहे. या तीनही भेटी अतिशय योगायोगाने झाल्या.

मार्क्स पहिल्यांदा भेटला मुंबईतील गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील निसर्ग सोसायटीत. तेव्हा कॉलेजला होतो. डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ या आम्हाला शिक्षिका होत्या. त्यांच्याकडे अनेक पुस्तकं होती. मुळात डॉ. कुंदांना सामाजिक चळवळींचा वारसा होता आणि त्याही तो वारसा त्या यशस्वीरित्या पुढे चालवत होत्या. तर अभ्यासादरम्यान आम्ही वर्गातील काही निवडक मुलं डॉ. कुंदा यांच्या घरी जायचो. बिंबिसार नगरमधील त्यांच्या घरी एक रुम खास पुस्तकासाठी होतं. पुस्तकांसाठी वेगळी रुम असते, हे पहिल्यांदा पाहिलं. तीन भिंती पुस्तकच पुस्तकं. तिथल्या पुस्तकांच्या रॅकमध्ये प्रत्येक खाण्यात मला मार्क्स दिसला. कधी 'बायजा'च्या अंकातून तर कधी 'मिळून साऱ्याजणी'च्या अंकातून... मग कधीतरी 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' हाती लागायचं. अनेक डॉक्युमेंट्स, मार्क्सच्या विचारांची स्तुती करणारी पुस्तकं, तर कधी 'आंबेडकर-मार्क्स' तुलना करत मार्क्सला चुकीची पाडणारी पुस्तकं... ती वाचत गेलो आणि मला मार्क्स भेटत गेला. डॉ. कुंदांच्या लायब्ररीत कुठल्याशा एका अंकात प्रा. एजाज अहमद यांचा लेख वाचला आणि याच लेखातून मार्क्स पहिल्यांदा फेस-टू-फेस भेटला. मेंदूला भिडला. मार्क्स पहिल्यांदा भेटला, तेव्हा रिअॅक्शन अशी होती की, लय डेन्जर माणूस आहे बहुतेक हा.. याच्या वाटेस जाण्यात काय अर्थ नाही. खूप टेक्निकल आणि कॉम्प्लिकेटेड विचार आहेत. गरिबांसाठी बोलतो खरं, पण गरिबांना तरी कळेल का, याला काय म्हणायचंय ते? असा प्रश्न पडला. पण मार्क्सने मला सहजासहजी सोडलं नाही. तो माझ्या मानगुटीवर बसला. मग त्याच्याबद्दल आणखी माहिती घेण्याचा विचार केला. याच विचारातून मार्क्सची दुसरी भेट झाली.

मार्क्स दुसऱ्यांदा भेटला तो दादरच्या लेनीन ग्राड चौकातील भुपेश गुप्ता भवनात. ते नाही का रविंद्र नाट्य मंदिर... त्याच्याच बाजूला आहे भुपेश गुप्ता भवन. डाव्यांचं वैचारिक गड, असं या ठिकाणाला म्हटलं तरी वावगं ठारणार नाही. डॉ. कुंदांनी कुठलंसं पुस्तक सतिश काळसेकरांना द्यायला सांगितलं होतं. त्यानिमित्ताने पहिल्यांदा भूपेश गुप्ता भवनात गेलो होतो. काळसेकरांनी तेव्हा जयदेव डोळेंचं 'समाचार' हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. थोड्याफार गप्पा झाल्यानंतर मग काळसेकर म्हणाले, 'ते पाहा, पुस्तकं प्रदर्शनाला लावली आहेत, कोणती आवडली तर बघा. चाळा आणि घेऊन जा.' पुस्तकं म्हटल्यावर काळसेकरांशी गप्पा थांबवून तिकडे वळलो. लोकवाङमय प्रकाशनाच्या पुस्तकांबद्दल प्रचंड ऐकलं होतं. पुस्तकं कसली त्या पुस्तिकाच होत्या. अशा पुस्तिका वाचायला आवडायच्या. कारण लवकर संपतात. फाफटपसारा नसतो. याआधी ज्ञानेश महारावांच्या अशाच काही पुस्तिका वाचल्या होत्या. थोडक्यात पण सखोल माहिती. यातून 'मार्क्सवाद म्हणजे काय?' 'परिवर्तनाच्या दिशा' आणि 'मार्क्सावादाचा जाहीरनामा' ही तीन पुस्तकं हाती लागली. घरी येऊन वाचून काढली. मार्क्सवाद आपलासा वाटू लागला. मार्क्स 'माणसाचा' विचार करतोय, असं वाटू लागलं. आणि इथेच तिसरी भेट ठरली.

मार्क्सशी तिसरी भेट साठ्ये काॅलेजच्या लायब्ररीत झाली. काळसेकरांकडून आणलेल्या तिन्ही पुस्तकातून मार्क्सवादाबद्दल ओढ वाढली होती. मग 'दास कॅपिटल' समजून घेण्याचं ठरवलं आणि तशी चौकशी केली. मग कळलं, 'दास कॅपिटल'चं मराठी रुपांतर आहे. कॉलेजच्या लायब्ररीत बसून ते वाचलं. हे पुस्तक काही एक दिवसात वाचून झालं नाही. चांगले आठ-दहा दिवस गेले. यादरम्यान अनेक शब्दांचे अर्थही कळायचे नाहीत, तर कधी काही वाक्यांचा अर्थच लागायचा नाही. मग साठ्येच्या सोशोलॉजीच्या हेड गिरीजा गुप्तेंना विचारायचो. गिरिजा गुप्ते म्हणजे दिवंगत कामगार नेते वसंत गुप्तेंची कन्या. गिरीजा मॅम नीट समजावून अडलेला शब्द-वाक्य सांगायच्या. एव्हाना मार्क्स बऱ्यापैकी कळला होता. डोक्यात घुसला होता. त्याने मेंदूवर सत्ता काबीज केली. मार्क्सला तटस्थ मनाने वाचलंत, तर तो तुम्हालाही आपला वाटेल, यात मला तीळमात्र शंका नाही. कारण मार्क्स संवेदनशील मनाला पछाडतोच.

दुर्दैवाने, मी खरा मार्क्सवादी कधीच होऊ शकलो नाही, हे मी नम्रपणे कबूल करतो. कारण ज्या भांडवलशाहीला मार्क्स विरोध करतो, त्याच भांडवलशाहीने तयार केलेल्या तमाम उपकरणांचा, सुविधांचा मी मनमुरादपणे उपभोग घेतोय. आणि वर त्याविरोधातच बोलण्याचा खोडसाळपणा मी करणार नाही. मात्र, मार्क्सच्या मूळ विचाराबद्दल, मार्क्स-एंगल्स यांच्या प्रामाणिक हेतूबद्दल आणि त्यांच्या मांडणीबद्दल मला नितांत आदर आहे आणि यापुढेही राहील.

मार्क्सवादावर टीका होते आणि होतच राहणार. पण मार्क्सवादाशिवाय जग कधीच नसेल, हेही खरंय. कारण भांडवलशाही कायम कामगारांची गळचेपीच करते आणि म्हणून जोपर्यंत जगात कामगार आहेत, तोपर्यंत कम्युनिझम जिवंत राहणारच. मग तुम्ही हे मान्य करा अथवा नका करु.दस्तुरखुद्द कार्ल मार्क्सच्या हयातीतही त्याच्या विचारसरणीवर जोरदार टीका होत असे. तेव्हा एकदा गमतीने मार्क्स म्हणाला होता- 'Thank God! I am not Marxist.'

No comments

Powered by Blogger.