गोपीबयचा मृत्यू

गोपीबय गेली. तशी ती कुणीच नव्हती माझी. गावातील एक. शेजारीही नाही. घरापासून चार-पाच घरं सोडून तिचं घर. गेली जवळपास १० वर्षे ती अंथरुणाला खिळलेलीच. म्हणजे स्वत:चं सर्व तिला करता येत व्हतं. पण तेवढंच. सुनेनं सर्व सांभाळ केला. वृद्धापकाळानेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी साधारणत: ८०-९० वर्षांची असेल.
परवा गावी गेलो. तेव्हा मनात कायम सळत राहील अशी गोष्ट कळाली. तसं मी गावी गेलो की गोपीबयला पाहिल्याशिवाय परत मुंबईला येत नाही. नात्यातील नव्हती. पण गावात जो कुणी माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, त्यातील ती एक होती.
"तू अनंताचा ना रे?" अशी ती मला ओळख द्यायची. कमी दिसत असल्याने आवाजावरुन ओळखायची. तिच्या मृत्यूआधी गावी गेलो तेव्हा घाई-गडबडीत होतो. गोपीबयला हाक मारायला जायला जमलं नाही. म्हटलं पुन्हा येईन तेव्हा जाईन. मुंबईत आलो आणि तिस-याच दिवशी गोपीबयच्या निधनाची वार्ता कळली. मन सुन्न झालं. गार पडलो. डोळ्यासमोरुन गोपीबयच्या आठवणी सरु लागल्या आणि एका क्षण डोळ्यासमोर किंचितसा अंधार आला.
अपराधी असल्यागत वाटू लाग़लं. आता गेलेलो तेव्हा गोपीबयला बघायला जायला हवं होतो, असं सारखं मनात येत राहिलं. यात आणखी भरीस भर म्हणजे तिच्या निधनाच्या आदल्या दिवशी तिने माझ्या आईशी माझ्याबद्दल चर्चा केली होती. हे ऐकल्यावर तर आणखीच अपराधी भावना दाटून आली.
आईची माया देणारी गोपीबय गेली. हा चटका न सोसावणाराच होता आणि आहे. वयोमानानुसार नैसर्गिक मृ्त्यू आल्याने फार काही वाटलं नाही. मात्र, जवळची व्यक्ती गेल्याचं दु:ख आहेच.
काही दिवसांपूर्वी गोपीबय मला म्हणाली होती-
"बावा टीव्हीत काम करतोयस सांगत व्हती संतीबाया. मेली माझं डोलं कुसले, त्यांना काय दिसत न्हाय. नायतं तुला पायलं असतं. बापाचं नाव काढ पोरा. म्हातारा हो."
गोपीबयने दिलेला हा आशीर्वाद आयुष्यभर पुरणारा आहे. रक्ताचं नातं नसूनही जगणं शिकवून गेलीस तू. कायम लक्षात राहशील.


No comments

Powered by Blogger.