सलाम प्रेमचंद साब!

प्रेमचंद
हिंदी साहित्य तसं आपल्या मराठी वाचकांमध्ये कमी प्रमाणात वाचलं जातं. साहित्याबद्दल प्रचंड ओढ असणारे, इतर प्रांतात-काळात काय चाललंय याची उत्सुकता असणारे किंवा फार फार तर साहित्य क्षेत्रातील व्यक्ती यांच्यापलिकडे हिंदी साहित्य वाचलं जात नाही. मीही याला अपवाद नाही, हे इथे प्रामाणिकपणे नमूद करतो. मात्र, जे हिंदी साहित्यिक वाचले, ज्यांचं लेखन काही प्रमाणात का होईना वाचले त्यांच्यामध्ये प्रेमचंद यांचा समावेश आहे. आपल्या लेखनातून वाचकांना संवेदनशील करण्याचा मनपासून प्रयत्न करणाऱ्या प्रेमचंद यांनी माणूसपणाचा प्रचार-प्रसार केला.

लोकांना काय आवडतं हे लिहिणं म्हणजे साहित्य नव्हे, असे मानणाऱ्यांपैकी प्रेमचंद होते. जगण्यातील विसंगती, भेदभाव आणि त्यातून आलेले मानसिक ताण, दारिद्री, मनाची दुखरी बाजू, कायम गुलाम राहिलेल्या समाजाचं वास्तववादी चित्रण, हे सारं प्रेमचंद यांच्या लिखाणांचं वैशिष्ट्य.

अशा या प्रेमचंदांच्या लेखनापासून मीही वंचितच होतो. शाळेत हिंदीच्या पुस्तकात पहिला धडा प्रेमचंदाच्या गोदानमधील वगैरे असायचा. एवढाच काय तो संबंध प्रेमचंद आणि माझा. गावाकडं लायब्ररी वगैरे असली काहीच भानगड नव्हती. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त वाचण होत नसे. दहावीनंतर जेव्हा मुंबईत आलो तेव्हा थोडं वाचनाकडे वळलो. साठ्ये महाविद्यालयात तेव्हा (बहुतेक आताही) प्रेमचंद मोहत्सव भरत असे. मुजीब खान नावाची व्यक्ती हा सारा खटाटोप करत असे. खटाटोप अशासाठी म्हटलं कारणं प्रेमचंदांच्या कथांचं नाट्यरुपांतर करुन ते सादर करण्याचं काम मुजीब खान करत असत. विशेष म्हणजे हे नाट्य रुपांतर पाहण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नसायचे. (कदाचित म्हणूनच मी प्रेमचंद महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावायचो.)

डहाणूकरमधून साठ्ये कॉलेजमध्ये बीएमएमला प्रवेश घेतला. मग काय... प्रेमचंद महोत्सव घरचा सण असल्यासारखाच. प्रेमचंद महोत्सवाला नियमितपणे हजेरी लावत गेलो. सुरुवातील हा लेखक कळायचा नाही. काहीतरी वेगळं मांडतो. विदारक सत्य मांडतो. खूपच दारिद्री अनुभवलीय या लेखकाने असं वगैरे वाटायचं. मात्र, हिच उत्सुकता कारणीभूत ठरली प्रेचंद यांचं लेखन वाचायला. मग थेट गोदानवरच ताव मारला.
मुजीब खान

गोदान, कफन, रंगभूमी वगैरे सर्व लेखन आतून-बाहेरुन हादरवून टाकणारं आहे. भारतीय समाजाचं चित्रण अत्यंत योग्य पद्धतीने प्रेमचंद यांनी रेखाटलं आहे. फार काही मी वाचलं नाही, पण जी तीन-चार पुस्तकं वाचलीत, त्यावरुन हा लेखक आंतरराष्ट्रीय दर्जाचा होता, हे निश्चितपणे सांगू शकतो. प्रेमचंद यांच्या कथांवर सत्यजित रे यांनी दोन पिक्चरही काढले होते. सतरंज के खिलाडी वगैरे. 

माझं प्रेमचंदांबद्दल आणि त्यांनी लिहिलेलं वाचन झालं, याचं कारण मुजीब खान. त्यांच्यामुळेच मी प्रेमचंद समजू शकलो. काहीप्रमाणात का होईना. आज प्रेमचंद यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने थोडं लिहावसं वाटलं ते लिहिलं.
आज प्रेमचंद यांचा स्मृतीदिन. सलाम प्रेमचंद साब!


No comments

Powered by Blogger.