..तेव्हा संजय राऊत येतील का?

प्रिय शिवसैनिकांनो,

आदरणीय संजय राऊत जहाल हिंदूत्त्वाची वगैरे भाषा करतात. पाकिस्तानला शेवटच्या श्वासापर्यंत वगैरे विरोध करु, अशी बोलून बोलून गुळगुळीत झालेले डायलॉग ते नेहमीच सामनाच्या ऑफिसमधील संपादकीय केबिनमधून मारत असतात. किंवा संसदेच्या पायऱ्यांशी उभं राहून एएनआयच्या बूमसमोर. या व अशा विधानांनी संजय राऊत गेली अनेक वर्षे सामान्य मराठी तरुणांना उसकवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला आहे. शाईफेक करणारे कार्यकर्ते हे त्याची फलश्रुती आहे. हिंदूत्त्वादी तरुणांनी जागे राहा, लांड्यांना थारा देण्याची गरज काय असे अनेक वादग्रस्त विधानं राऊत यांनी केले आहेत. ही विधानं तरुणांची माथी भडकावण्यासाठी पुरेशी असतात.

आता मूळ मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे पत्र लिहिण्याचे कारण. संजय राऊतांचे ऐकून आक्रमक होऊन बेकायदेशीर कृत्य करु नका. याचं कारण संजय राऊत यांना त्यांच्या विधानमुळं फार फार तर अटक होईल. पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पीआय त्यांना सॅल्युट मारेल. तेही खुर्चीतून उठून. हाय-फाय हॉटेलचा चहा मागवला जाईल. संजय राऊत सुरका मारुन चहा पितील. खूप गरम होतंय, असं कुरमुरत पंखा फास्ट करायला सांगतील. हवालदार पंखा फास्ट करेल. संजय राऊत कॉलरचं बटन उघडून कॉलर थोडी मागे घेत पंख्याची थंडगार हवा घेतील. एक तास होत नाही, तोच त्यांना जामीन मिळेल. राऊतांना जामीन मिळणारच होता, या विश्वासाने बाहेर त्यांचा ड्रायव्हर गाडी सुरु करण्याच्या तयारीत बसलेला असेल. राऊत बाहेर येतील, पत्रकारांना टाळून आपण आज पत्रकारांसाठी किती महत्त्वाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि थेट सेनाभवन गाठतील. थोडा आराम करतील आणि संध्याकाळी ४:३० वाजता पत्रकार परिषद बोलावून आपण किती शूर आहोत, अटकेलाही भीत नाही, पाकड्यांना विरोध करणारच असे विधानं करुन पुन्हा मराठी तरुणांची डोकी भडकावतील. जोपर्यंत ते राज्यसभेचे खासदार आणि सामानाचं संपादक आहेत, तोपर्यंत हे असेच सुरु राहील. त्यांना ना पोलिसांची भीती ना कुणाची. कारण ते एक नेते आहेत. पोलिस त्यांना हातही लावणार नाहीत. राऊतांनी शिव्या दिल्या तरी त्यांना पोलिस 'हायफाय अटकसत्रा'पलिकडं काहीच करणार नाहीत.

पण संजय राऊतांच्या ठिकाणी तुम्ही असाल तर? जरा विचार करा. तुम्ही एखाद्या तोडफोडीत पोलिसांच्या तावडीत सापडलात तर? एखाद्या मोर्चात तुमच्या पायाच्या नळीवर पोलिसांच्या फायबरच्या काठीचा जोराचा फटका बसला तर?.. येणार आहेत का संजय राऊत? बघा विचार करा. हे लोक केवळ माथी भडकावतात. आपल्या शिवाजी राजाचा केवळ 'इलेक्शन प्रॉडक्ट' म्हणून वापर केलाय या लोकांनी. आपल्या शिवरायांना एका समूहात बांधून ठेवलंय या लोकांनी. जरा विचार करा मित्रांनो. विचार करा.


आपला नम्र,
शिवरायांचा सैनिक

1 comment:

  1. हेच लोकना कळत नहीं हे दुर्दैव।

    ReplyDelete

Powered by Blogger.