कासाच्या माळरानावर

(फोटो गुगलवरुन घेतला आहे. कासाचा फोटो लवकरच अपडेट करेन)

हिरवागार निसर्ग ज्याला भुरळ घालत नाही असा माणूस सापडणं थोडं कठीणच. त्यातही जर गावाकडची हिरवळ तर प्रचंड आकर्षित करते. ऐन पावसाळ्यात गावाकडे गेलो की हिरव्या-हिरव्या माळरानावर फेरफटका मारणं, नद्यांच्या मंजुळ खळखळाटात उड्या मारणं, हिरवी चादर पांघरलेल्या डोगरांच्या चढणी चढणं किंवा कड्यांवरुन अगदी शिवरायांच्या मावळ्यांसारखं चढाई करणं हे ठरलेलंच. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षणासाठी मुंबईत आल्याने गावाकडे जाणं तसं कमीच झालंय. पण गावाकडची ओढ काही कमी झाली नाहीय. आजही जेव्हा मिळेल तेव्हा गावाकडे पळणं सुरुच असतं. त्यात पावसाळ्यात तर सुट्टी आणि तीही मुंबईत हे गणीत कधीच नसतं. मुंबईतला पवसाळाही नकली वाटतो. असो.
      परवा गावी गेलो होतो. काही विशेष काम वगैरे नव्हतं. पण सुट्टी आहे म्हणून गाव गाठला. ऐन पावसाळ्यात गावाला जायला मिळतंय यापेक्षा वेगळा आनंद काय? गावाकडची ओढच अशी आहे की इकडे मुंबईत काम करत असताना कुणीतरी आपल्याला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलं आहे असं वाटू लागतं. त्यांमुळे सुट्टी मिळताच गावकडे पळायचं असं ठरलेलंच. असो. तर परवा गावी गेलो असताना सहजच एका संध्याकाळी गावाबाहेरच्या माळरानावर फेरफटका मारण्यासाठी गेलो. आता गावाकडे वेगवेगऴ्या जंगलांना, माळरानांना नावं असतात हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. कधी तिथल्या झाडावरुन कधी एखाद्या नदीवरुन तर कधी-कधी एखाद्या माळरानाला असं नाव का पडलं हे कळायला मार्गच नसतो. लोकं बोलतात म्हणून आपणही बोलू लागतो. तर परवा गावी गेलो असताना मी आमच्या गावाशेजारील माळरानावर गेलो. कासात. हो कासात असं त्या माळरानाचं नाव आहे. कासात जायला गावातून तशी एक पायवाटच आहे आणि पावसाळ्यात ती पायवाट कसली चिखल-पायवाटच असते. गाई-गुरं त्याच वाटेवरुन जात असल्याने पायवाट चिखलाने बरबटलेली. पण मग त्या पायवाटेवरील दगड्यांवर उड्या मारत मी कासात पोहोचलो. कासाच्या कुंपणावरुन कासाच्या माळरानावर एक नजर फिरवली. वाह! क्या बात है! मन प्रसन्न झालं. मुंबीतल्या उंचच उंच इमारती पाहून पाहून थकलेले डोळे कासाचं माळरान पाहून पुरतं सुकावले. यस्कड उघडून कासात शिरलो. (यस्कड म्हणजे एखाद्या शिवारात जाण्यासाठी जो प्रवेशद्वार तयार केलेला असतो. त्याला आमच्याकडे यस्कड असे म्हणतात) कासाच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे उतरंड. उतरंडीवरुन थोडा खाली उतरलो तर पावसाळ्यात सतत खळखळत वाहणारी नदी. कासाच्या माळरानावर अगदी मधोमध प्रचंड विस्तिर्ण आणि अगदी आपणच या पूर्ण माळरानाचं मालक आहोत या आवेशात-डौलात उभा असणारा आंब्याचं झाड. थोडा वेळ त्याच आंब्याच्या झाडाखालील दगडवर बसलो. तेवढ्यात पावसाची एक जोरात सरकट आली. मी आंब्याच्या अजून जवळ गेलो. आंब्याच्या खाली बसल्याने पावसाने भिजत नव्हतो पम मी मुद्दामच आंब्याखालून बाहेर येऊन पावसाचा आनंद घेत उभा होत. पुरता भिजलो. भिजताना कसलीही चिंता नव्हती. ना कपडे भिजतील याची..ना सर्दी-खोकला होईल याची. इकडे मुंबईत पावसाचे चार थेंब अंगावर पडली कि मनात भीती निर्माण होते की आता आजारी वगैरे पडतोय की काय. भिजल्या अंगानेच पूर्ण कासाचा माळ फिरलो. गावी असताना गाई-गुरं चरायला घेऊन जायचो तेव्हा याच कासाच्या माळरानावर गाई-गुरांना आणायचो. एकदा का या माळरानावर गाई-गुरं सोडली की त्या आंब्याखाली बसायचं. इतरांच्या बैलांसोबत आपल्या बैलांची झोंबी होत नाही ना हे फक्त पाहात राहायचं. सूर्य मावळतीला गेला की गुरांना परतीकडे वळवायचं. कासाच्या माळरानावर पाऊल ठेवल्यावर अशा अनेक आठवणी जागा झाल्या.
अजून एक आठवण म्हणजे याच कासाच्या माळरानावर आम्ही शाळकरी मुलं पावसाळ्यात दर शनिवार-रविवार खो-को, कबड्डी खेळायला जायचो. उन्हाळ्यात क्रिकेटची पिच तयारच असायची. पावसाळ्यात खो-खो, कबड्डी खेळून कपडे चिखलाने माखल्यावर कासातूनच खाली उतरायचं आणि नदीवर अंघोल्या करायचं आणि मग घरी परतायचं. अर्थात घरी येऊन आईचा ओरडा असायचा मात्र या सर्व मौजमजेत या ओरड्याचं काही विशेष वाटायचं नाही. अशा खूप आठवणी या कासाच्या माळरानाशी जोडल्या गेल्या आहेत. आज फक्त त्या आठवणीच राहिल्यात. 
-  नामदेव अंजना

No comments

Powered by Blogger.