दिस जातील, दिस येतील...


गीतकार सुधीर मोघे यांच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या या गीताने काबाड-कष्ट करुन जगणाऱ्या आणि आठरा विश्व दारिद्र्य भोगणाऱ्या शेतकरी कुटुंबाला जगण्याचं नवं बळ देऊन जातं. जगण्यात राम राहिला नाही म्हणत या जगण्याला-जगाला आणि स्वत:ला दुषणं देत काळाच्या पडद्याआड जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येकांना जगण्याची उमेद देणारं हे गीत. नवx चैतन्य निर्माण करणारं गीत आहे. गीतकार एखाद्या माय-बाप शेतकरी जोडप्याला समोर उभं करुन समाजावतो आहे की काय, असे वाटावं असे हे गीत. सुधीर मोघेंसारख्या संवेदनशील गीतकाराने कदाचित असे केलेही असावे. त्यांच्या लेखणीतून साकरलेलं हे गीत म्हणजे संवेदनशील माणसाचं उदाहरणच आहे. मोघे लिहितात

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

गीतकार कष्टकऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं मांडू पाहतो आहे. निस्वार्थी, निरागस असलेल्या माझ्या शेतकरी बांधवाला फार काही नको आहे. त्याच्या अपेक्षा, त्याचे स्वप्नं हे त्याने कुवतीप्रमाणेच पाहिलेत. त्याला ना कोणतीही चौकट मोडायचीय, ना कोणत्याही मोठ्या संपत्ती हव्यास. त्याला त्याच्या लेकरासाठी फक्त एक निवारा हवाय. त्याचं संसार त्या छोट्या निवाऱ्यात समाधानी असेल, असे माझा शेतकरी सांगतो आहे. या घरात सोन्या चांदीचं वैभव नसेल, मात्र जे आहे त्यात गोड मानून सुख नांदत असेल, असेही तो सांगू पाहतो आहे.

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

गीतकार सुधीर मोघे पुढे शेतकऱ्याच्या पोटा-पाण्याचा प्रश्न मांडू पाहतो. त्यांचं जिवापाड प्रेम असलेल्या त्या शेतातून सोनं उगवेल अशी आशा व्यक्त करतो आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, उन्ह-वारा या साऱ्यांनी त्रस्त झालेला शेतकरी आशा व्यक्त करतो आहे की, हे सारं कधी ना कधी निघून जाईल.. आपलेही चांगले दिस येतील. दुष्काळानं करपलेल्या शेतात कधीतरी हिरवं उगवेल, वरुणराजा नक्की आपली व्यथा समजून घेईल, अशा आशेत शेतकरी आहे, असे या ओळी सुचवू पाहत आहेत. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी मोठ्या धीराने झुंज देऊ, खांद्याला खांदा लावून अडचणींना सामोरे जाऊ, आपल्या दोघांची सोबत आपल्याला बळ देईल असे शेतकरी त्याच्या लक्ष्मीला म्हणजेच बायकोला सांगत आहे.


ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो
आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल
तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल

एक दिवस वरुणराजा नक्कीच बरसेल.. वाऱ्याच्या थंडगार झुळुकेनं आमच्या बळीराजाला नक्की हसवेल. एवढंच नव्हे मनमोहक फुलासारखं निखळ हसरं सुख देऊन जाईल.. आयुष्यातील अडचणींना-काट्यांनाही तो खेळवेल, असे सुधीर मोघे शेतकरी राजाला आश्वासित करतायेत.

उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

कोण म्हणतं फक्त दु:खच असेल बळीराजाच्या नशिबी आहे? केवळ आसवंच बळीराज्याच्या नशिबात आहेत.. नाही. एक दिवस ही आसवांची रात उडून जाईल... बळीराजाच्या चेहरा फुलून येईल अशी पहाट नक्की उजडेल.. तोपर्यंत माझ्या बळीराजा वाट पाहा. खचून जाऊ नकोस.. घाबरु नकोस.. एक दिवस तुझाच असेल...असे घर-दार... पोरं-बाळं... फुलवलेला सुंदर संसार वाऱ्यावर सोडून जाऊ नकोस.

नामदेव अंजना (प्रतिनिधी, एबीपी माझा)

No comments

Powered by Blogger.