उत्साही तरुणांचा देश

पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)

मागील काही वर्षांपासून देशातील विविध मुद्द्यांवर तरुणाई सक्रियता दाखवू लागलेली आपल्याला दिसून येते. मीही याच तरुणाईचा एक सदस्य असल्याने तरुणांच्या भूमिकेबद्दल विवेचन करणं मला गरजेचं वाटतं. कारण देशातील विविध समस्यांविरोधात तरुणाईचा आवाज घुमणं गरजेचं असतं. तरुणाईचा आवाज परिणामकारक असतो...तरुणाईच्या आवाज क्रांतीचा हुंकार असतो...परिवर्तनाची लाट असते. मात्र, स्वातंत्र्यानंतरचं साठ-सत्तरचं दशक किंवा फार-फार तर ऐंशीपर्यंतची दशकं सोडली तर हा हुंकार फार काही दिसला नाही असे जाणकार सांगतात. मात्र आज विविध आंदोलनांमध्ये तरुणांची सक्रियता दिसते व ही सक्रियता खूप महत्त्वाची आहे, असेही समाजातील सजग नागरिकांचं मत आहे. असे म्हटलं जातं की, सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रियतेला कारणीभूत ठरत असते. त्यामुळे सज्जन तरुणांच्या सक्रियतेला पर्यायाने अधिक महत्त्व प्राप्त होतं. मात्र, गेल्या तीन-एक वर्षांपासून उत्साही तरुणांचा मोठा सहभाग विविध आंदोलनं, निषेध मोर्चांमधून दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल उत्साही तरुण म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तर एखदी घटना घडल्यावर त्वरित प्रतिक्रिया देणारे तरुण वाढताना दिसतायेत. तरुणांच्याच भाषेत सांगायचं तर इन्स्टंट रिएक्शन देणारे वाढतायेत. मग ते मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारे असो वा घटनास्थळी मूक मोर्चे नेणारे असो किंवा अगदी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणारे असोत. मात्र हे निषेध मोर्चे, आंदोलने किंवा आणखी काही, हे सारे तडीस घेऊन जाताना आजची तरुणाई दिसत नाही. काही गोष्टींसाठी अटोकाट प्रयत्न करण्याची आणि सातत्याने लढा देण्याची गरज असते व याचीच कमतरता आजच्या तरुणांमध्ये आढळून येते.

जेव्हा आपण देशातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असतो त्यावेळी त्या संबंधित मुद्द्यावर तरुणांचं मत काय आहे किंवा तरुणांची भूमिका काय आहे हे कायम विचारातच घेणे गरजेचं असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे होताना दिसत नाही. आणि आज जेव्हा हीच तरुणाई रस्त्यावर उतरुन सक्रियपणे आंदोलनात उतरु लागली आहे तेव्हा मात्र तरुणांच्या सक्रियतेवर आपल्याकडचे तथाकथित विश्लेषक चर्चा करु पाहतात. सांगण्याचा मुद्दा हा की आगामी काळात देशात जी काही आंदोलनं करताना, विविध समस्यांवरील भूमिका मांडताना तरुणाईची भूमिका महत्त्वाची असेल.

अण्णा हजारेंचं देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन जेव्हा सुरु झालं तेव्हा देशभरातून सर्वात जास्त पाठिंबा हा तरुण  वर्गाचा होता, हे आपण लक्षात घ्यायला हवं. किंबहुना, तरुणांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळेच अण्णांचं आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि प्रभाव पाडू शकलं. काहींनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी विविध राज्यातील त्या त्या ठिकाणच्या तरुणांनी आपापल्या परीने अण्णांच्या आंदोलनात सहभाग दर्शवला. मात्र, त्यानंतर राजकीय आश्वासनं, अण्णांच्या टीममधील फूट वगैरे अशा गोष्टींमुळे आंदोलनाची दिशा भरकटली. मला अण्णांचं आंदोलन तडीस का गेलं नाही, या गोष्टीत शिरायचं नाही. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुण ज्या संख्येने घराबाहेर पडला, राष्ट्रहितासाठी आवाज उठवला गेला याची विशेष नोंद घेण्याची गरज आहे. या आंदोलनाने एक सिद्ध केलं की तरुणांमध्ये राष्ट्रहिताची प्रचंड भावना आहे. मात्र या आंदोलनानंतर हेच तरुण गायबही झाले. मग या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावर गांभिर्याने विचार करावा लागतो की आंदोलनात उतरलेली तरुणाई उत्साही तर नव्हती? तर या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने हो असेच मिळते. मनात खदखदत असलेली भ्रष्टाचाराविरोधातील चीड अण्णांच्या रुपाने मोठ्या व्यासपीठावरुन मांडली गेली. त्यामुळे कधीही रस्त्यावर उतरुन आंदोलन, मोर्चे न करणारे तरुणही रस्त्यावर उतरले. ही सारी मंडळी उत्साही होती म्हणून ते आंदोलन संपल्यानंतर कुठेही मोर्चे किंवा पुन्हा आंदोलने करताना दिसले नाहीत. थोड्या अधिक फरकाने असेच दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर होताना दिसलं. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर स्त्रियांच्या सुरक्षेसह एकंदरित सर्वच सुरक्षेचा प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई पुन्हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली. देशातील विविध शहरांत स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अवघ्या तरुणाईने आवाज उठवला. मात्र इथेही अण्णांच्या आंदोलनासारखंच झालं. अगदी त्याचप्रकारे निर्भया प्रकरणानंतर काही दिवसांनंतर तरुणाईचा हाच बुलंद आवाज शांत झाला.

जश्याप्रकारे उत्साहीपणे तरुणवर्ग आंदोलन किंवा राष्ट्रहिताच्या बाबींमध्ये सहभाग घेतो त्याचप्रकारे निमित्त असल्याशिवायही घेत नाही. तरुणांमधील निमित्तखोरपणा आणि आरंभशून्यता वाढत चाललीय. एखाद्या घटनेचं निमित्त असल्याशिवाय सक्रियता दिसत नाही. आणि जरी सक्रियता दिसली तरी तो संबंधित मुद्दा तडीस जात नाही, याचा अर्थ प्रचंड आरंभखोरपणा वाढतोय. सुरुवातील जो उत्साह असतो त्या उत्साहात सातत्य राहत नाही. मग या साऱ्यांवर मार्ग काय तर तरुणांचा आणि देशातील विविध मुद्द्यांवर लढणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांचा तुटत चाललेला संवाद कारणीभूत आहे असे मला वाटतं.

अण्णांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो वा निर्भया बलात्कार प्रकरणानंतरचं स्त्रियांच्या सुरक्षेसाठी झालेलं आंदोलन असो या आंदोलनांनी देशात खूप परिणाम केला. राज्यकर्त्यांना तरुणांच्या आंदोलनांची व संख्येची दखल घ्यावी लागली. याचा अर्थ सरकार काही करत नाही असे नाही मात्र ज्या गोष्टी सरकारपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज आहे किंवा त्या संबंधित मुद्द्यावर जलद निर्णयाची अपेक्षा आहे, अशा मुद्द्यांसाठी तरुणांनी आपल्यातला उत्साहीपणा सोडून दिला पाहिजे. आवाज उठवण्यासाठी निमित्ताच्या शोधात न राहता आणि आवाज उठवला गेला तर मुद्दा तडीस नेण्याचीही धमक दाखवण्याची गरज आहे. शेवटी तरुण हेच या देशाचे भवितव्य आहेत. व जगातील सर्वात तरुण देश म्हणून या देशाची ओळख आहे. ती ओळख नुसती तरुण या शब्दापुरती मर्यादित राहता कामा नये, तर ही तरुणांची ताकद देशाच्या हितासाठी उपयोगात आली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी देशातल्या विविध मुद्द्यांवर सक्रियता दाखवण्याची गरज आहे.

- नामदेव अंजना काटकर  (प्रतिनिधी, एबीपी माझा)

No comments

Powered by Blogger.